भाग १०
दिवाळी पाच सहा दिवसावर येऊन ठेपली.सुट्या लागायच्या आधीच बदलीचा आदेश आला.या वर्षी बदल्यात बराच घोळ व वादंग झाल्यानं आदेश यायला दिवाळी आली होती.
बारा वर्षांपूर्वी मोहन गुरुजीनं चक्करबर्डी सोडली व मध्यप्रदेश सिमेलगत शिरपुरमध्ये रुजू झाले.शिरपूरमध्ये बारा वर्षात तीन शाळा बदलल्या तीन ही शाळा आदर्श व गुणवत्ता पूर्ण करत जलस्वराज अभियानं, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान या अंतर्गत उत्कृष्ट काम करत तीनही शाळेंना पुरस्कार मिळवले होते.
चक्करबर्डी सोडली तेव्हा जिल्ह्याचं विभाजन झाल्यानं मोहन गुरूजी त्यावेळी धुळ्यात कार्यरत असल्यानं धुळ्यातच राहिले.
बदलीचा आदेश येऊन चार दिवस झाले. धुळे व नाशिक सिमेजवळील खर्डी गावास बदली झाल्यानं मोहन गुरूजींनी परवा निघायचं ठरवलं.कारण शेवटचा दिवस नी मग दिवाळीच्या सुट्या लागणार.
बारा वर्षात मोहनला काकाजी व ज्या ज्या शाळेत सेवा केली त्या ठिकाणी अनेक चांगल्या माणसांशी, शिक्षकांशी ऋणानुबंध जुळले ,त्या साऱ्यांनी लग्नाचा आग्रह करत समजावलं.पण मोहन गुरूजी फक्त स्मित हास्य करत तर कधी नम्रपणे नकार देत टाळत आले. काकाजींनी तर परोपरीनं समजावलं.पण उपयोग होईना. "काकाजी मला आता त्या मोहात नका अडकवू!" सांगत नकार देत आलेला.मोहन सुटीत अकोल्यालाच येत काकाजींना मदत करी. आतापर्यंत काकाजींनी कामाचा विस्तार करत चार अनाथालय, दोन वृद्धाश्रम व दवाखाना सुरू केलेला.मोहन पुर्ण सुटी तिथंच सेवेत घालवी. व या जिल्ह्यात असं कुणी असलं की त्याला सर्वतोपरी मदत करत तिकडं पाठवी.काकाजी आता थकत चालल्यानं ते मोहनला नोकरी सोडून इकडंच लक्ष देण्यास विनवू लागले.पण मोहनला इकडंचं काम ही सेवाच आहे व येणारी कमाई (पगार)तो आश्रमातच देई. म्हणून काकाजीकडून काम होतंय तो पर्यंत तो ही नोकरी करतच होता. परवा खर्डीला रुजू होण्यासाठी निघायचं ठरवत तो निरवा निरव करू लागला.
आज खर्डीत दिवाळी पर्वास सुरुवात झाली. सायंकाळी गोवसु बारस असल्यानं मोहिनीनं घरात वरती खोवलेले हातमोडे ( बाजरीची कणसं) काढत कामावर जाण्यापूर्वीच कुटत तयार करून जात्यावर दळलं. संध्याकाळी आलं की गाईची पुजा करतांना गोग्रासकरिता ते लागेल व ऐनवेळेस घाई नको म्हणून ती सकाळी लवकर उठून तयारी करत होती. श्रुती व श्लोकनं कुणाकडं दिवाळीचा तयार होणारा फराळ पाहिला होता व ते आईस फराळासाठी आणि फटाक्यासाठी विनवत होते.संपतरावाच्या आजारपणामुळं व परिस्थितीमुळं दिवाळी ती विसरलीच होती पण आता संपतराव जाऊन दोन वर्षे झाली होती व पोरांची आस नको मोडायला म्हणून तिनं संध्याकाळी कामावरून आली की फराळ व फटाके देते असं आश्वासन दिलं. कालचं मजुर लोकांकडून शेतात 'फकिर शेठ दिवाळीसाठी फराळाचे बाॅक्स वाटणार आहेत ' ही चर्चा तिनं ऐकली होती म्हणून ती पोरांना आश्वासन देत कामावर निघत होती.आजच फक्त सिताफळ तोडणीचं काम होतं मग दिवाळीचं आठ दिवस काम बंद होणार होतं.ती घराबाहेर पडतांना घराच्या उंबऱ्याला ठेचकाळली.पायाची अंगठी ठेचकाळताच तिला सणक गेली.
" आई जाऊ दे ना गं.आज घरीच रहा ना! " श्लोक रडत म्हणू लागला.
अंगठीची सणक कमी होताच त्याला जवळ घेत " बाळा फक्त आजच मग हवं तर मी नाही जाणार कामाला बस्स! नी तुला संध्याकाळी बघ काय काय आणते खायला!" सांगत समजावू लागली.पण श्लोकला आज काय वाटत होतं कुणास ठाऊक त्याला मांडीवरून उठावसं वाटेच ना!
बाहेर ट्रक सुरु होताच ती घाई करू लागली.
" श्लोक! आईला जाऊ दे, मी आहे ना!" श्रुती त्याला समजावत म्हणाली.
"हे ऐकून मोहिनीला श्रुती आता समजदार व्हायला लागल्याची जाणीव झाली. " बघ श्रुतीचं ऐकत जा नी शाळेत जा!" मोहिनीनं त्याची समजूत घातली.पण उंबऱ्यात ठेचकाळली तेव्हा तिच्या मनात पाल चुकचुकली.टाळावं का सणासुदीचं आज कामावर जाणं! पण आता पुढचे आठ दिवस काम बंद राहिल मग आजचा दिवस जाऊच; असा विचार करत ती निघाली. अंगणात येताच " आत्या येतेय मी पोरावर लक्ष ठेवा!" जोरात सासुबाईस म्हणाली व ट्रकवर बसली. ट्रक निघाला दोन्ही पोरं अंगणातून तिला पाहत हात हलवू लागली.तिच्या मनात नकळत आज आपण सणासुदीचं खूप दूर चाललोत असे विचार तरळू लागले.पण अचानक कुणीतरी आपलं आवडतं जवळ येतंय असा ही भास चालत्या गाडीत तिला होऊ लागला. ती गाडीत शांत बसत विचारात तल्लीन झाली. कुणीतरी आपलं जवळ येत आहे व आपण त्याक्षणी दूर दूर निघतोय अशी उदासवाणी भावना तिच्या मनात दाटू लागली. कोण आपलं जवळचं येत असावं. संपतराव? मग ते जर जवळ येत आहेत तर मग आपण दूर का पळतोय? ती चपापली.ते विचार झटकण्यासाठी ती ट्रकच्या मागच्या फालकाजवळ उभी राहत खाली पाहू लागली.जमीन वेगानं मागं मागं धावत होती. अगदी तशीच की आपल्या मागं ही कुणी तरी वेगानं येतंय व आपण मात्र निघून चाललोय! फक्त दिशा उलटी! पण कोण? कोण? मोहन? तिचे डोळे पाणावले. तिनं बोटातल्या अंगठीवर बोटं फिरवली. मोहननं लग्नात दिलेली.व तिनं ही या बारा-तेरा वर्षात ती जिवापाड जपलेली.किती तरी उदास रात्रीत या अंगठीनंच तिला ऊर्जा दिली होती. ती मोहनच्या विचारात गडली.संपतरावावर ती प्रेम करू लागली होती व जिवापाड जपत होती. तरी तिला ज्या ज्या वेळी एकटं वाटे त्या त्या वेळी सर्वात आधी मोहनच तरळे. आजही उंबऱ्यास ठेचकाळली व तिला भेसूर वाटू लागलं तर तेव्हापासून तिला मोहनच तरळत होता.
शेत आलं नी दिवसभर सिताफळ तोडत मजुरांनी कॅरेटनं गाडी भरली.चारच्या सुमारास धनाबापूनं फकिरा शेठकडून आलेले फराळाचे मोठमोठाले बाॅक्स वाटले.ते पाहून तिला पोरांसाठी सोय झाली म्हणून समाधान वाटले. गाडी मळ्यातून बाहेर निघताच माणसं कॅबिनमध्ये बसली.दोन तीन बाया पुढं बसण्यासाठी भांडू लागल्या.पण मोहिनीनं हुज्जत न घालता भरलेल्या गाडीत जाऊन मागं बसली.तोच त्या बाया ही आल्या. धनाबापूही मागच बसला.चार किमीचं अंतर खर्डीचं. मळ्यातून गाडी पाच- साडेपाचला निघाली. तीनेक किमीवर नदीकाठानं मुख्य रस्त्याला गाडी लागणार होती. नदी काठाच्या दरडीवर गाडी आली. एका बाजूला शेतं तर दुसऱ्या बाजुस खोल नदी.नदीपात्रात खडक.ड्रायव्हर लोडेड गाडी खटाखट गिअर उतरवत चढाव चढवू लागला.पण कच्च्या सिताफळच्या वजनाच्या भारानं नदीकाठाची दरड खचली नी बस्स! ड्रायव्हरनं आटापिटा करत गिअर उतरवत जोर दिला पण गिअर बदलतांना त्याक्षणी वेग मंदावला नी दरड अधीकच ढासळू लागली.कोसळणाऱ्या दरडीसोबत गाडी पलटी घेत नदीपात्रातल्या खडकावर जोराचा आवाज, आक्रोश, आरोळ्या , किंकाळ्या उठवत आदळली.काही बाया दूर फेकल्या गेल्या पण पोरासाठी फराळाचं खोकं हातातच धरून बसलेल्या मोहिनीचं प्रारब्ध की तिला पोरांसाठी असलेलं खोकं सोडून उडी मारता आली नाही ;देव जाणो पण ट्रकच्या फालक्याखाली खडकावरचं तिचं डोकं सापडलं.शरीर उलट्या ट्रकमध्येच सिताफळाच्या कॅरेटच्या ढिगात .
सारं खर्डी गोवसु बारसची तयारी सुरू करण्यापूर्वीच नदीकाठावर धावलं.पण ट्रक उलटा असल्यानं क्रेनंच लागणार होती.ट्रकचा मागचा माग धपाडाला लागून टेकला होता.काहींनी धपाड कोरायला सुरूवात केली.भराभर टिकाव फावड्या आल्या.धपाड कोरलं जाऊ लागलं.मग कॅरेट काढले जाऊ लागले.
घराच्या पायरीवर आई आता फराळ व फटाके घेऊन येणार म्हणून वाट पाहणारे श्लोक व श्रुती वाटेकडं डोळे लावून बसले होते. श्लोक तर गोडावूनमधल्या खोलीतच राहणाऱ्या बरोबरच्या पोरास मोठ्यानं सांगत होता." आता माझी आई फराळ व फटाके घेऊन येणार! मग मी मोठमोठे फटाके फोडणार!"
तोच धावत पळत दोनेक पोरं आली व श्रुतीला नदीकाठावर ट्रक पलटी झाल्याची बातमी देत तिकडं पळू लागली. श्रुतीनं श्लोकला आजीकडं देत रडतच सांगत वाऱ्याच्या वेगानं नदीकाठ जवळ करू लागली. माणसं जीव तोडून कॅरेट खाली करतच होती. श्रुतीला गर्दीत पलटलेला ट्रक ,ट्रकच्या फालक्याच्या बाहेर आलेला हात दिसला.रक्ताच्या थारोळ्यात व पांढऱ्या लाल चरबीगत चुऱ्यात अर्धवट बाहेर दिसणारा खोका त्याला पकडणारा दुसऱ्या हाताचा पंजा दिसला. हातातली अंगठी दिसली नी ओळखीची खूण मिळाली.तिनं सारा काठ दणाणणारा काळीज चिरणारा हंबरडा फोडला.जाणती माणसं "पोरांना का येऊ दिलं रे? त्यांना घराला न्या!" ओरडली.एका माणसानं श्रुतीला धरत मागे ओढण्याचा प्रयत्न केला. पण झटका देत ती गोळीगत सुटली व ते दिसणारे तुटके, रक्तानं व डोक्याची कवटी फुटून मेंदूच्या चुऱ्यातील हात धरत काळीज फाडून रडू लागली.धना बापूही मागंच बसला होता पण तो दूर फेकला गेला .तो खडकात न पडता रेतीत पडला. त्याचा पाय वाकून मुडला.असह्य वेदनानी तो तडफडत होता.पण त्या ही स्थितीत श्रुतीनं आईला ओळखलं म्हणजे पक्की मोहिनीच आहे.कारण चेहरा तर राहिलाच नव्हता व धड अजुन मध्येच दबलेलं.पण पोटचं पोरगं आईस अचुक ओळखतं.म्हणून धना बापूनही हंबरडा फोडला.
सारी कॅरेट उपसतांना मोहिनी व आणखी एक बाई जागीच गतप्राण झाल्याचं निदर्शनात आलं. जखमींना तात्काळ दवाखान्यात हलवलं. एक प्रेत बाहेर आलं पण मोहिनीचं धड गाडीत पण चेंदामेंदा झालेलं शीर फालक्याखाली होतं.क्रेन उशीरानं आल्यावर ट्रक बाजुला केला. व मोहिनीस काढलं.दोन्ही प्रेत शवविच्छेदनासाठी रात्री दहाला जिल्ह्याला गेली. हात धरून रडतेवेळी श्रुतीच्या हातात मोहिनीच्या बोटातील अंगठी अलगदपणे आली होती. ती धनाबापूनं घेत खिशात ठेवली.कारण या अंगठीचा प्रवास पोलीस, अनोरकर काकाजी , मोहन, मोहना श्रुती व धनाबापु असा झाला असला तरी ही जशी मोहनच्या उताऱ्यात आली तशीच श्रुतीच्या सातबाऱ्यात येणार होती......