प्रारंभिक जीवन
लुंबिनीमध्ये बुद्धांचा जन्म दर्शविणारे चित्र
राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. त्याने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती.