भाग २
धरमदास लहानपणापासुनच दमेकरी.तरुणपणात दम दबला गेला. दहावी होताच दूर नवापूर तालुक्यातील चक्करबर्डी जवळच्या आश्रमशाळेत शिपाई म्हणून लागताच घरच्यांनी त्याचं जसोदीशी लग्न करून दिलं.
लग्नानंतर जसोदीचं पोटपाणी पिकेना .सर्व डाॅक्टरी ईलाज झाले. मग वैद्य ,काढा, धागे, गंडेदोरे झाले.जसोदा - धरमनं मूलबाळ होईल ही आशा सोडली.पण म्हणतात ना, माणूस जिथे आशा सोडतो तिथूनच नविन सुरूवात होते.लग्नानंतर पंधरा- सतरा वर्षानंतर जसोदीस मुलगी झाली. 'मोहना ' नाव ठेवलं.पण वयाची चाळीशी पार केल्यानं दमानं उचल खाल्लेली व मुलबाळ नसल्यानं मोहना येण्याआधीच धरम पुरा व्यसनाधीन झालेला.
"अरे धर्मू! मव्हाची घेत जा ,तुझा दम कापून काढण्याची ताकद तिच्यातच आहे!" असले फुकट सल्ले देणारे भरपूर.दम कापण्यासाठी औषध म्हणून मव्हाचं चेटतं फुल घेणाऱ्या धर्मूचा दम तर कापला गेलाच नाही पण मव्हाच्या बाटलीनं त्याच्या शरीरालाच कापावयास सुरुवात केली.धर्मू पिद्दड झाला. मग त्यात पत्त्याचं व्यसन जडलं. कर्जबाजारी झाला.पतपेढी, सोसायटी,बॅंक धुंडाळल्या गेल्या.कर्ज हफ्ते जात हातात येणाऱ्या पगाराच्या पैशात महिना चालवणं मुश्कील. मग जसोदा व नंतर हाताशी आलेली मोहना शेतीत राबत संसार चालवू लागल्या. मोहना वयात आली नी धर्मू निवृत्त झाला. किरकोळ रक्कम वगळता धर्मू साठ वर्षाच्या सेवेत कफल्लकच राहिला.देणी देऊन उरली फुटकळ रक्कम मोहनाच्या लग्नासाठी त्यानं मुदत ठेवीत ठेवली.देहाचं चिपाड झालेला दमेकरी धर्मूनं शेवटी पत्याचं व्यसन सोडलं पण तो पावेतो उशीर झालेला.त्यातच उतार वयात जसोदीस फिट यायला लागलं.काही थोडंही टेंशन आलं की हात पाय आखडतं, तोंड वेंगाळत घरात लोळू लागे.घराला तुटपुंजं पेन्शन! त्यात धर्मूची दारू, जसोदीचा दवाखाना यानं कुतर ओढ होऊ लागली.म्हणून गाजरे गुरुजी व नंतर आलेल्या मोहन गुरुजींची खानावळ त्यांनी लावलेली.ती एक थोडी मदत. मोहना कधी लाकडाची मोळी विक,शेतात मजूरी कर, अशी कामं करत म्हाताऱ्या आई-वडिलांना ओढत होती.
आपल्याच वयाचे मोहन गुरुजी आले .व तिनं शाळेत गाजरे गुरुजींचा डबा द्यायला जाणंच बंद केलं. एकतर वडिलांना पाठवे किंवा गाजरे गुरुजीच स्वत: येऊन घेऊन जात.नवख्या मोहन गुरूजींशी ती अंतर राखूनच राहू लागली.त्यामुळं मुळातच सु स्वभावी व सच्छील वर्तनाचे असुनही मोहन गुरुजी कसे आहेत हे समजून घेणं तिला जमलंच नाही व तिला ते गरजेचं ही वाटल नाही. वस्तीतले तर तिच्या नादीच लागत नसत.सुंदर देखणी मोहना गरीब असली तरी मानी व फटकळ असल्यानं तिच्या वाटेला कुणीच फिरकेना.
एका वर्षात मोहन गुरूजीनं शाळेचा कायापालट केल्यानं गावात त्यांना लोक मानू लागले.आपलं अडलेलं काम ,गरजा घेऊन ते मोहन गुरूजींचा सल्ला घ्यायला येऊ लागले.वस्तीतलेच एक निवृत्त शिक्षक- सावंत गुरुजी मुलं बडोद्याला असल्यानं ब्याराला राहत होते.त्यांची वस्तीत दोन तीन एकर शेती होती.शाळेच्या बदलत्या रूपानं खुश गुरूजी वस्तीत आले की मोहन गुरूजीला नक्की भेटत.त्यांनी आपलं शेत नफ्यानं देण्याबाबत मोहनला सांगितलं.जे काही उत्पन्न येईल ते निम्मं घेऊन शेती कसावी म्हणून ते शेत करणारा शोधत होते.मोहनला त्या सरशी धरमबाबा आठवला. आपण यांच्या घरचं अन्न खातोय,त्यांची फरफट तो ओळखून होता.तेवढाच त्यांचा फायदा.त्यांनं मध्ये पडत धरमबाबास विचारलं.पण आपण पडलो दमेकरी व उतरतं वय ;आपणास शक्य नाही.तरी जसोदी व मोहनास विचारून कळवतो, असं सांगत धरमबाबा घरी परतला.
कष्टाळू मोहनानं भांडवलासाठी मदत करणार असतील तर शेत कसायला तयार असल्याचं कळवलं.मोहनानं निवृत्त सावंत गुरुजीकडं अट टाकली पण त्यांनी मागच्या अनुभवांनी तोंड पोळल्यानं एक वेळ शेतातून काही आलं नाही तरी चालेल पण पैसा देण्याबाबत असमर्थता दाखवली.त्या वेळेस मोहननं आपण मदत करू हवं तर ,ठरवत शेत धरमबाबासच कसायला लावलं.
पावसाळा येताच मोहननं दिलेल्या भांडवलातून धरमबाबानं मका-खिरा(काकडी) चं बियाणं ,खत आणलं.मोहनास मोहन गुरुजी भांडवल पुरवतोय हे माहीतच नव्हतं.तिला वाटलं शेत मालकच पुरवत असेल.
मका ,खिरा लावला.पाऊस बरसू लागला तशी पिकं तरारली.मोहना निंदणी करणं, खत देणं अशी कामं करत पिक वाढवू लागली.येणारा मका - खिरा स्टेशनातील फेरीवाल्यांना विकता येईल व राहिलेला मका नंतर बाजारात विकता येईल असा तिचा बेत होता.औताची कामं धर्मू भाड्यानं औत लावून करवून घेई.
पण याच धांदलीत एक भानगड उद्भवलीच.कंपाऊंड करतांना वस्तीतल्या ढोलूशेठचं नुकसान झाल्यानं तो मोहन गुरूजीबाबत सापागत डूख धरून योग्य वेळेची वाट पाहत बसला होता. वेळ येताच फणा काढून डंक मारण्याच्या तयारीतच तो होता.
मोहन, मोहनापेक्षा पाचेक वर्षांनी मोठ्या ढबू शेठची जमीन शाळेला लागूनच मागच्या बाजूस होती.दक्षिणमुखी शाळेची इमारत पुर्व पश्चिम बांधलेली.शाळेच्या उत्तरसिमेला लागूनच याचं क्षेत्र.त्याच्या मळ्यात जाण्यासाठी वहीवाटी वाट वस्तीला वळसा घालत दोनेक किमीच्या फेऱ्यातून नदी उतरून जाणारी.त्यात नदीला पावसाळ्यात पाणी असलं की खत घेऊन जाणं खूपच मुश्कील.पण जो पावेतो कंपाऊंड नव्हतं तो पावेतो शाळेच्या पश्चिम भिंत व धर्मूचं घर यात जो बोळ होता त्या बोळानं त्याला थेट मळ्यात पाच मिनीटात जाता येई. व तो त्याच वाटेनं वापरत असे.
कंपाऊंडच्या बांधकामावेळी जो उतारा काढला त्यात ती वाटच नसल्यानं व मागेही दहाफुटापर्यंत शाळेचीच जागा असल्यानं कंपाऊंड मध्ये ढोलुची वाट ही गेली व मागचं बरचसं शेत ही.पण त्या वेळेस प्रशासकीय कामात अडथळा आणण्याची त्याची हिंमतच झाली नाही व ते बेकायदेशीर ही होतं.तो काहीच बोलला नाही पण हे जे सारं घडलं ते या नवट्या मोहनमुळंच .शिवाय त्या वाटेनं जाता येता त्याला मोहनाही दिसे.ते ही बंद झालं.
तो गुरूजींची खानावळ धर्मूकडं आहे हे तो जाणून होता व आता तर मोहन गुरुजींनं मोहनास शेत ही कसायला मिळवून दिलंय.त्याला तर मोहन सलतच होता हे आयतंच कारण त्याला मिळालं.तसेच मोहना कुणालाच भीक घालत नसल्यानं त्याला ही उभं करण्याचा प्रश्नच नव्हता .त्यामुळं तो मोहनावर ही काट खात होता.म्हणुन त्यांनं मोहना करवीच मोहनचा काटा काढण्याचं ठरवलं.
त्यानं धर्मूबरोबर पिणारा त्याचा मित्र पकडला. त्याला गोंजारत सोबत पित पाजु लागला. "गज्जू काका तुम्ही एवढे सालस नी सच्छील देवमाणूस,नी त्या धर्मुबरोबर का राहता हो?" त्यानं पहिलं पान टाकलं.
"का काय झालं रे ढोलू?धर्मू तर माझा दोस्ती माणूस आहे!" गज्जू सरळ बोलला.
" काका तुम्ही सरळ म्हणून तुम्हास सर्व साधी वाटतात!"दुसरं पान मुद्दाम जुगाराचं टाकलं.
" हे बघ ढोलू मी जसा साधा तसा मा..झा दोस्..ती धर्मू साधा!"
" धर्मूदादा तर साधाच आहे काका; पण त्याची ती पोर...."
" का क्काय झालंय !ती मोहना तर वाघीण आहे!"
" तसं नाही काका पण त्या वाघिणीला मोहनसारखा कोल्हा फूस लावतोय ना!"
" गज्जन काकानं उरलेली घटघट एका दमात पित बाटली बाजुला केली.
"क्काय ,तो साधू मास्तर नी मोहना!ढोल्या काय बरडतोस?"भुवया वक्र होऊ लागल्या.
" काका समजवा तुमच्या दोस्ताला.नाहीतर पोर हातची जायची! उगाच का मास्तर त्यांना शेत कसायला मिळवून देतोय, भांडवल देतोय? तुमच्या आमच्यासाठी देईल का? नाही ना.मग धर्मूलाच मदत देण्यामागे तीच तर मेब आहे. "
गज्जनला किक बसली.ढोलूनं आपण बाजुला राहत धर्मूपर्यंत वावडी जाईल ,असा वारा उफणवला.
दुसऱ्या दिवशी पिण्या आधीच गज्जननं धर्मूजवळ मोहनाबाबत विश्वास आहे पण तरी लक्ष ठेवण्याबाबत सांगितलं.धर्मूनं आपलं बावनकशी सोनं असल्यानं त्याकडं दुर्लक्ष केलं.पण मव्हाची चढली नी गज्जूनं सारं सांगत दारूच्या सुरुंगाला बत्ती दिली.धर्मूनं 'असं तुला कोणी सांगितलं? 'विचारताच गज्जननं ढोलूचं नाव ही सांगितलं.
धर्मू घरी आला व दारूच्या नशेत मोहनाला जाब विचारू लागला.आधी तिनं हे हसण्यावारी नेलं.कारण तिला माहीत होतं आपल्याबाबत गावालाच काय पण वडिलांनाही माहीत आहे.पण जेव्हा नशेतल्या बाबानं मोहनास धर्मूनं ढोलूचं नाव सांगितलं त्या वेळेस तिचं पित्त खवळलं. तोच तिला गल्लीतनं ढोलू दिसला.ती उठली .घराच्या छताला खोसलेला धाऱ्या (कळकात बसवलेला कोयता) काढत भिंतीला ठेकवला. तिनं ढोलूस इशारा करत बोलावलं. तो यांच्या घरात काय वादळ उठलंय की नाही याचाच मागमूस काढण्यासाठी फेरी टाकायला आला होता.पण मोहनानं बोलवताच आणखी राळ उठवू ,या तोऱ्यात तो जवळ आला.तोच मोहनानं जवळचा धाऱ्या त्याच्या मानेला लावला.पाच सहा फुटाचं अंतर.पातं मानेवर लागताच तरणाबांड ढोलू असं काय होईल याची सुतराम कल्पना नसणारा अचानक थरथरला.
" ढोल्या काय रे स्वत: लाळ घोटतोस नी माझ्यावर आळ घेतांना लाज नाही वाटत! सांग तू कुठं पाहिलंस मला माती खातांना?" ती डोळ्यातून आग ओकत चवताळली.
मानेवरचं रूतणारं लवलवतं पातं पाहून त्याची बोबडी वळू लागली.
" मी क्कु..ठं...क्का..य बोललो..”
" खरं खरं भूक नाही तर पात सरळ खाली ओढत बोकडागत कापीन!"
" मी ...तस्सं...तो मास्तरच.... बोलतांना ऐकलं..नी तेच गज्जू काकास सांगितलं"
'मास्तर बोलल्याचं ' ऐकताच क्षणभर तिची धाऱ्यावरची पकड ढिली झाली नी ती संधी साधत पातं झुकवत ढोलू भिन्नाट पळाला.
मास्तरानं का बोलावं असं? त्याच्या वाटेला आपण नाही नी तो ही कधी आपल्या वाटेला नाही? फक्त डबा देणं व त्यानं ही तो साळसूद खाणं इतकाच संबंध! नाही म्हणायला पहिल्यांदाच वस्तीत आला तेव्हा मोळी डोक्यावर चढवली तीच नजरानजर.नंतर नजरानजर झालीही असेल, क्वचित बोलणं झालं ही असेल पण कधीच भाव दिसले नाहीत ; मग? की हा ढोल्याचं वावडी उठवतोय? पण मग त्यानं मास्तराचंच नाव का घ्यावं? की तारूण्यसुलभ मास्तरानंच विषय चघळला असावा? असेल असंच असेल त्या शिवाय ढोल्या बोलणार नाही व कधीच आपल्यावर न चिडणारे बाबापण आपणावर चिडले. तिनं मास्तरालाच वठणीवर आणायचं पक्कं ठरवलं.
मोहन मास्तर नेमकं तीन दिवसांपासून अकोल्यास आश्रमात गेले होते. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या रेल्वेने परतले.स्टेशनातून पायी येत पाच वाजता झुंजुमुंझूतच ते आले.गाजरे गुरुजीनं किल्ली सवयीप्रमाणं धर्मुबाबाकडंच ठेवली असेल म्हणून ते किल्ली घ्यायला गेले.धर्मु बाबा नदीकडं फिरायला गेलेले.जसोदाकाकी उठलीच नव्हती.गुरूजी दार ढकलणार तोच अंगणातल्या मोरीत अंघोळीला बसलेली मोहना उठली.क्षणाचा कित्येक हिस्सा भागात नजर नजरेला भिडली.रात्रीची आग त्यात हा भडका.मोहनाच्या तोंडावर साबणाचा फेस.तिने डोळे चोळतच उठत मोहनला पाहतांना पाहिलं नी खाली वाकत मोरीतला फेणा उचलला नी दात ओठ खात फिरकावला.मोहन हालला तरी कपाळावर बसलाच पण त्याचं नशीब मोहनाच्या हातात फेण्याऐवजी गडबडीत साबण आला होता.तरी जोरानं हाणलेल्या साबणानं कपाळावर सूजेची खूण आणलीच.मोहनची काहीच चूक नसतांना ,त्याला सकाळी सकाळीच मोहनाच्या आरतीचा प्रसाद मिळाला.तो किल्ली न घेताच माघारी फिरला.त्याला वाटलं थोड्या वेळात धर्मू बाबा वा जसोदा काकी येईल किल्ली घेऊन.तो स्वत:वरच डाफरला.आपणास कळायला हवं होतं.आपण एवढ्या पहाटेच कुणाच्या घरात जायला नको होतं ! गेलो तर गेलो निदान लांब उभं राहत आधी आरोळी मारायला हवी होती.आपली चुकच.तरी आपण क्षणात डोळे बंद करून मागे वळतच होतो की तोच क्षेपणास्त्र आलंच.त्यानं कपाळाला हात लावला. ठेंगूळ लागलं.काही वेळानं ओळखीच्या एका पालकाकडं जात त्यांनं अंघोळ व चहापान उरकलं.पण त्याची शाळेकडे यायची इच्छाच होईना. पालक जेवणाचा आग्रह करत असतांना शाळेची वेळ झाल्यानं तो न थांबता शाळेकडं आला. तो पावेतो गाजरे गुरुजीनं किल्ली आणत शाळा उघडून ठेवली होती.
सकाळी सकाळीच मोहनानं आईला तंबी दिली " आजपासून दोन्ही गुरुजीची खानावळ बंद.याद राखा डबा दिला तर!"
"अगं पण ते कुठं जातील जेवायला?"धरमबाबा घायकुतीला येत म्हणाले.
" मसणात जावो की उपाशी राहोत! काही घेणं नाही..पण डबा बंद म्हणजे बंद!" म्हणत ती तंबी देत शेतात निघून गेली."
जसोदा नवऱ्यावर संताप करू लागली.
"काय गरज होती,त्या गज्जनराव व ढोल्याचं ऐकून सोनसरी सितेसारख्या पोरीवर बोल लावण्याची!आता भोगा फळं"
"अगं मला ही कळतं पण दारूच्या नशेत नको ते ऐकून डोक्याचा भुगा झाला नी बरळलं गेलं माझ्याकडून.पोरीचा राग शांत झाला की करेल ती डबा .आजच्या दिवस सांभाळ तू!"
" मी त्या गुरुजींना कोणत्या तोंडानं 'डबा बंद' सांगू सांगू? त्या पेक्षा मीच शेतात चालले." म्हणत जसोदी शेताकडं निघाली. मग धर्मू ही शेतात निघून गेला.दुपारी डबा न गेल्याने व दार बंद असल्यानं दोन्ही गुरुजींनी शाळेचा वरण भात खाल्ला.गाजरे गुरूजींना पाच सहा वर्षात असा प्रसंग आला नसल्यानं त्यांना अचंबा वाटला. मोहनने मात्र सकाळचा सारा प्रसंग गाजरे गुरूजींना कथन करत जे झालं ते अनावधानानं व अचानक झाल्याचं सांगत त्याबाबत पश्चात्ताप ही केला.पण मोहन कसा आहे हे माहीत असल्यानं गाजरे गुरूजीनं धीर देत मी समजूत घालतो मोहनाची , सांगत मोहनला निश्चींत केलं.
रात्री गाजरे गुरुजी घरी गेले. तोच मोहना कडाडली .
" गुरुजी आजपासून तुमच्या डब्याची सोय तुम्ही बघा . शेतीच्या कामानं आता आमचं जमणार नाही"
तोच धर्मूनं गुरुजीस बाहेर शाळेकडं आणत विनवणी करत " गुरुजी पोर संतापलीय दोन चार दिवस थांबा होईल सारं सुरळीत" समजावलं.
त्याचंच मन त्याला खात होतं की आपण कुठून प्यालो नी त्या ढोलूचं ऐकून पोरीवर आळ घेतला,ते ही मोहन गुरुजीसारख्या देव माणसाच्या नावानं.
गाजरे गुरुजीला वाटलं की मोहन तर तसा नाही पण मोहना इतकी संतापली तर मोहनकडंन तारूण्यसुलभ वयात काही चूक तर घडली नसावी? पण छे! मोहन नाहीच तसा. तर मोहनला वाटलं की नको त्या गोष्टीचं मोहनानं का इतकं भांडवल करावं? पण यात ढोलूचा खोडा त्यांना कुणालाच माहितच नव्हता.
ती रात्र दोघे उपाशीच झोपले.दुसऱ्या दिवशी मोहन, गाजरे गुरूजी यांनी वस्तीतून तात्पुरती भांडी मागून व किराणा करून स्वत: 'थापड सजना' सुरू केलं मग शनिवारी सोनगडहून सर्व बाजार करत त्यांनी स्वत:च स्वयंपाक सुरू केला.पण जसोदा व धर्मूदादास याचं अतोनात दु:ख झालं. नंतर दिवस जाऊ लागले तशी मोहना समजली की मोहन गुरुजीच्या मनात काही असतं तर त्यानं आपल्या बदलत्या वागणुकीचं उट्ट काढलंच असतं.पण तरी ती सावध राहत संबंध ठेवतच नव्हती. मोहन मात्र काहीच झालं नसल्यानं साबणाचं प्रकरण विसरला व धर्मूबाबाशी पूर्ववतच सहकार्य करू लागला.मध्यंतरी शेतीस लागणारं भांडवल ही पुरवतच होता.मात्र मोहनाशी कोसो दूर अंतर ठेवूनच.कारण नंतर त्यानं गावकऱ्यांकडून मोहनानं ढोलूच्या मानेवर कसल्या तरी कारणानं धाऱ्या ठेवल्याचं ऐकलं.त्यावर मनोमन बरं त्या मानानं आपणास साबणच मारला! पण तरी आपली चूक नसल्यानं तो वार त्याला सलत होता.त्यात ढोलूच्या मानेवर धाऱ्या ठेवण्यामागं आपणच होतो हे तर त्याला ठाऊकच नव्हतं.
मध्यंतरी धर्मूनं पुन्हा डबा सुरू करण्याबाबत विनवलं पण मोहननं नम्रपणे साफ नाकारलं.
वासुदेव पाटील....