Get it on Google Play
Download on the App Store

उत्तेजनार्थ द्वितीय: बापाचं सपान

किशोर चलाख

दिवस निघाला की मनोहर वावराकड जायला निघाला. वावरात जात असताना डोक्यात विचार येत  होता, तो त्याचा एकटा एक पोरगा राकेशचा.

रक्ताचं पाणी करून  त्याने  त्याला डॉक्टर केलं, वावर विकून शहरात दवाखाना टाकुन दिला, पण तो मायबापाले विसरुन गेला. दरवर्षी घरी येणारा पोरगा आता वर्ष झाला तरी गावाकडे आलाच नाही. शिकून डॉक्टर झाल्यावर तो आपल्याला पोसणार या आशेने बापाने त्याचे स्वप्न पूर्ण केलं पण आज तो सगळं विसरून गेला. पैसे कमविण्याच्या पायी  प्रेम विसरून गेला. माझ्या प्रेमात काही तरी कमी असेल असं विचार करत ते वावरात कधी पोहोचले कळलेच नाही. जे स्वप्न पाहिले ते धुळीत मिळालं अस म्हणत कामाला सुरुवात केली.

काही दिवसाने गावातील मधुकरराव शहरात कामानिमित्त गेले होते, गावात आल्यावर त्यांनी  राकेशचं लग्न झाल्याच सांगितल. मनोहरच्या पायाखालची जमीन सरकली.आपल्या पोराने लग्न केलं साधं आम्हाला सांगितलं  पण  नाही. जड पावलांनी त्यांनी घर गाठले आणि आपल्या बायकोला सर्व सांगितले. त्या मायने ज्याला जन्म दिला. आपल्या पोटाशी धरून मोठं केलं त्या मायेला देखील त्यानं  सांगितले नाही. पण ती माय  होती तिने सगळं पचवून घेतलं. आपल्या पोराला  व सुनेला भेटण्याची इच्छा दर्शविली. तिच्या  मायेपोटी मनोहर रावसुद्धा शहरात जायला तयार झाले.

दोघेही सकाळच्या बसने शहरात आले.आपल्या मुलाला डोळे भरून पाहण्याची इच्छा होती. घराजवळ जाताच सुनेने त्याची विचारपूस केली तेवढ्यात राकेश पोहोचला. त्याने मी एक डॉक्टर आहे आणि तुम्ही खेड्यातील लोक आहे त्यामुळे तुम्ही इथे आला तर माझं नाव खराब होईल म्हणून तुम्ही निघून जा. असे ठणकावून सांगितलं. एक क्षणात पाहिलेलं सपान धुळीस मिळालं. जड पायान ते दोघेही आपल्या गावी वापस  आली. आणि आपल्या नशिबाला दोष देत होती. ज्या पोरासाठी आपण सगळं केलं आज तो आपणाला साधं घरात सुद्धा येऊ दिल नाही की विचारणा सुद्धा केली नाही असे म्हणत नशिबाला दोष देत दोघेही झोपून गेले.

*****