Get it on Google Play
Download on the App Store

झंडा ऊंचा रहे हमारा

विंडीजच्या तोफखान्यासमोर भारतीय फलंदाजांचा टिकाव लागला नाही आणि "१९८३" च्या अंतिम सामन्यात "१८३" धावांत संघ गुंडाळला जाताच भारतीय पाठीराखे हिरमुसलेले होते. प्रत्येक बळी जाताच मैदानावर वाढणारा कॅलिप्सोचा ठणठणाट भारतीयांच्या काळजाला भोकं पाडत होता तर आपल्या संघाची दुरदर्शनवर दुरावस्था पाहून तमाम भारतीयांची "सागरा प्राण तळमळला" अशी स्थिती झालेली होती. तर दुसरीकडे भारताचा स्वस्तात खुर्दा झाल्याने विंडीजच्या ड्रेसिंग रूममध्ये शॅम्पेनच्या क्रेटसह  विजयोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलेली होती. तिसऱ्यांदा विश्र्वचषक कधी एकदा हातात घेतो यासाठी कॅरेबियन खेळाडू उतावीळ झालेले होते. भारतीय संघाकडे हा सामना वाचवण्यासाठी थोडीफार शिदोरी जरूर होती. 

तत्कालीन बोर्ड अध्यक्ष एनकेपी साळवे आणि कोषाध्यक्ष एम चिदंबरम यांनी अंतिम सामना जिंको अथवा हरो, भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूला २५०००/- रु. चे इनाम घोषित केलेले होते. मात्र अजिबात दडपण न घेता नैसर्गिक खेळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या सोबतच "एव्हरीथिंग टू गेन नथिंग टू लूज" चा कानमंत्रही देण्यात आलेला होता. कर्णधा‌र कपिलदेव ने सुतकात बसलेल्या सहकाऱ्यांना चुचकारत, फार मोठे ज्ञान न देता विंडीजला सहजासहजी सामना आंदण म्हणून देऊ नका, त्यांना प्रत्येक धावेसाठी संघर्ष करायला लावा, आपण यापुर्वी त्यांना दोनदा पाणी पाजलेले आहे याची आठवण करून दिली होती. भारतीयांना प्रेरित करणारी आणखी एक बाब होती. साखळी सामन्यात माल्कम मार्शलच्या बाऊंसरने दिलिप वेंगसरकरचे नाक फोडले होते आणि ९ टाक्यांसह वेंगसरकर इस्पितळात उपचार घेत होता. याच मार्शलने अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ११ व्या क्रमांकाचा फलंदाज आणि संघाचा लाडका बल्लू उर्फ बलविंदरसिंग संधूला तुफानी बाऊंसर टाकून त्याचा भेजा फ्राय केला होता. खरेतर मार्शलचा बाऊंसर कितीही चांगला असला तरी तो तळाच्या फलंदाजाला टाकणे नैतिकतेच्या विरूद्ध होते आणि यामुळेच पंच डिकी बर्ड यांनी मार्शलला भर मैदानावर खडसावले होते. अशा पार्श्र्वभूमीवर वेळ होती विंडीजचे "तारे जमीन पर" आणण्याची आणि भारतीय संघाचे इग्निशन ऑन करायची. यासाठी कौन कहता है आसमांमे सुराग नहीं हो सकता, बस एक पत्थर तबीयतसे उछालो यारों" हा शेर अमलात आणण्याची‌‌. सामना बघण्यासाठी कपिलची पत्नी रोमी भारताचा माजी क्रिकेटपटू यजुर्वेंद्रसिंग (ज्याच्या नावावर पदार्पणात सात झेल घेण्याचा विक्रम आहे) सोबत प्रेक्षकांत उपस्थित होती. मात्र भारताचा डाव कोसळताच यजुर्वेंद्रसिंग सामना सोडून चक्क शॉपींगला निघून गेला होता.

प्रसंग बाका होता, कपिलने मैदानावर उतरण्यापूर्वी बलविंदरसिंग संधूला विश्वासात घेतले आणि प्रेमाने समजावले. जर संदिप पाटील थर्ड मॅनला उभा असेल तर इनस्विंगर टाकायचा आणि जर तो फाईन लेगला असेल तर आऊटस्विंगर टाकायचा, कारण एकतर बलाढ्य विंडीजविरुद्ध भारताकडे असलेली धावसंख्या बकरीच्या शेपटासारखी होती‌,, "ना धड लाज राखली जात होती, ना माशा उडवल्या जात होत्या." तर दुसरीकडे संदिपच्या खराब क्षेत्ररक्षणाने सामना आपल्याला लवकर गमवावा लागू शकतो ही भिती होती. विंडीजची सुरुवात जगविख्यात सलामी जोडी गार्डन ग्रिनिज आणि डेस्मंड हेन्स करणार होते. या सलामीच्या जय विरू जोडीने अनेक मोठ्या आणि उपयुक्त भागीदारी करत विंडीजला अनेकदा विजयपथावर आणलेले होते. मात्र क्रिकेटमध्ये दरदिवशी "नवा गडी नवा राज" असतो हे विसरून कसे चालणार होते.

प्रचंड अनुभव असलेल्या ग्रिनिजने बलविंदरसिंग संधूला हलक्यात घेतले आणि त्याची स्थिती "आ बैल मुझे मार" ची झाली. संधुच्या इनस्विंगरला ग्रिनिज ओळखू शकला नाही आणि आपली बॅट वर करत त्याने चेंडू व स्टंपची गळाभेट घडवून आणली. वास्तविकत: विंडीजच्या टायटॅनिकला हे पहिले भगदाड होते परंतु समोर फलंदाजीचा महाराजा विव रिचर्डस येताच सामना एकतर्फी व्हायची चिन्हे दिसायला लागली होती. ऑफच्या गुडलेंथ चेंडूला मिडविकेटकडे टोलवणे असो की आखुड टप्प्याच्या चेंडूवर हुक मारणे असो, रिचर्डस फलंदाजीला आला की गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकसुद्धा त्याच्या फलंदाजीच्या प्रेमात पडत असे. आपल्या १७ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीतील या खेळाडूने कधीही हेल्मेट न घालता जगभरातील दर्जेदार वेगवान गोलंदाजांना आपल्या बॅटचे पाणी पाजलेले होते ‌ आपल्या ख्यातीला जागून रिचर्डसने भारतीय गोलंदाजांना बदडणे सुरू केले होते. त्याचे ऑन ड्राइव्ह, ऑफ ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह आणि हुक ने भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणे सुरू केलेले होते. प्रेक्षकांत गावसकरची पत्नी मार्शनिल सामना बघत होती आणि रिचर्डसचा रूद्रावतार पाहून तिने सिमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संदिप पाटीलजवळ गावसकर यांनी "अर्धातासाने शाॅपींगकरीता  स्टेशनजवळ यावे" असा निरोप धाडला तर कपिलची पत्नी रोमी रिचर्डसचा झंझावात पाहून प्रचंड संतापली आणि तिने थेट हॉटेलचा रस्ता पकडला होता. दुसऱ्या टोकाला मात्र डेस्मंड हेन्स अजिबात लयात नव्हता आणि मदनलालच्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरला बिन्नीकडे झेल देऊन तो बाद झाला. पहिले दोन बळी जातात भारतीय संघाच्या जिंकण्याच्या आशेला पालवी फुटायला लागली आणि मदनलालच्या रूपात कपिलला विघ्नहर्त्याचे दर्शन घडले होते.

हेन्स माघारी परतताच मैदानात टाळ्या आणि शिट्ट्यांच्या प्रचंड गोंगाटात आगमन झाले विंडीज कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांचे. सुपरकॅट, बिग सी नावाने प्रसिद्ध, ६ फुट ४ इंच उंचीचा, भक्कम शरीरयष्टीचा हा डावाखुरा खेळाडू विंडीजच्या मध्यफळीचा आधारस्तंभ होता. मात्र परिकथेतल्या राक्षसाप्रमाणे विंडीजच्या फलंदाजीचे प्राण रिचर्डस नावाच्या पोपटात दडलेले आहे हे भारतीय संघ विशेषतः कपिलदेव आणि मदनलाल चांगले जाणून होते. शिवाय रिचर्डसला आमिष दिल्याशिवाय हा आपला बळी देणार नाही याचीसुद्धा खात्री या दोघांनाही होती. तसेही सामना ६० षटकांचा असला तरी रिचर्डस हा सामना ३० षटकांचा असल्यासारखा वेगाने खेळत होता. मदनलालला मार पडताच कपिलने मदनलालला थांबवत  चेंडू दुसऱ्या गोलंदाजाकडे देण्याचा निर्णय घेतला आणि मदनलालला थोडावेळ विश्रांतीनंतर पुन्हा गोलंदाजी देण्याचे कबूल केलेले होते. मात्र त्यादिवशी मदनलालने बहुतेक टाईम ट्रॅव्हल केलेले असावे. रिचर्डसला चांगले ओळखून असलेल्या मदनलालने अखेर  हट्टाने कपिलकडून जवळपास चेंडू हिसकत आपल्या रनअपकडे जायला निघाला कारण यापुर्वीही त्याने रिचर्डसला बाद केलेले होते. मदनलालची मध्यमगती गोलंदाजी रिचर्डसचे आवडते खाद्य होते आणि मदनलालचा आखूड टप्प्याचा चेंडू पाहताच रिचर्डसच्या तोंडाला पाणी सुटले आणि त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्या चेंडूवर हुकचा फटका लगावला‌. हुक करताच  दरवेळी सिमारेषेबाहेर जाणाऱ्या चेंडूने यावेळी लांब न जाता उंचच उंच जाण्याचा निर्णय घेतला आणि इथेच विंडीज क्रिकेटचे साम्राज्य "खालसा" व्हायला तर भारतीय क्रिकेट "गरुडझेप" घ्यायला सज्ज झालेले होते.

क्रमश:,,,,,