आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान, भाग ०७
टनब्रिजच्या नेवील मैदानावर प्रचंड गारव्यात आणि हिरव्यागार खेळपट्टीवर कपिलच्या जिगरबाज खेळीने वणवा पेटवला होता आणि त्याच्या झळा कित्येक मैल दूर असलेल्या कांगारू, इंग्लिश आणि विंडीज संघाला पोहोचल्या होत्या. मात्र भारतीय संघाची मिनोज अशी प्रतिमा असल्याने या तिन्ही बलदंड संघांची "कळते पण वळत नाही" अशी स्थिती होती. तसेच सत्य हे कटू आणि पचायला अवघड असतेच आणि भारतीय संघ आपल्या मुळावर उठलाय हे सत्य मानायला उपरोक्त तिन्ही संघ अजिबात तयार नव्हते. तर दुसरीकडे झिम्बाब्वे विरूद्धच्या विजयाने भारतीय संघात सात हत्तीचे बळ संचारले होते आणि विशेषत: मदनलाल,बिन्नीने इथल्या वातावरणाचा गोलंदाजी साठी कसा वापर करायचा हे गत सामन्यातून चांगले ओळखून घेतले होते.
भारताचा अखेरचा साखळी सामना कांगारूंविरूद्ध होता आणि उपांत्य फेरीत प्रवेशासाठी कांगारूंना हा सामना चांगल्या धावगतीने जिंकणे जरूरी होते. मात्र "चितलं ते घडत नाही" असे या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे झाले. कौंटी मैदान, चेम्सफोर्ड इथल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ २४७ धावांत आटोपला. जेफ लॉसन आणि रॉडनी हॉगच्या तुफानात (प्रत्येकी ३/३ बळी) केवळ यशपाल शर्मा (४० धावा), संदिप पाटील (३० धावा) आणि कपिलदेव (२८ धावा) हेच थोडाफार तग धरू शकले. प्रत्युत्तरात कांगारूंतर्फे डावाखुरा फलंदाज ऐलन बॉर्डर (३६ धावा) वगळता इतर फलंदाज निष्प्रभ ठरले. मदनलाल आणि रॉजर बिन्नीने आपल्या स्विंगच्या जाळ्यात कांगारूंना फसवत प्रत्येकी ४/४ बळी घेतले आणि अवघ्या १२९ धावांत कांगारूंची दाणादाण उडवत संघाला ११८ धावांचा दणदणीत विजय मिळवून दिला.
इकडे ब गटात विंडीज आणि भारत उपांत्य फेरीसाठी पात्र झाले तर अ गटातून यजमान इंग्लंड आणि पाकिस्ताने उपांत्य फेरी गाठली. खरेतर अ गटात पाकिस्तान आणि न्युझीलंडचे समान गुण होते परंतु धावगतीत सरस ठरल्याने पाकला पुढची चाल मिळाली. उपांत्य सामन्यात भारत इंग्लंडविरुद्ध तर विंडीज पाकिस्तान सोबत दोन दोन हात करणार होते. इंग्लंडने साखळी फेरीतील सहापैकी पाच सामने मोठ्या फरकाने जिंकल्याने विश्र्वचषक जिंकण्याच्या त्यांच्या आशा उंचावल्या होत्या. तर दुसरीकडे आपला संघ प्रथमच उपांत्य फेरीत पोहोचल्याने बिनधास्त होता. एक मात्र खरे होते,, इंग्लंड संघाला इंग्लंडमध्ये फक्त आणि फक्त त्यांचा अहंकारच हरवू शकत होता. एकतर इंग्लिश रक्त, त्यातच भारतावर १५० वर्षे राज्य केल्याची गुर्मी आणि उंटावरून शेळी हाकणारी त्यांची थिंक टॅंक. या सगळ्यांचे कॉकटेल होऊन इंग्लिश संघाचा सत्यानाश होणार हे ठरलेलेच होतं. असे म्हणतात की भारताविरुद्ध उपांत्यसामन्याचा विचार करण्याऐवजी इंग्लिश थिंक टॅंक अंतिम सामन्यात विंडीज विरूद्धच्या रणनितीत गर्क झाला होता आणि इथेच त्यांनी इंग्लिश संघाची कबर खोदली होती. प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे इंग्लंडच्या चांगलेच अंगलट आले मात्र हिच बाब भारतीय संघाच्या पथ्यावर पडली.
उपांत्य फेरीत भारताविरुद्ध लढणाऱ्या इंग्लिश संघात अनेक दिग्गज खेळाडू होते, अशाच काही खेळाडूंची आपण ओळख करून घेऊया.
१) कर्णधार बॉब विलिस
रॉबर्ट जॉन डेलन विलिस असे पुर्ण नाव असलेला हा खेळाडू चांगलाच ताडामाडाच्या उंचीचा होता. तब्बल ६ फुट ६ इंच उंचीचा हा खेळाडू इंग्लंडचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जात होता. आपल्या लांब आणि अनोख्या रनअपने तो धावत सुटला की फलंदाजांची भंबेरी उडत असे. मात्र जे वेगवान गोलंदाजांचे दु:स्वप्न असते त्याने बॉब विलिसला चांगलेच हैराण केले. १९७५ ला टोंगळ्याच्या जखमेने तो मैदानातच कोसळला होता. यातच त्याच्या दोन्ही टोंगळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. मात्र शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीने त्याला अगतिक होऊन चालण्यासाठी कुबड्याची गरज पडली होती. अखेर प्रदिर्घ काळ व्यायाम, जिम, मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने संघात पुनरागमन केले होते. आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील ३२५ कसोटी बळी घेऊन त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली होती.
२) माईक गॅटींग
मायकेल विलीयम गॅटींग हा खरेतर बिग बॉस खेळाडू. उर्मटपणा आणि दादागिरी नसानसात भरलेली असायची. अवघ्या १४ वर्षाचा असताना ही स्वारी फुटबॉल मध्ये गोलकिपर म्हणून नशिब आजमवायला गेली मात्र कमी उंची आणि गलेलठ्ठ शरीरयष्टीमुळे स्वप्न भंगल्या गेले. मात्र फलंदाजी एकदम राजेशाही पद्धतीने करायचा. आपल्याच धुंदीत फलंदाजी करण्याची सवय असल्याने १९८७ रिलायन्स विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कांगारू विरूद्ध ऐलन बॉर्डरला रिव्हर्स स्विप मारून आपली विकेट फेकली होती आणि फक्त ९ धावांनी ऑस्ट्रेलियाने विश्र्वचषक जिंकला होता. हातातोंडाशी आलेला विजय एका चुकीच्या फटक्याने गमावला आणि तब्बल ३२ वर्षे इंग्लंडला हे दु:ख आपल्या उरात बाळगावे लागते होते. अखेर २०१९ ला इंग्लंडने विश्वचषकाला गवसणी घातली.
३) डेव्हिड गॉवर
डेव्हिड इवान गॉवर, डावाखुरा शैलिदार फलंदाज. आपल्या टॉप हॅंड पद्धतीने खेळताना मोठ्या खेळी करण्यात पटाईत होता. या खेळाडूच्या वागण्यावर आणि राहण्यावर प्रचंड टिका केली जात असे मात्र सर्वच याच्या सहजसुंदर शैलिदार खेळीचे दिवाने होते.
४) इयान बॉथम
सर इयान टेरेंस बॉथम, प्रसिद्ध जागतिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू. याच्यावर आपल्या गुणवत्तेला संपूर्ण न्याय देत नसल्याची वारंवार टिका होत असे. एकाच कसोटीत १०० धावा आणि १० बळी म्हणजेच
"मॅच डबल" असा पराक्रम करणारा तो केवळ दुसरा खेळाडू आहे. बिफी, बॉथ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू "स्ट्रेट हिटींग, स्क्वेअर कटींग" साठी ओळखल्या जात होता. सोबतच याचे चेंज ऑफ पेस, आऊटस्विंगर, वेगवान इनस्विंगिंग यॉर्कर फलंदाजांच्या उरात धडकी भरवत असे. क्रिकेटमधून निवृत्त होताच बॉथमने लहान मुलांच्या ल्युकेमियासाठी भरीव सामाजिक कार्य केले आणि याकरिता त्याला २००७ ला नाईटहूड पुरस्कार देण्यात आला होता.
५) ऐलन लॅंब
ऐलन जोसेफ लॅंब, द.आफ्रिकेत जन्मलेला हा खेळाडू तिथल्या वंश,वर्णभेदी व्यवस्थेला रामराम ठोकत इंग्लंडला आला आणि आपल्या जिगरबाज फलंदाजीने इंग्लिश संघात दाखल झाला. लेगा, लॅंबी या टोपणनावाने प्रसिद्ध हा खेळाडू वेगवान गोलंदाजी लिलया खेळायचा मात्र फिरकीसमोर चाचपडायचा. १९८७ ला बेन्सन, हेजेस विश्वचषकात चौथ्या सामन्यात इंग्लंडला ऑस्ट्रेलिया विरूद्ध जिंकण्यासाठी अंतिम षटकात १७ धावा हव्या होत्या आणि गोलंदाज होता डावाखोरा ब्रुस रिड (६ फुट, ८ इंच उंच) जो ऐलन लॅंबपेक्षा एक फुट जास्त उंच होता. आता सर्वस्वी जबाबदारी ऐलन लॅंबची होती आणि या पठ्ठ्याने अंतिम षटकात २,४,६,२,४ अशा धावा चोपून काढत इंग्लंडला विजयी केले होते.
क्रमश:,,,,,