Get it on Google Play
Download on the App Store

गौतम बुद्ध

गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव 'सिद्धार्थ' असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला 'गौतम' या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.

'बुद्ध' हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे, 'बुद्ध' या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. 'संबुद्ध' म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वत: वर विजय मिळवलेला आणि स्वत: उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि 'संमासंबुद्ध' म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वत: सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमूनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच 'संमासंबुद्ध' मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या अनुयायांना बौद्ध किंवा इंग्रजी भाषेत किंवा बुद्धिस्ट म्हणतात आणि बुद्धांच्या धम्माला (धर्माला वा तत्त्वज्ञानाला) 'बौद्ध धर्म' किंवा 'बुद्धिझम्' म्हणतात. तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक — बद्ध भिक्खू - भिक्खूनींचा आणि दुसरा — बौद्ध उपासक - उपासिकांचा.

आज सर्वच खंडांत भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. जगभरातील बुद्ध अनुयायांची लोकसंख्या ही १८० कोटी ते २१० कोटी आहेत. अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी तथागत बुद्धांना (१.८ अब्ज) लाभलेले आहेत. परंतु भारतातील कोट्यवधी हिंदू धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व बुद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी (२.३ अब्ज) असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्म संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत.

मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, ''बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.''

शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) - हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणार्‍या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली.