वादळ वारं सुटलं वाऱ्यान तुफान उठलं भाग ०६
पिटर रॉसन, केविन करन यांच्या तुफानात श्रीकांत आणि संदिप पाटील सारखे तेज:पुंज दिवे मालवलेले होते. मात्र यानंतर खेळपट्टीवर कपिलच्या रूपाने अवतरलेले व्यक्तीमत्व साधेसुधे नसून मोठ्ठा हॅलोजनचा बल्ब होता. मुख्य म्हणजे तो एक निधड्या छातीचा नायक होता. शिवाय अशा तुफानाला काबू करण्यासाठीच जणूकाही हरियाणा हरिकेन कपिलदेव मैदानात उतरला होता. उंचपुरा, भक्कम खांदे, चित्याची चपळाई, जबरदस्त फिटनेस आणि लक्ष्यावर सतत बारीक नजर ठेऊन असलेल्या कपिलने सर्वात पहिले परिस्थितीशी समझौता केला. युद्धभूमीवर विरोधकांनी कब्जा केलेला होता आणि आमनेसामनेची लढाई निरर्थक होती. यावेळी गनिमी काव्याशिवाय दुसरा तरणोपाय नव्हता.
खरेतर नेविल ग्राऊंडची रचना थोडी विचित्र आणि लुप सारखी होती. खेळपट्टीच्या बाजूच्या सिमारेषा लहान-मोठ्या होत्या. याचाच फायदा पुढे कपिल जाऊन उचलणार होता. मात्र अशा वेळेस गरज होती ती *ठंडा करके खाओ* या नियमाची. तसेही सलामी वेगवान जोडी थोडी दमायला लागली होती आणि चेंडूनेही आपले वेडेवाकडे चाळे कमी केलेले होते. काहीही झाले तरी पुन्हा एकदा पानिपतचा प्रयोग होणार नाही याची दक्षता कपिल घेत होता. मुख्य म्हणजे करोनाचा मुकाबला करताना सोशल डिस्टंसिंग जितके महत्त्वाचे आहे तितकेच कपिलने झिम्बाब्वेच्या सलामी वेगवान जोडी सोबत ठेवलेले होते. तसेही *जिगरमा बडी आग है* सारख्या कपिलला काबू करणे कठीणच होते आणि न्युटनचा गतिविषक तिसरा नियम विसरून कसे चालणार होते. *झिम्बाब्वेच्या एक्शनला कपिलकडून रिएक्शन मिळणे क्रमप्राप्तच होते* आणि वेळेनुसार गोलंदाजांची कायनेटिक एनर्जी रूपांतर होऊन कपीलच्या बॅटमध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या रुपात परिवर्तीत झालेली होती.
५ बाद १७ धावांपासून कपिलने आपली धावयात्रा सुरू केली आणि यात मोलाची साथ दिली कर्नाटकच्या रॉजर बिन्नीने. या दोघांनी मिळून सहाव्या गड्यासाठी महत्त्वपुर्ण ६० धावांची भागीदारी केली ज्यात बिन्नीचा २२ धावांचा वाटा होता. मात्र या २२ धावांची किंमत २२ कॅरेट सोन्यापेक्षाही मौल्यवान होती. बिन्नी माघारी परतताच शास्त्रीबुवा मैदानात उतरले आणि अवघ्या एका धावेची भर घालून तंबूकडे परतले. जी लढण्याची जिद्द आणि मनिषा बिन्नीने दाखवली, ती रवी शास्त्रीकडून बघायला मिळाली नाही. पुन्हा एकदा भारतीय संघाची नाव गटांगळ्या खाऊ लागली आणि भारतीयांची धाकधूक आणखी वाढतच गेली.
*संकटकाळी कामी येतो तोच खरा मित्र* अखेर कपिलचा दिल्लीकर मित्र कपिलच्या दिमतीला आला आणि कपिलचे टेन्शन दुर झाले. *छोटी हाईट मोठी फाईट* असलेल्या मदनलालने १७ धावांची झुंजार खेळी करत आठव्या गड्यासाठी कपिलसोबत ६२ धावांची भागीदारी करत संघाला १४० पर्यंत पोहचवले. पुन्हा एकदा केविन करन भारतीय संघाच्या मुळावर आला आणि त्याने कपिलची उत्तम साथ देणाऱ्या मदनलाल ला हिरावून घेतले. इकडे कपिल रक्त आटवून डाव साकारत होता तर दुसऱ्या टोकाला गळतीमुळे त्याचा नाईलाज झाला होता. कपिलची साथ द्यायला १० व्या क्रमांकावर सय्यद किरमाणी मदतीला आला आणि यानंतर कपिलने फलंदाजीत टॉप गिअर टाकत सर्वांना अचंबित करून टाकले.
सय्यद किरमाणी सारखा विश्वासू साथीदार लाभताच कपिलच्या अंगात विरश्री संचारली आणि मग झिम्बाब्वे गोलंदाजांची सुपर धुलाई सुरू झाली. छोट्या बाजूला चौकार हाणून तर मोठ्या सिमेकडे एकेरी धावेला दुहेरीत तर दुहेरी धावेला तिहेरीत रूपांतर करत कपिलने मैदानावर कब्जा केला. ५ बाद १७ असतांना आणि कपिल नुकताच खेळपट्टीवर आला असतांना झिम्बाब्वे कर्णधाराला दुर्बुद्धी सुचली आणि त्याने सलामी वेगवान जोडीला आक्रमणापासून दुर केले आणि कळत नकळत बाजी भारताच्या बाजुने पलटायला सुरवात झाली. विकेटच्या सभोवताल आपला दांडपट्टा फिरवत कपिलने झिम्बाब्वे गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. १६ सणसणीत चौकार आणि ६ गगणचुंबी षटकार ठोकत त्याने विक्रमी खेळी केली. या खेळीत त्याने टेनिस टाईप फटके इतके जबरदस्त आणि जोराने ठोकले होते की डावाच्या अखेरीस त्याचे खांदे शरीरापासून अलग व्हायच्या मनस्थितीत होते.
कपिलच्या खेळीचे विश्लेषण केले तर पहिल्या ५० धावा त्याने २६ व्या षटकांत पुर्ण केल्या, दुसरे अर्धशतक केवळ १३ षटकांत तर तिसरे अर्धशतक १० षटकांत पुर्ण केले. कपिल आणि सय्यद किरमाणी यांनी नवव्या गड्यासाठी नाबाद १२६ धावांची भागीदारी करत भारताला ८ बाद २६६ या सुस्थितीत पोहचवले होते. आपले शतक पुर्ण होताच कपिलने बॅट बदलवली आणि शेवटच्या १६ षटकांत धावांचा पाऊस पाडला. कपिल आणि सय्यद किरमाणी यांच्या भागीदारीचा विक्रम तब्बल २७ वर्षे अबाधित राहीला अखेर २०१० ला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या लढतीत लंकेच्या एंजलो मॅथ्युज आणि लसिथ मलिंगा या जोडीने हा विक्रम मोडला. एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा कपिल हा पहिला भारतीय फलंदाज होता तर कपिलचा वैयक्तिक १७५ धावांचा विक्रम (भारतीय फलंदाजांसाठी) सौरभ गांगुलीने १९९९ ला लंकेविरूद्ध १८३ धावा काढून मोडला.
कपिल आणि बाकी संघसहकारी यांच्या मानसिकतेत कमालीचा फरक होता. जेव्हा इतर खेळाडू सामना जिंकण्यासाठी खेळत असत तेव्हा हा वस्ताद विश्र्वचषक जिंकण्याची जिद्द ठेऊन मैदानात उतरत असे. कपिलच्या या लाजवाब खेळीने भारतीय संघात नवा जोम, नवा उत्साह संचारला. व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या रुग्णाने एकदम धावत सुटण्यासासारखी किमया कपिलच्या या खेळीने केली होती. या खेळीने भारतीय संघ केवळ उपांत्य फेरीत दाखलच नाही झाला तर प्रतिस्पर्धी संघानाही भारतीय संघाची दखल घ्यायला भाग पाडले होते.
खरोखरच हा साखळी सामना असला तरी तमाम भारतीयांसाठी हा सामना म्हणजे *फायनल बीफोर फायनल* होता. या सामन्यात एखाद्या कसलेल्या योद्ध्याप्रमाणे कपिलने डावाची मांडणी केली होती. वैयक्तिक ८० धावा होईपर्यंत हवेत एकही फटका मारला नाही, तुलनेत ज्युनिअर असलेल्या संघसहकाऱ्यांना हाताशी धरून *बेस्ट फ्रॉम रेस्ट* चे उदाहरण दाखवून दिले. मुख्य म्हणजे वैयक्तिक धावसंख्येला अथवा शतकाला प्राधान्य न देता संघहित समोर ठेऊन शेवटपर्यंत नाबाद राहिला. नाहीतर आजकालचे फलंदाज अर्धशतक अथवा शतकाजवळ आले की कोष्ठबद्धता झाल्यासारखे कुंथत कुंथत खेळतात आणि संघहिताला वाऱ्यावर सोडतात. कपिलच्या याच वादळी खेळीने भारतीय संघाला आत्मविश्वासाचा बुस्टर डोझ दिला आणि याचेच प्रतिबिंब पुढच्या साखळी सामन्यात कांगारूंविरूद्ध, उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध तर अंतिम सामन्यात विंडीज विरूद्ध बघायला मिळाले. कपिलने नेवील ग्राऊंडला उठवलेल्या याच वादळवाऱ्याने चक्रिवाताचे रूप घेतले आणि अंतिम सामन्यात याच चक्रिवादळात विंडीज नावाचा महावृक्ष उन्मळून पडला.
क्रमश:,,,,,