संत जनाबाई - अभंग संग्रह ४
५३.
धन्य कलत्र माय । सर्व जोडी तुझे पाय ॥१॥
सखा तुजवीण पाहीं । दुजा कोणी मज नाहीं ॥२॥
माझी न करावी सांडणी । ह्मणे तुझी दासी जनी ॥३॥
५४.
रुक्मिणीच्या कुंका । सुरां अमरां प्रिय लोकां ॥१॥
तूं धांव माझे आई । सखे साजणी विठाबाई ॥२॥
शिवाचिया जपा । मदनताता या निष्पापा ॥३॥
दयेच्या सागरा । ह्मणे जनी अमरेश्वरा ॥४॥
५५.
मी वत्स माझी गायी । नय आतां करुं काई ॥१॥
तुह्मीं तरी सांगा कांहीं । शेखी विनवा विठाबाई ॥२॥
येंई माझिये हरणी । चुकलें पाडस दासी जनी ॥३॥
५६.
सख्या पंढरीच्या राया । घडे दंडवत पायां ॥१॥
ऐसें करीं अखंडित । शुद्ध प्रेम शुद्ध चित्त ॥२॥
वेध माझ्या चित्ता । हाचि लागो पंढरिनाथा ॥३॥
जावें ओंवाळुनी । जन्मोजन्मीं ह्मणे जनी ॥४॥
५७.
कां गा उशीर लाविला । माझा विसर पडिला ॥१॥
तुजवरी संसार । बोळविलें घरदार ॥२॥
तो तूं आपुल्या दासासी । ह्मणे जनी विसंबसी ॥३॥
५८.
किती सागूं तूंतें । बुद्धि शिकवणें हें मातें ॥१॥
सोमवंशाच्या भूषणा । प्रतिपाळीं हर्षे दीनां ॥२॥
शिकवावें तुंतें । हाचि अपराध आमुतें ॥३॥
स्वामीलागीं धीट ऐसी । ह्मणती शिकवी जनी दासी ॥४॥
५९.
शिणल्या बाह्या आतां । येऊनियां लावीं हाता ॥१॥
तूं मार्झे वो माहेर । काय पहातोसी अंतर ॥२॥
वोंवाळुनी पायां । जिवेंभावें पंढरिराया ॥३॥
धर्म ताता धर्म लेंकी । ह्मणे जनी हें विलोकीं ॥४॥
६०.
योग न्यावा सिद्धी । सकळ गुणाचिया निधी ॥१॥
अरुपाच्या रुपा । साब राजाचिया जपा ॥२॥
ब्रह्मियाचा ताता । ह्मणे जनी पंढरिनाथा ॥३॥
६१.
माय मेली बाप मेला । आतां सांभाळीं विठ्ठला ॥१॥
मी तुझें गा लेकरुं । नको मजशीं अव्हेरूं ॥२॥
मतिमंद मी तुझी दासी । ठाव द्यावा पायांपाशीं ॥३॥
तुजविण सखे कोण । माझें करील संरक्षण ॥४॥
अंत किती पाहासी देवा । थोर श्रम झाला जीवा ॥५॥
सकळ जिवाच्या जीवना । ह्मणे जनी नारायणा ॥६॥
६२.
अहो सखीये साजनी । ज्ञानाबाई वो हरणी ॥१॥
मज पाडसाची माय । भक्ति वत्साची ते गाय ॥२॥
कां गा उशीर लाविला । तुजविण शिण झाला ॥३॥
अहो बैसलें दळणीं । धांव घालीं ह्मणे जनी ॥४॥
६३.
काय करूं या कर्मासी । धांव पाव ह्रुषिकेशी ॥१॥
नाश होतो आयुष्याचा । तुझें नांव नये वाचा ॥२॥
काय जिणें या देहाचें । अखंड अवघ्या रात्रीचें ॥३॥
व्यर्थ कष्टविली माता । तुझें नाम नये गातां ॥४॥
जन्म मरणाचें दुःख । म्हणे जनी दाखवीं मुख ॥५॥
६४.
अहो ब्रह्मांड पाळका । ऐकें रुक्मिणीच्या कुंका ॥१॥
देवा घेतलें पदरीं । तें तूं टाकूं नको दुरी ॥२॥
होतें लोकांमध्यें निंद्य । तें त्वां जगांत केलें वंद्य ॥३॥
विनवीतसे दासी जनी । परिसावी माझी विनवणी ॥४॥
६५.
येंई जीवाचिया जीवा । रामा देवाचिया देवा ॥१॥
सर्व देव बंदीं पडिले । रामा तुझी सोडविले ॥२॥
मारुनियां लंकापती । सोडविली सीता सती ॥३॥
देवा तुमची ऐसी ख्याती । रुद्रादिक ते वर्णिती ॥४॥
६६.
अहो देवा हरिहर । उतरीं आह्यां भवपार ॥१॥
देवा आह्मी तुझे दास । करुं वैकुंठीं वो वास ॥२॥
जनी म्हणे कल्पवृक्ष । देव दृष्टासी पैं भक्ष ॥३॥
६७.
शरण आलों नारायणा । आतां तारीं हो पावना ॥१॥
शरण आला मारुतिराया । त्याची दिव्य केली काया ॥२॥
शरण प्रल्हाद तो आला । हिरण्यकश्यपू मारिला ॥३॥
जनी ह्मणे देवा शरण । व्हावें भल्यानें जाणोन ॥४॥
६८.
ऐक बापा माझ्या पंढरीच्या राया । कीर्तना आल्यें या आर्तभूतां ॥१॥
माझ्या दुणेदारा पुरवीं त्याची आस । न करीं निरास आर्तभूतां ॥२॥
त्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा । अभय तो द्यावा कर तयां ॥३॥
जैसा चंद्रश्रवा सूर्य उच्चैश्रवा । अढळपद ध्रुवा दिधलेंसे ॥४॥
उपमन्यु बाळका क्षीराचा सागरू । ऐसा तूं दातारु काय वानूं ॥५॥
ह्मणे दासी जनी आलें या कीर्तनीं । तया कंटाळुनी पिटूं नका ॥६॥
६९.
गजेंद्रासी उद्धरिलें । आह्मीं तुझें काय केलें ॥१॥
तारिली गणिका । तिहीं लोकीं तुझा शिक्का ॥२॥
वाल्हा कोळी अजामेळ । पापी केला पुण्यशीळ ॥३॥
गुणदोष मना नाणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥
७०.
राजाई गोणाई । अखंडित तुझे पायीं ॥१॥
मज ठेवियेलें द्वारीं । नीच ह्मणोनी बाहेरी ॥२॥
नारा गोंदा महादा विठा । ठेवियलें अग्रवाटा ॥३॥
देवा केव्हां क्षेम देसी । आपुली ह्मणोनी जनी दासी ॥४॥
७१.
काय करूं पंढरीनाथा । काळ साह्य नाहीं आतां ॥१॥
मज टाकिलें परदेशीं । नारा विठा तुजपाशीं ॥२॥
श्रम बहु झाला जीवा । आतां सांभाळीं केशवा ॥३॥
कोण सखा तुजवीण । माझें करी समाधान ॥४॥
हीन दीन तुझे पोटीं । जनी ह्मणे द्यावी भेटी ॥५॥