संपादकीय
आपण बाहेरच्या जगात वावरतो, वेगवेगळ्या माणसांना भेटतो, वेगवेगळे स्वभाव आपल्या नकळत समजावून घेतो. आपल्या मनात, मेंदूत हे सगळं कुठेतरी साठून राहिलेलं असतंच! एखाद्या वेळी हेच मनातलं, मेंदूतलं काहीतरी संदर्भाने अचानक बाहेर येतं आणि आपल्यासमोर त्याचा पट तयार होतो. आणि ह्यातूनच एका कथेचा जन्म होतो. प्रत्येक व्यक्तीची, जागेची, क्षणाची एक कथा असते. ही कथा आपल्याला शोधावी लागते. यंदाच्या आरंभच्या अंकात हाच शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. कथा, त्यातल्या भावना, त्यातल्या व्यक्ती, त्यांची सुख-दुखं, आठवणी या सगळ्यांचा मिलाप यंदाच्या अंकात वाचकांना वाचायला उपलब्ध करून देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
यंदाचा अंक हा कथा विशेषांक आहे. या अंकात वेगवेगळ्या धाटणीच्या कथा वाचकांना वाचायला मिळतील. आरंभ कथा स्पर्धेचा निकाल या अंकातून जाहीर करत आहोत. विजेत्यांचे मनापासून अभिनंदन तर सर्व लेखकांचे ज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला, आपल्या कथा पाठवल्या त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. विजेत्या लेखकांसोबतच इतर लेखकांच्या कथाही या अंकात प्रकाशित करत आहोत. अनेकांनी या अंकासाठी आपल्या कविता, लेखही पाठवले परंतु ते प्रकाशित करता आले नाहीत याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.यंदाच्या अंकापासून एक नवीन प्रयत्न करत आहोत. या साहित्याच्या प्रवासात आपल्याला आरंभयात्री सोबत करणार आहे. अंकाच्या विषयाला साजेसा असा हा आनंदयात्री असेल. याचा सहभाग आपल्या प्रवासाला एक वेगळी दिशा देऊ शकेल.यांच्यासोबत आपला हा साहित्यप्रवास एका नव्या दिशेने नव्या टप्प्यावर पोहचेल अशी आमची खात्री आहे.त्यांचे मार्गदर्शन आपल्या सर्वाना नक्कीच फायद्याचे ठरेलही खात्री आहे. या नव्या उपक्रमासाठी वाचकांचा प्रतिसाद खूप महत्वाचा आहे. त्यामुळे वाचकांकडून याबद्दल प्रतिक्रिया येतील, सुधारणा समजतील, कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतील, ही आमची अपेक्षा.
- संपादक