भाग ८
संग्रामशेठ पंधरा दिवस नाशिकला दवाखान्यातच उपचार घेत राहिला. संपतराव गाडीवर दूरवर वर्दी मारू लागला.वर्दी नसेल तर लोकलवर चालू लागला. दिवसाचे काहीना काही कमवू लागला.सोबत पिणं वाढलं. कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी पैसे राहतील तेवढे साठवत राहिला. दिवसा मागून दिवस जाऊ लागले.संग्राम आता मोहिनीला बेघर केव्हा करता येईल याच ट्याॅवमध्ये विचार करू लागला.
मोहिनीचे दिवस भरले व संपतरावाच्या घरी मुलगा जन्मास आला.थकल्या मथाबाईस नातूमुख पाहून कृतकृत्य झाल्यागत वाटू लागलं. पण संग्रामचं कर्ज ,आपलं व्यसन व गाडीची कमाई हे गणित काही बसेना म्हणून संपतरावाची हिम्मत खचू लागली.कितीही गाडी पळवली तरी गाडीवर चार लाख फेडनं शक्यच नाही हे साधं गणित त्याला आता कळलं .मोहिनी त्यावेळेस आपणास विनवत कर्ज घेण्यास नकार देत होती ते आपण त्यावेळेस ऐकलं नाही .आता फुगत जाणारं व्याज देखील आपण फेडू शकत नाही हे त्यांला कळताच घर शंभर टक्के जाणार यानं तो आता काळजी करत खंगू लागला.त्याच्या चेहऱ्यावरचं तेज लोप पावू लागलं व तो पुन्हा जास्त प्यायला लागला.
संग्रामनं एके दिवशी संपतरावास बोलवत पैशाबाबत ठोकलं. " संपत व्याज फुगत चाललंय, तू मुद्दल तर जाऊ दे पण महिन्याचं व्याज ही फेडत नाही.याला व्यवहार म्हणत नाही.अशानं तुझं घर जाईल..."
संपतराव हो ला हो करत उठून आला.
श्रुती चार वर्षाची व श्लोक दोन महिन्याचा झाला. मोहिनीनं श्लोकला सांभाळण्यासाठी सासुबाईसही कामावर सोबत नेत कामास सुरुवात केली. घरात रिकामी डबे तिला घरात बसू देईनात. त्यात संपतरावाचे पाय सुजायला लागले. मोहिनीनं त्याला तगादा लावत दवाखान्यात पाठवलं. तो दवाखान्यात गेला.काही औषधी घेऊन परत आला. पण त्या दिवसापासून तो एकदम चिंताग्रस्त राहत जास्त पिऊ लागला. संग्रामनं घर ताब्यात घेण्याबाबत संपतमागे पुन्हा तगादा लावला." महिन्याची मुदत देत घर खाली करायला लावलं.
संपत घरी येत कोपऱ्यात रडू लागला.त्याचा सारा ताठा ,रग जिरली.जर संग्रामनं घर ताब्यात घेतलं तर लहान मुलांना घेऊन कुठं जायचं.गावातच भाड्यानं राहणं म्हणजे त्यापेक्षा मेलेलं बरं! आपण चुकलो, जिवनात येऊन चैन करून बरबाद झालो.पण आता वेळ निघून गेली होती.मोहिनीला तर घराचं माहित नाही.कसं सांगाव? त्यात आणखी डाॅक्टरानं वेगळंच भूत घालून दिलंय! तो रडू लागला.संध्याकाळी मोहिनी मुलांना व सासुबाईस घेऊन कामावरून आली.याला घरी उदास बसलेलं पाहून ' काहीतरी बिनसलंय' हे तिनं ओळखलं. नाही तरी बऱ्याच दिवसांपासून चिंताग्रस्त राहणारा व खंगत चाललेला नवरा तिनं ओळखला होताच .पण कदाचित शेत गेलं, पैसा नाही म्हणून असावं असं तिला वाटत होतं.
तिनं श्लोकला पाजत संपतच्या मांडीवर दिलं व ती स्वयंपाकास लागली.श्रुती ही बापाच्या पाठीवर बसत मागून बापाला बिलगू लागली.
मोहिनीनं साऱ्यांना जेवू घालत झोपवलं.
" काही झालंय का?" तिनं जवळ बसत संपतला विचारलं.
नको तोच विषय निघू पाहताच संपत गडगडला नी तिला बिलगत रडू लागला.
आता काही तरी भीषण ऐकावं लागेल यानं मोहिनीचं काळीज धडाडलं.ती घाबरली.कारण रडणारा नवरा तिनं पाहिलाच नव्हता.कायम बेफिकीर रंगेल , आपल्याच धुंदीत वावरणारा संपतरावच ती पाहत आली होती.ती तरी धीर देत " काय झालं ते मोकळं सांगा,दडवण्यात काहीच अर्थ नाही" भित भित ती म्हणाली. तोच नातीला झोपवत मथालाही चाहूल लागली असावी म्हणून ती पण येत विचारू लागली.
संपतने मोहिनीची माफी मागत रडत रडतच घराबाबत सारं सांगत संग्रामनं कर्ज हे घर तारण ठेवून दिलं होतं व आता तो घर ताब्यात घेतोय...सांगताच मोहिनीनं संयमानं दाबून ठेवलेला टाहो घरात गुंजला.
" सांगत होते कर्ज नका काढू, गाडी नका घेऊ! दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायवरकी करा!ते ही नाही जमत असेल तर बसुन रहा! पण नाही ऐकलं! नाही ऐकलं तर नाही ऐकलं घर तारण देऊन बसलेत! नी आता डोक्यावरच छतच जातंय तर रडून काय उपयोग!" तिच्या रडक्या आक्रोशानं व संतापानं संपत आणखीनच रडू लागला.
मोहिनीचा सारा भर ओसरायला बराच अवधी लागला.भिंतीला पाठ रेलून गुडघ्यात डोकं घालून असहाय संपत रडत होता.मथाबाई तर अपराधी चोरासारखी चूप. एका बाजूला सुन्न मोहिनी.भयाण, भीषणता.मोहिनीला अस्वलाचं वाक्य आठवलं" शांत रहा,नाहीतर बेघर करीन!" पण त्यावेळेस अस्वलाला फाडण्याच्या आवेशात असलेल्या मोहिनीस ते उमगलंच नव्हतं.तिला आता पट उलगडू लागला. कामावर जातांना अस्वलाचं घुरणं ,कर्ज देणं व बेघर करण्याची धमकी देणं, व आता जळलं म्हणून चवताळून घर हिसकवतोय!
मोहिनीनं संपतरावास उठवत जवळ घेत समजावलं.दुसरीकडं व्यवस्था करा नी हे घर सोडा.जगात ज्यांना स्वत:चं छत नसतं ते ही जीवन जगतातच. म्हणून लाचार होऊ नका.
मोहिनीच्या या शब्दांनी त्याला धीर आला.
" मोहिनी एक सांगू का गावात भाड्यानं राहण्यापेक्षा गाव सोडलं तर? निदान दुसऱ्या गावात सुखानं तरी राहता येईल." मोहिनीनं नवरा असं का सांगतोय ते ओळखलं.व ती तयार झाली.
दुसऱ्या दिवशी संपतराव, मथा सकाळीच गेली.मथाचं माहेर नाशीक व धुळ्याच्या सीमेवर असलेलं एक छोटंसं गाव.तिथं आता तिच्या ओळखीचं व जवळचं कुणीच नव्हतं. पण एक भावकीतलाच धना नावाचा दूरचा चुलतभाऊ होता.त्याचा पत्ता ते शोधू लागले. तो आता नाशिकलाच राहत असल्याचं तिला कळलं.त्यांनी पत्ता घेत नाशीक गाठलं.धनानं बऱ्याच वर्षांनी भेटत असल्यानं आधी ओळखलंच नाही.मग विषयामागून विषय झाल्यावर त्यांनी सारं दुःख सांगितलं व मदत मांगितली.धनाची पण परिस्थीती जेमतेमच. तो मालकाच्या गोडावून मध्ये राहत होता.त्याच्या मालकाचे अनेक धंदे होते.विटभट्टे, रेती, सिमेंट पुरवणे व आताच आणखी फ्रुटसेलचाही धंदा सुरू केला होता.धना हा गुमास्ता म्हणून साऱ्या ट्रकचं काम पहायचा.कोणत्या ट्रकला कुठे पाठवायचं?कुठून काय आणायचं वा कुठं पाठवायचं? हे सारं धनाच पाही.
धना आधी का कु करू लागला.कारण त्याला कष्टाची सवय व कुठेही तो राही. यांना असलं चालतं की नाही म्हणून तो विचार करू लागला.कारण चुलत मुलत बहिण.फारशी ओळख नाही.पण संपत व मथानं आग्रह केल्यावर त्यानं मनावर घेतलं. त्यानं त्यांना खोली शोधून दिली. विट भट्टीवर वा रेती सिमेंट वाहणे असलं काम ही मिळून जाईल असं सांगितलं. पण संपतनं ड्रायव्हर सांगताच ट्रकवर लावण्याबाबत ही सांगितलं. मथा व संपत परत आले.
पंधरा दिवसातच नाशिकला सामान नेण्याचं निश्चीत झालं. संग्रामचा हिशोब केला .घर जाऊनही कर्ज बाकी. गाडी विकली.गाडीतही जबर तोटा आला.कारण गाडीच मुळात महाग घेतली होती त्यात वापरून घसारा होत पुरती कामावर आलेली. सारं कर्ज फेडत पन्नास साठ हजार हातात राहिले.बारा एकर शेत गेलं, मोठमोठाली भांडीकुंडी गेली, आधीची गाडी गेली. छत गेलं नी ही गाडीपण.सारं कशानं गेलं तर पत्त्या, बाटलीनं.संपतला विश्वासच बसेना.घर खाली करतांना संपतनं नाशिकहूनच धनाबापूस ट्रक सांगितला होता.
मोहिनीनं रात्रीलाच उरलं सामान पॅक करून ठेवलं होतं.तिनं तर रात्रीच निघण्याचं संपतला सांगितलं होतं.दिवसा उगाच तमाशा.पण ट्रक वेळेवर अॅडजस्ट न झाल्याने सकाळच झाली.
दहा वाजले सर्व सामान भरून मोहिनी संपतराव मथा तयार बसलेले. तोच संग्राम गणा व इतरांना घेऊन मुद्दाम आला.
घरात घुसत पाहू लागला.
" गणा, सौदा महागातच पडला की काय रे! "
" नाही शेठ घर पाहिल्यावर नाही वाटत तसं" गणास शेठचं बोलणं लक्षात न आल्यानं तो बरळला.
" मथामावशी वाईट नका वाटून घेऊ हो! तुमच्या डोक्यावरचं छत काढण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती.कारण डोक्यावरचं छत जातांना काय वेदना होतात हे मला माहित आहे.पण मी काय करू या तुमच्या संपतनं मनावरच नाही घेतलं! नाही तर छत गेलं नसतं तुमचं!"
संग्रामशेठ मोहिनीकडं पाहत 'मनावर' या शब्दावर जोर देत म्हणाले.
" आणि बरं का वहिणी अजुनही तुमची इच्छा असेल तर माझ्या घरात तुम्ही खुशाल राहू शकता!" तो थेट लाळ घोटत मोहिनीस बोलला.
मोहिनीनं त्याच वेळी मांडीवर मुतायला सुरुवात करणाऱ्या श्लोक ला उभं धरलं " सासुबाई या पोरानंही थोडा धीर धरावा ना जाता जाता धार मारलीच.हा ही बापाच्या वळणावरच गेला.बापानं साऱ्या इस्टेटीवर तर यानं सोडल्या घरावरच...."
बाण वर्मी लागला.
" संपत पोरगं लईच इरसाल आहे गडा तुझं! डोक्यावरचं छत जाणाऱ्या बिकट परिस्थितीतही आडवं धार मारतंय" संग्राम हसत प्रतिहल्ला करु लागला.
" शेठ त्याला माहितीय या बंदिस्त छतापेक्षा इज्जतीचं आभाळाचं मुक्त छत डोक्यावर असलं की असल्या छताचं काय मनगटाच्या जोरावर बांधता येतात कधीही!" मोहिनीनं डोळ्यातून आग ओकत संग्रामच्या जळालेल्या गालाकडे पाहत दणका हाणला.
संग्रामनं गालावर रुमाल लावत खाली मान घातली.त्याला पेटतंं लाकुड धरलेली मोहिनी दिसू लागली.तो सरळ उठत खाली शेपटी घालत पळणाऱ्या श्वानागत निघाला. गाडी आली सामान भरला ठराविक आस्था असणाऱ्या शेजाऱ्यांना भेटत मोहिनी संपतरावानं गावाच्या मारुतीचा पाया पडत गाव सोडलं. सामान भरलेल्या गाडीत श्रुतीस घेत संपतराव कॅबीनमध्ये तर श्लोकला मांडीवर घेत मोहिनी सासुसह ट्रकमध्ये मागे बसली.तिच्या डोळ्याचा काजळकाठ न्हावू लागला.पाच वर्षातच या गावची पांढरी आपणास सोडावी लागतेय यांच घोटीव दु:ख तिच्या काळजाला चर्रे पाडू लागलं.ती मागे वळून वळून गावाकडे पाहू लागली. प्रत्येक वेळी मागे वळून पाहणचं का आपल्या नशिबी येतं?का कुणी आपली जिवांच्या आकांतानं वाट पाहणारं कुणीतरी मागं राहत असावं.तिला मोहन आठवला नी त्या ओघळणाऱ्या काजरबिलाई आठवणीत ती आपलं भविष्य शोधू लागली.तिची बोटं सहज अंगठीवर गेली.पुन्हा उर दोन्ही काठ कढ दाटून वाहू लागलं.
नाशिक आलं.ट्रक एका झोपड पट्टीत घुसला.तिथून पुढं ट्रक जाईल असा रस्ता नसल्यानं थांबला.संपतराव व ड्रायव्हरनं बोळीबोळीतून बराच वेळ सामान उतरवत वाहिला. दहा बाय बाराची खोली थोड्याशा सामानानंही भरलेली वाटू लागली.सगळं कुटुंब अगदी समोरासमोर जवळ आल्यागत.मोहिनीनं सामान लावला तो पावेतो अंधारलं. संपतनं बाहेरनं भेळ आणली.ती खाऊन व मोहिनीनं तर पाणीच पिऊन सारे झोपले.
दुसऱ्या दिवसापासून संपतराव विटा वाहणाऱ्या ट्रकावर जाऊ लागला. मोहिनी तूर्तास घरीच राहिली. आजुबाजुला लागून सर्व खोल्या. समोर दोन फुटाची कोर व तिला लागुनच फरशीनं अर्धवट झाकलेली व घाणीनं तुडुंब वाहणारी गटार.वास व डासाला कसलीच कमतरता नाही. सारे लोक कष्टाची कामं वा इतर अवैध धंदे करणारे.मोहिनीला कुचंबना व घुसमट होऊ लागली.खोलीत कितीही हळू बोललं तरी शेजारी सर्व ऐकु जाई व त्यांचही सारं ऐकू येई.
संपतनं श्रुतीला जवळच्या अंगणवाडीत टाकलं. आठ दिवसांतच श्लोकला सोबत घेत मोहिनी संपतरावासोबतच त्याच्याच ट्रकवर विटा भरण्यासाठी जाऊ लागली. संपतराव ही ट्रक चालवत विटा भरण्याचं ही काम करू लागे. एकदाची कामाची घडी बसली.धनाबापू मध्यंतरी काही लागलं की मदत करी. धनाबापूची परिस्थीती हलाखीची पण साधा सरळ माणूस.साफ दिलाचा व संकटात आपल्या परीनं मदत करणारा.संपत भाचा लागत असल्यानं मोहिनीस तो मुलगीच मानू लागला.
मोहिनी व संपतरावाची मजुरी व ड्रायव्हरचा पगार यानं महिन्यानंतर खोली भाडं देत व इतर सारा खर्च जाऊन पैसे शिल्लक दिसू लागले. मोहिनीस समाधान वाटलं.
एखाद वर्ष मोहिनीनं झोपडपट्टी असुनही तशाच जागी काढलं. पैसे गाठीला साठू लागले.पण ते दिसताच संपतराव आणखी शिथील होत दारूला सोकावला. मोहिनी विनवू लागली.सांगून सांगून कंटाळली.मग घरात वाद पेक्षा दिवसभर काम करून आल्यावर तीच थोडेफार देऊ लागली.
श्रुती पहिलीत दाखल झाली. आधीच्या व्यसनानं खंगलेलं शरीर सततच्या कामाची सवय नसलेल्या संपतरावाना साथ देईना. त्यात दारू सुरू झाली. तो वारंवार आजारी पडू लागला. त्यानं पुन्हा डाॅक्टरांना दाखवलं.पुन्हा मागचंच निदान. तो घाबरला.पण तरी त्यानं मोहिनीस काहीच वाच्यता केली नाही.तसाच औषधी घेत परतला. मग मोहिनीनं त्यास मजूरी करण्यास थांबवलं. आता तो फक्त ड्रायव्हरकीच करू लागला.त्यात धनाबापूनं वरचेवर आजारी पडतोय म्हणून विटाभट्टीच्या ट्रकवरून काढत त्याला फळांच्या ट्रकवर लावलं. निदान दिवसभर ग्रामिण भागात मोकळ्या हवेत राहील व फळं खात तब्येत सुधरेल.
फकिरा शेठ नाशिकमधला एक श्रीमंत व्यापारी. पुऱ्या नाशीकमध्ये अनेक वीटभट्टे, सिमेंट, रेती, लोखंड सप्लायर्सच्या दुकानी व अनेक फळांची खरेदी करणारा व्यापारी.द्राक्ष, पपई, बोर, सिताफळ,केळी, आवळा असे अनेक फळांची खरेदी करत मुंबई, दिल्लीला ट्रकनं रवाना करी. सारे व्यवहार विश्वासू माणसाकडं सोपवत काम करी.नाव फकीरा पण गडगंज संपत्ती! तर त्याचाच एक गुमास्ता नाव धना पण बिचारा कफल्लक.पण कष्ट करण्याची तयारी व सचोटी.आधी हा धनाबापूस फकिरा शेठनं विट भट्टावर ठेवलं.मग नंतर ट्रकावर लक्ष ठेवायला.पण नंतर फ्रुट सेल वाढल्यावर धनाबापूस धुळे व नाशीकच्या सीमेवरील गावातून फळ खरेदीसाठी नेमलं.
धनाबापूचं गाव नेमकं त्याच परिसरात. खर्डी हे त्यांचं गाव व आजुबाजूची दहा - बारा गावं.या परीसरात जमीन अगदी मध्यम व हलक्या प्रतिची लालसर मुरमाड.पण ठिबकच्या पाण्यावर शेतकरी बोर, डाळींब, आवळा, सिताफळ, व मध्यम जमिनीत केळी व पपई भरघोस काढू लागले होते.नाशीक मधून कांदा ,डाळींब,द्राक्षे खरेदी करणाऱ्या फकिरा शेठनं धनाबापूस कामाला लावत या भागाकडं पाठवलं.दिवाळीपासुन कांदा सिताफळ पासुन सुरूवात होऊन मग आवळा, बोर, पपई, केळी अशी कायम खरेदी करत ट्रकाच्या ट्रका माल धनाबापू पाठवू लागला.याच ट्रकवर त्यानं संपतला सुरू केलं.फळं तोडण्यासाठी मजुर नाशिकमधल्या झोपडपट्टीतूनही नेत वा सिझननुसार स्थानिक मजूर उपलब्ध असलं की ते ही लावतं.
मोहिनीच्या संसाराची घडी बसू पाही तर कधी मध्येच आचके खाई. श्रुती वरची इयत्ता चढू लागली. पण मध्येच संपतरावाची तब्येत पुन्हा डोके वर काढी. आता विटांचं काम बंद असलं की मोहिनीही फळांच्या ट्रकवर पपई, बोर, सिताफळ, तोडायला जाई. संपतरावास जास्तच त्रास जाणवू लागल्यानं मोहिनी स्वत: त्याच्या सोबत जाऊ लागताच तो टाळू लागला. तिला शंका आली .ती सोबत गेलीच. डाॅक्टरांनी सारं सांगताच मोहिनीला धक्काच बसला.ती डाॅक्टरांना हात जोडत " यांना आधी तर असलं काहीच नव्हतं नी मग अचानक ...! आपण नीट तपासा.कदाचित निदान."
डाॅक्टरांनी सरळ स्पष्ट सांगत "यांना कधीचा त्रास असावा हा! तुम्हास सांगितलं नसावं. किंवा अंगावर सोसत आहेत." मोहिनी संपतरावास घेत घरी आली. खल्लास ! सारा खेळ खल्लास! विधात्या का हे माझ्याच नशिबी! दोन्ही किडन्या कामातून...
एक आधीच गेलीय व दुसरी ही आता...!
आता मात्र मोहिनी हरली! सारंच संपलं असं तिला वाटू लागलं.
सध्याकाळी दोन्ही पोरं जवळ आली.तिला बिलगत होती. पण त्यांना जवळ घ्यावं असही वाटेना.मथाबाईला तर आता चालणं ही मुश्कील होत होतं. तरी मोहिनी सारा गाडा ओढत होती.तिला कष्टाचं काहीच वाटेना .पण सारथी.. तो कसा का असेना! तो सोबत असल्यावर तिला राबण्यात अर्थ वाटे.म्हणून लग्नापासून रंगेल, बेवडा, पत्त्याचा शौकीन असुनही ती राबत आली होती.कारण तिला आशा होती कसा ही असला तरी साथीला आहे व सुधरेल कधीतरी! पण आता तोच जर सोडून जाईल तर मग का जगावं? मोठं प्रश्न चिन्ह? संपतराव खाटेवर वरच्या पत्र्याकडं पाहत शून्यात हरवलेले.चेहऱ्यावर सारं काही संपल्याची भयाण भेसुरता.
पोरगं श्लोक आई काहीच बोलत नाही म्हणून तसंच खाली झोपलं.
" मोहिनी पोरं तशीच संध्याकाळच्या लक्ष्मी येण्याच्या वेळी झोपलीत गं! हे चांगलं नाही,उठ नी त्यांना जेवण कर काहीतरी!" पडल्या पडल्या सासुबाई क्षीण आवाजात ओरडल्या.तिला याची कल्पना ही नाही.
पण घरचा नारायणचं सोडून जाऊ पाहतोय तर लक्ष्मीनं काय करावं? अशा सवालातीनं मोहिनीच्या डोळ्यात गंगा यमुना वाहू लागल्या. ती तशीच उठली. दोन - तीन भाकरी बडवल्या पिठलं घेरलं व पोरांना ,सासु व संपतरावास जेवू घातलं. सारी झोपली. ती पाय मोकळे करून येते सांगत बाहेर निघाली. बोळ ,गल्ली, करत रस्त्याला लागली. कुठं? गोदामाई?,रेल्वेस्टेशन? की पुल? ठरता ठरेना! पण तिला आज ठरवायचंच होतं.कारण एक चाक निखळतंय तर दुसऱ्या चाकानं थांबून काय उपयोग? तिनं ठरवलं रेल्वे स्टेशनच चांगलं.तडकाफडकी वासलात! ती चालू लागली. ....
स्टेशन आलं .पिवळ्या भगभगत्या प्रकाशात गर्दी असुनही तिला शांतेचा भास होत होता. तरी ती गर्दी टाळत फलाटावरून पुढं सरकू लागली. समोरून भन्नाट वेगानं गाडी येत होती.साधायचा वेग नी....! पण तितक्यात जवळच्या लिंबाच्या झाडाखाली तिला दोन मुलं दिसली .आठेक वर्षाची मुलगी व पाचेक वर्षाचं पोर.ती अचानक थांबली.जाऊ दे ही.निर्णय पक्का तर ही काय नी दुसरी काय! थांबू थोडं. तीनं कपाळावरचे घर्मबिंदू पदरानं पुसले.
पोरगं रडत होतं.मुलीनं त्यास कडेवर उचललं.ते उचललं जात नव्हतं. त्याचं नाक बहुतेक शेंबडानं पूर्ण भरलेलं होतं.अंगावरच्या कपड्याच्या चिंध्या झालेल्या. ती पोर त्यास घेऊन निघाली. मोहिनी थांबली व थोड्या अंतरावरील बाकड्यावर बसली.काही अंतरावर चार पाच माणसं फलाटावरच बसत बांधून आणलेलं जेवण करत होती.पोरीनं मुलास खाली उतरवलं.पोरगं खाणाऱ्याकडं लाळ गाळत, जीभ फिरवत टुकुरटुकुर पाहू लागलं. मुलगी जवळ सरकत उभी राहिली.तोच येणाऱ्या गाडीची अनाउंसिंग होताच खाणारे उठले.त्यांनी उरलेल्या पोळ्या व भाजी समोरच्या कोपऱ्यात टाकली. तोच त्या मुलीनं पळत जात ते उचललं. ते दोन्ही खुशीत परत येत निंबाच्या झाडाखाली बसले व ती पोर त्याला भरवू लागली. मोहिनीला अचानक त्या पोरांमध्ये काही तरी दिसलं.क्षणात ती उठली जाणारी गाडी तशीच जाऊ देत ती घराकडं पळाली.घरात सासु घोरत होती .श्रुती आजीजवळ तर श्लोक नवऱ्याच्या पायात उलटा शांत पहुडला होता.तिनं रडतच दोन्ही पोरांना उचलून आणत खाली जवळ कुशीत घेत पटापट पापे घेतले व ती रडू लागली.झोप चाळवताच श्लोक उठला व आईच्या पदरात घच्च मिठी मारत झोपला तर मागून श्रुती झोपेत बिलगली. लेकरांना पदरात सामावत तिनं निर्धार केला रथाचं एक चाकच काय पण पूर्ण रथ जरी निखळला तरी या बछड्यासाठी मी लढेन व लढण्यासाठी जगेन!
वासुदेव पाटील