विश्र्वचषक युद्धाला तोंड फुटले, भाग ०३
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल द्वारा इंग्लंड आणि वेल्स इथे तिसरी विश्र्वचषक स्पर्धा *प्रुडेंशियल कप* या नावाने १९८३ ला दि. ९ जुन ते २५ जुन दरम्यान खेळवण्यात आली. इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा ही स्पर्धा आयसीसीने आयोजित केली होती तर पुर्वीचे दोन्ही विश्र्वचषक जिंकत विंडीज यावेळी सुद्धा तगडा दावेदार होता. या स्पर्धेकरीता आयसीसीचे नियमित सात सदस्य आणि १९८२ आयसीसी चषकाचा विजेता झिम्बाब्वे अशा एकूण ८ संघादरम्यान ही स्पर्धा खेळली गेली. लंका आणि झिम्बाब्वे संघाची मिनोज (कच्चा लिंबू) म्हणून पत होती तर भारतीय संघाची ओळख जवळपास अशीच होती.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेतले संपूर्ण सामने दिवसा खेळले गेले तर सामन्याचा प्रत्येक डाव ६०/६० षटकांचा होता. खेळाडूंकरीता पांढरा पोषाख होता. ही स्पर्धा *डबल राऊंड रॉबिन आणि नॉक आऊट* पद्धतीने खेळली गेली. याकरीता ८ संघाची अ आणि ब अशा दोन गटांत विभागणी केली गेली होती. अ गटात यजमान इंग्लंड, पाकिस्तान, न्युझीलंड आणि लंकेचा समावेश होता तर ब गटात माजी विश्वविजेत्या विंडीज सोबत ऑस्ट्रेलिया, भारत आणि झिम्बाब्वे समाविष्ट होता. गटातल्या प्रत्येक संघाला गटातील उर्वरित तिन संघासोबत प्रत्येकी दोनदा लढत द्यायची होती आणि प्रत्येक गटातील दोन सर्वोत्तम संघ उपांत्य फेरीत जाणार होते. या स्पर्धेत एकूण २७ सामने खेळले गेले तर २,३१,०८१ प्रेक्षकांची उपस्थिती होती. १४ शहरातील १५ मैदानावर हे सामने खेळले गेले आणि अंतिम सामना लॉर्डस या मैदानावर खेळला गेला.
भारतीय संघाबाबत सांगायचे झाले तर सर्वत्र आनंदीआनंद होता. साखळी सामने संपताच कोणत्या विमानाने परत यायचे याच्याच नियोजनात बव्हंशी खेळाडू गुंतले होते. त्यातल्या त्यात आपल्या संघाने सर्वच्या सर्व प्रॅक्टिस सामने गमावल्याने पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना संघाला आलीच होती. तरीपण बाह्यजगताचे नियम, कानूनकायदे आणि क्रिकेटची वास्तविकता यात जमीन अस्मानचे अंतर आहे आणि याचा वारंवार प्रत्यय आपणास येतच असतो. विंडीज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ "दादा संघात" मोडत होते तर पाकिस्तान न्युझीलंड हे कोणत्याही संघास धक्का देण्यात सक्षम होते. लंका आणि झिम्बाब्वे यांचे उपद्रवमुल्य सर्वच जाणून होते तर भारतीय संघ *भुले बिसरे गित* प्रमाणे आपली जमीन शोधण्याच्या प्रयत्नात होता.
अखेर ९ जुन १९८३ ला विश्र्वचषक युद्धाला तोंड फुटले आणि पहिल्याच दिवशी पहिल्यांदाच विश्र्वचषक सामना खेळणाऱ्या नवोदित झिम्बाब्वे संघाने बाहुबली कांगारूंना पराभवाचा धक्का दिला. ट्रेंटब्रिज नॉटींघम इथे खेळल्या गेलेल्या सामन्यात झिम्बाब्वेने कांगारूंना १३ धावांनी मात दिली. अगदी याच दिवशी ट्रॅफोर्ड, मॅंचेस्टरला दुसऱ्या सामन्यात भारताने गतविजेत्या विंडीजवर ३४ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाचा दुसरा सामना ११ जुनला ग्रेस रोड, लिसेस्टरला झिम्बाब्वे सोबत झाला ज्यात भारताने झिम्बाब्वेचा १५५ धावांत खुर्दा उडवत सामना ५ गड्यांनी जिंकला.
निश्र्चितच प्रारंभीच दोन विजय मिळवत भारतीय संघाचे विमान दोन हात वर उडायला लागले होते. मात्र सुरवातीलाच विंडीज आणि कांगारूंच्या शेपटावर पाय दिल्याने दोन्ही संघ खवळले आणि १३ जुनला ट्रेंटब्रिज, नॉटींघमला कांगारूंनी भारताचा १६२ धावांनी दणदणीत पराभव केला. हा धक्का भारतीय संघ पचवायच्या पहिलेच १५ जुनला ओव्हल, लंडनला विंडीजने भारताचा ६६ धावांनी पराभव करत हिशोब चुकता केला.
एव्हाना झालेल्या ४ सामन्यात भारताने २ विजय आणि २ पराभव स्विकारत अजुनही उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. उर्वरित दोन सामने झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया सोबत असल्याने झिम्बाब्वे सोबतचा सामना "करा अथवा मरा" प्रकारचा होता. शिवाय धावगती सुद्धा वाढवायची होती. याबाबत ड्रेसिंग रूममध्ये बरीच खलबते झाली. कारण या स्तरावर चुकीला माफी नव्हती आणि साखळी फेरीतला भारताचा शेवटचा सामना मजबूत कांगारू संघाशी होता. तसेच कांगारू संघाकडे जेफ लॉसन, रॉडनी हॉग या धुरंधर गोलंदाजांसोबतच मध्यमगती केन मॅकले आणि डावाखुरा फिरकीपटू टॉम हॉगन दिमतीला होता.
यामुळे ऑस्ट्रेलिया ऐवजी झिम्बाब्वे सारखा सोपा पेपर सोडवून उपांत्य फेरीचे तिकीट कन्फर्म करण्यासाठी भारतीय संघ आतूर होता. तसेच रनरेट मागे न धावता केवळ सामना जिंकणे हा एकमेव उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन भारतीय संघ निश्चिंत होता.
मात्र नेविल ग्राऊंड, रॉयल टनब्रिज, वेल्स इथली हिरवीगार खेळपट्टी भारतीय संघाचे मनोगत ऐकून गालातल्या गालात हसत होती. त्यातच तिथला गारवा भारतीय संघाला हुडहुडी भरायला सक्षम होता. १८ जुन १९८३ ची सकाळ एका भव्यदिव्य ऐतिहासिक घटनेची साक्षीदार व्हायला उतावीळ झाली होती. न भुतो न भविष्यती अशा घटनेला कोणी कैद करून नये म्हणून नियती आपला विचित्र खेळ मांडत होती. नशिब समजा त्यावेळी अरविंद केजरीवाल फक्त १५ वर्षाचे होते आणि त्यांनी त्या घटनेचे पुरावे मागितले नाही. कारण त्या घटनेचे ना ऑडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध होते,,,, ना व्हिडीओ रेकॉर्डिंग.
क्रमश:,,,,,