धम्मचक्र प्रवर्तन
ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास 'धम्मचक्रप्रवर्तन' किंवा 'धम्मचक्कपवत्तन' असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. तथागत बुद्धांनी स्वत: इ.स.पू. ६व्या शतकामध्ये जवळजवळ १ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
भगवान बुद्ध या प्रथम "धम्मचक्र प्रवर्तन" सुत्तात म्हणतात की, "माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्र्यात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दुःख नाहिसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.