भाग ११
मोहननं परवा निघायंच ठरवलं होतं खर्डीला; पण परवाच सुट्या लागत असल्यानं शेवटचा दिवस म्हणून प्रवासात उशीर झाला वा काही समस्या आली तर मग? त्यापेक्षा उद्याच सकाळी निघालं तर? त्यानं अचानक नियोजनात बदल करत वाटचाल होती तरी एक दिवस आधीच निघाला.गोवसु बारसच्या सकाळीच.
धुळ्याहून बस पकडत तो खर्डीत साडेनऊ पर्यंत पोहोचला. शाळा उघडायला अवकाश होता. त्यांनं सोबत आणलेली बॅग शाळेच्या उंच फरसबंदी केलेल्या व्हरांड्यावर ठेवत तो शिक्षक येण्याची वाट पाहत आवारात निरीक्षण करत फिरू लागला. समोरून नदीकाठाच्या दिशेनं ट्रक शाळेकडं येतांना त्यास दिसला. नव्या गावात त्याला आपल्या नोकरीच्या पहिल्याच गावाची अचानक आठवण त्याच वेळी नेमकी तरळली.गाव की वस्ती? त्यानं पश्चिम दिशेकडं पाहिलं.चक्करबर्डीला हजर झाल्याचा नोकरीचा पहिला दिवस नी वळणावर भेटलेली मोळी धरुन उभी असलेली काळजाचा ठाव घेणारी भेदक नजरेची मोहना त्यास आठवली.त्याचक्षणी त्याच्या पापणकाठात अश्रू तरळले. मोहना!.... त्यानं दिर्घ उच्छवास सोडला. मोहना कुठं असेल आता? बारा वर्षात आपण ना चक्करबर्डीत फिरकलो ना टवकीत! तो पावेतो ट्रक शाळा ओलांडून पुढे जाऊ लागला.ट्रकमध्ये मजुरबाया असाव्यात बहुतेक.ट्रकच्या आवाजानं तो विचलीत झाला.
किती बदलली असेल मोहना! तिच्या ही त्या गालावर येणाऱ्या लटा आपल्या केसागतच पांढऱ्या झाल्या असतील आता! तपानंतर ही मोहनाचा आठव काही जात नाही. त्या आठवासाठी तर आपण जगतोय! फिरत फिरत ते व्हरांड्यावर बसले. बॅग खोलत ते पाण्याची बाटली शोधू लागले. तोच बॅगेतली शालीची घडी त्याच्या नजरेत पडली. बारा वर्षात किती वसनं फाटलीत! पण हे महावस्त्रासारखं आपण जपून ठेवलंय.नी ते महावस्त्र ही त्याची ऊब देत परोपरीनं आपल्याला साथ देतंय! किती शाळा बदलल्या, किती विद्यार्थी बदलले,किती शिक्षक- माणसं बदलली ; पण ही शालच एक शाश्वतासारखी आपली साथ देतेय!मोहनला कळेना की आज मोहनाची आठवण तिव्रतेने का येतेय?जणू काही ती आपल्या आजुबाजूलाच वावरतेय!बहुतेक नविन गावात ,नविन वातावरणात आलोत म्हणून असावं .
गुरुजी येताच मोहननं नमस्कार करत परिचय दिला.पण त्यातील बऱ्याच जणांना मोहन ओळखत नसला तरी बरेच जण मोहन गुरूजीस नावानिशी ओळखत होते.त्याला कारण त्यांचं जिल्ह्यातील काम व त्यांना लाभलेले पुरस्कार व सन्मान. मोहन गुरुजींनी हजर होत आठ शिक्षकाच्या शाळेचा मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेतला. दिवस भर सारं काम सांभाळत ते शाळा सुटल्यावर धुळ्याला परतले.कारण उद्याच्या दिवस शाळा करून सुट्याच लागणार होत्या दिवाळीच्या. म्हणून दोन दिवस ते धुळ्यालाच मुक्काम करणार होते.
मोहन गुरूजींच्या बसनं खर्डी टाकली नी इकडं मोहिनीच्या ट्रकचा खर्डी गावास भेदरवणारा आवाज उठला होता. ज्याची मोहनला कल्पना नव्हती.मोहन रात्री धुळ्याला ओळखीच्या शिक्षकाकडं मुक्कामाला थांबला.
जिल्ह्याला शवविच्छेदन करण्यासाठी गेलेलं मोहिनीचं शव रात्रभर दवाखान्यात शवागारात पडलं.सकाळी शवविच्छेदन होत अकरा बाराच्या सुमारास खर्डीत आलं. रात्रभर श्रुती श्लोक कसलीच सुध नसलेल्या म्हाताऱ्या मथा आजीस बिलगत टाहो फोडत होती. गोडावून मधील खोल्यातील सात आठ मजुराच्या बाया पोरांना धरत समजूत घालत होते.बापये मजूर धनाबापूसोबत मोहिनीच्या शवासोबत गेलेले. घरात सकाळी दळलेलं हातमोड्याचं पीठ जसच्या तसं झाकलेलं होतं. श्रुतीस सकाळी आईस उंबऱ्याला लागलेली ठेच आठवली.त्या नादान जिवास तरी उमजलंच. व ती टाहो फोडत आकांतानं रडु लागली.
" आई तुला सकाळी उंबरा पण नाही बाहेर पडू देत होता गं! तरी तू गेलीस! का ? तुला कायमचंच आम्हाला सोडून जायचं होतं का?" हे ऐकताच बसलेल्या बाया ही तोंडाला पदर लावत रडू लागल्या तर काही श्रुतीलाच समजावू लागल्या " सुरती निदान तू तरी शांत बस! आईला काय माहित होतं का बेटा! असलं काही माहित असतं तर ती कशाला गेली असती?"
" आक्के मी नाही सांगत होतो आईला! तुच म्हणाली होती ,श्लोक आईला जाऊ दे मी आहे ना म्हणून!" श्लोक बोबड्या बोलात आक्रंदला नी श्रुतीनं सकाळचं आठवून डोकं ठोकायलाच सुरूवात केली.
बायांनाही पोरांना कसं शांत करावं समजेना.रात्री बारा एकला रडूनरडून श्लोक अधमेला झाला नी श्रुतीच्या मांडीवरच झोपला. श्रुतीचाही रडून रडून गळा बसला व तिचा आवाज निघेनासा झाला.
सकाळी आपण श्लोकला पायरीवर धरून बसलो तेव्हा आई पुन्हा पुन्हा मागं वळून पाहत होती व आजीला जातांना लक्ष ठेवायला सांगून गेल्याचंही आठवताच श्रुती पुन्हा रडू लागली.रडता रडता तीनेकच्या सुमारास तिचाही डोळा लागला.बायाही मग थोडया जागेवरच गरबळल्या.
पहाटे पाचला श्रुतीस जाग येताच तिला जाणीव झाली नी तिनं पुन्हा हंबरडा फोडला.
" ये आई ये ना गं! दररोज तू या वेळेस उठत पाणी गरम करायची! आज का नाही?" नी त्या आवाजानं श्लोक ही उठला नी मग दोघांच्या आकांताने सारं घर डोक्यावर घेतलं.
अकराच्या सुमारास मोहन गुरूजी बसमधुन उतरले नी शाळेकडे निघाले. तोच कर्कश सायरन वाजवत अॅम्ब्युलंस आली व त्याच्या जवळून गेली. त्यानं बाजुला सरकत जाणाऱ्या गाडीकडं पाहत काहीतरी झालंय हे ओळखलं.शाळेत येताच शिक्षकांना तो काही विचारणार तोच त्यांनी जे बया केलं ते ऐकून त्याच्या अंगाचा थरकाप उडाला.शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या(दोन भावंडाच्या) आईचा काल ट्रक अपघात झालाय व त्यातच ती बिचारी जागेवरच ...... सोबत गावातील आणखी एक बाई मेल्याचं त्यांना कळलं. त्याचं काळीज चरकलं.
मोहिनीच्या देहाचं मुटकुळं आणून खाली उतरवताच श्रुती व श्लोकनं एकच आकांत मांडत आक्रोश केला. पण त्यांना त्यांच्या आईचा चेहरा दिसेचना.चेहरा असेल तर दिसेल! त्यांना जमलेल्या लाकांनी धरलं.धनाबापू पायाला प्लास्टर घालून डाॅक्टर मना करत असतांनाही न ऐकता सोबत अॅम्ब्युलंस मध्येच बसुन आले होते.फकिरा शेठ ही कुटुंबासमवेत नाशिकहून आले. एका माणसानं श्लोकला वर उचलत मोहिनीभोवती फिरवलं व रूमाल डोक्यावर टाकत पुढे झाला.साऱ्यांनी गलका करत प्रेत उचललं.पण श्लोक त्या माणसाला न जुमानता खाली सुटत आईला पाहू द्या म्हणून हंबरडा फोडत होता.लोकांनी उचलंल. प्रेत शाळेकडून नदीकडं निघालं.सारे शिक्षक शाळेपासून प्रेतयात्रेत निघाले.मोहन गुरूजी नविन असले तरी मरणाला कोण नविन नी कोण ओळखीचं.ते ही मागोमाग निघाले. पोराचा आक्रोश त्यांना पाहवेना.चालत चालत एक दिड किमी अंतरावरील नदीवर आले. शव एका बाजुस ठेवलं व लोक तिकडं चितेची फुलं रचू लागले.शिक्षक रडणाऱ्या श्लोककडं सरकले तर तो आईकडं.मोहन गुरूजीही मागोमाग निघाले.मरणाऱ्या पुण्यात्म्याचं अंतिम दर्शन घेऊयात अशी आंतरीक उर्मी न जाणे मोहन गुरूजीच्या मनात कशी उमलली. चेहरा पूर्ण कापुस घालून शिवलेला.मुखदर्शन झालंच नाही. त्यांनी नमस्कार केला नी तोच प्रेताचा प्लास्टीक व कापडात गुडाळलेला हात मोकळा झालेला त्यांना दिसला.हाताच्या बोटाकडं त्यांच सहज लक्ष केलं.बोटाच्या भागास अंगठीचा कळसा पडलेला व गोरा झालेला.पण अंगठी नव्हती. त्या बिकट व करूणमय प्रसंगात ही त्यांना मोहनास दिलेली अंगठी आठवली. ते बाजुला होणार तोच रडणाऱ्या श्लोकला एका गुरुजीनं उचललं होतं पण तो उतरत आईकडं जाण्यासाठी फिरतांनाच मोहनाच्या पुढ्यात अचानक आला.त्याचा आकांत पाहून त्यांचे हात आपोआप पुढे झाले.तरी पोरगं पुढेच झेप घेत होतं त्याचा हात पकडत मोहन गुरूजी प्रेताजवळ उभे राहिले. तोच लोकांनी प्रेतच चितेवर ठेवलं.श्लोकला धरत अग्नी दिला व पाणी दिलं.
सारे परतले. शिक्षकही शाळेत येऊन पोराचा आक्रोश व दु:ख पाहून सुन्न झाले.मोहन गुरुजीस इतरांकडून कळालं की पोरगं दुसरीत व मुलगी सहावीत आहे.बाप आधीच मेलाय व दिड दोन वर्षापूर्वीच नाशिकहून मजुरीला इथं हे कुटुंब आलंय.
शाळा सुटली व सुन्न मनाने मोहन गुरुजी निघाले.आता सुटी लागल्यानं त्यांनी साऱ्यांचा निरोप घेतला.
फकिरा शेठ मदत देत व पोरांचं करेन मी काही तरी!उघडं पडू देणार नाही , असं आश्वासन देऊन निघून गेले.म्हातारा धनाबापू प्लास्टर असलेल्या पायात हालचालीनं असह्य वेदना होत असतांनाही दवाखान्यात न जाता पोरांजवळ थांबले.मोहिनी धनत्रयोदशीलाच पोरांना पोरकं करून अनंतात विलीन झाली.
मथा आजीची स्मृती काम करेनाशीच झाली होती. प्रसंगाची तिला जाणीव होऊनही दु:ख व्यक्त करण्याइतपत ही गात्रे साथ देत नव्हती. तर ती नातवंडांना काय आधार देईल.धनाबापू व त्यांची पत्नीही वयानं थकलेली.त्यात मुलगा बेईमान निघाला .मग त्यांचेच वांदे तर पोरांचं काय?धनाबापू पुढं मोठा प्रश्न पडला.
दिवाळी आली तशी गेली.पण जातांना रिकामी कशी जाईल! श्रुती व श्लोकची आई घेऊन गेली. दहा दिवसांत सारं आटोपलं.
श्रुती भाकऱ्या धापायला शिकली होती जेमतेम.तीच आता आजी व श्लोकला खाऊ घालू लागली.धनाबापूनं माणसांना सांगत तिला फळ तोडणीच्या कामावर लावलं.श्रुती गोडावून मधल्या खोलीत राहणाऱ्या माणसासोबत कामाला जात आई मोहिनीची जागा सांभाळत घराची जबाबदारी उचलायला तयार झाली. पण ही तात्पुरती सोय ठिक.आपण आहोत तो पर्यंत पोरांची काही तरी सोय लावलीच पाहीजे.हे धनाबापूनं ओळखलं.कारण ना मामा,मावशी ना काका काकी.मग आपणानंतर यांचं काय?
मध्यंतरी फकिरा शेठ आले त्यांनी पोरांच्या नावावर दोन लाख रूपये ठेवण्याची कबुली दिली. पण धनाबापूनं त्यांना विनवत "म्हातारीस वृद्धाश्रमात व पोरांना आपल्या ओळखीनं एखाद्या आश्रमात ठेवण्यास वा दत्तक घेणारं कुणी असलं तर पहा!" सांगितलं.
फकिरा शेठ 'करतो तपास' सांगत आल्या पावली गेले. श्रुती व श्लोकनं ते ऐकलं.श्रुतीला समजलं .श्लोकला ऐकलेलं कळालं नसलं तरी आपणास कुठंतरी पाठवणार इतकं कळालं. ते निघून जाताच त्यानं श्रुतीला कमरेला बिलगतच रडत विचारलं.
"आक्के! तू आईला 'मला सांभाळण्याचं सांगितलं होतं ना? मग मी तुला सोडून कुठंच जाणार नाही व तुलाही जाऊ देणार नाही"
श्रुतीही त्याला गच्च छातीला लावत रडतच म्हणाली." जाऊ तर दोघे सोबतच! "
वासुदेव पाटील