संत जनाबाई - अभंग संग्रह ३
३४.
पाय जोडूनि विटेवरी । कर ठेउनी कटावरी ॥१॥
रुप सांवळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकार ॥२॥
गळां माळ वैजयंती । पुढें गोपाळ नाचती ॥३॥
गरूड सन्मुख उभा । ह्मणे जनी धन्य शोभा ॥४॥
३५.
येगे माझे विठाबाई । कृपादृष्टीनें तूं पाहीं ॥१॥
तुजविण न सुचे कांहीं । आतां मी वो करुं कांहीं ॥२॥
माझा भाव तुजवरी । आतां रक्षीं नानापरी ॥३॥
येई सखये धांउनी । ह्मणे नामयाची जनी ॥४॥
३६.
हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहें चक्रपाणी ॥१॥
धांव धांव पांडुरंगे । सखे जिवलगे अंतरंगे ॥२॥
तुजवांचूनि दाही दिशा । वाट पाहातें जगदीशा ॥३॥
हांसें करुं नको जनासी । ह्मणे नामयाची दासी ॥४॥
३७.
सख्या घेतलें पदरीं । आतां न टाकावें दुरी ॥१॥
थोरांचीं उचितें । हेंचि काय सांगों तूंतें ॥२॥
ब्रह्मियाच्या ताता । सज्जना लक्षुमीच्या कांता ॥३॥
आपुली म्हणवूनि । आण गावी दासी जनी ॥४॥
३८.
गंगा गेली सिंधुपाशीं । त्याणें अव्हेरिलें तिसी ॥१॥
तरी तें सांगावें कवणाला । ऐसें बोलें बा विठ्ठला ॥२॥
जळ काय जळचरा । माता अव्हेरी लेंकुरा ॥३॥
जनी ह्मणे शरण आलें । अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥
३९.
माझी आंधळयाची काठी । अडकली कवणे बेटीं ॥१॥
आतां सांगूं मी कवणासी । धांवें पावें ह्रुषिकेशी ॥२॥
तुजवांचुनी विठ्ठला । कोणी नाहींरे मजला ॥३॥
माथा ठेवीं तुझे चरणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥
४०.
सख्या पंढरीच्या नाथा । मज कृपा करीं आतां ॥१॥
ऐसें करीं अखंडित । शुद्ध नेम शुद्ध व्रत ॥२॥
वेधु माझ्या चित्ता । हाचि लागो पंढरिनाथा ॥३॥
जीव ओंवाळुनी । जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥
४१.
कां गा न येसी विठ्ठला । ऐसा कोण दोष मला ॥१॥
मायबाप तूंचि धनी । मला सांभाळीं निर्वाणीं ॥२॥
त्वां बा उद्धरिले थोर । तेथें किती मी पामर ॥३॥
दीनानाथा दीनबंधू । जनी ह्मणे कृपासिंधू ॥४॥
४२.
अगा रुक्मिणीनायका । सुरा असुरा प्रिय लोकां ॥१॥
ते तूं धांवें माझे आई । सखे साजणी विठाबाई ॥२॥
अगा शिवाचिया जपा । मदन ताता निष्पापा ॥३॥
आपुली म्हणवुनी । अपंगावी दासी जनी ॥४॥
४३.
नाहीं केली तुझी सेवा । दुःख वाटतसे माझे जिवा ॥१॥
नष्ट पापीण मी हीन । नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥
जें जें दुःख झालें मला । तें त्वां सोसिलें विठ्ठला ॥३॥
रात्रंदिवस मजपाशीं । दळूं कांडूं लागलासी ॥४॥
क्षमा करावी देवराया । दासी जनी लागे पायां ॥५॥
४४.
येरे येरे माझ्या रामा । मनमोहन मेघःश्यामा ॥१॥
संतमिसें भेटी । देंई देंई कृपा गोष्टी ॥२॥
आमची चुकवी जन्म व्याधी । आह्यां देंई हो समाधी ॥३॥
जनी ह्मणे चक्रपाणी । करीं ऐसी हो करणी ॥४॥
४५.
अहो नारायणा । मजवरी कृपा कां कराना ॥१॥
मी तो अज्ञानाची राशी । ह्मणोन आलें पायांपाशीं ॥२॥
जनी ह्मणे आतां । मज सोडवीं कृपावंता ॥३॥
४६.
तुझी नाहीं केली सेवा । दुःख वाटतसे जीवा ॥१॥
नष्ट पापीण मी हीन । नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥
जें जें दुःख झालें मला । तें तूं सोशिलें विठ्ठला ॥३॥
क्षमा करीं देवराया । दासी जनी लागे पायां ॥४॥
४७.
आधीं घेतलें पदरीं । आतां न धरावें दुरी ॥१॥
तुम्हा थोराचें उचितें । हेंचि काय सांगूं तूंतें ॥२॥
अहो ब्रह्मियाच्या ताता । सखया लक्षुमीच्या कांता ॥३॥
दयेच्या सागरा । जनी ह्मणे अमरेश्वरा ॥४॥
४८.
आह्यीं जावें कवण्या ठायां । न बोलसी पंढरीराया ॥१॥
सरिता गेली सिंधूपाशीं । जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥
जळ कोपलें जळचरासी । माता न घे बाळकासी ॥३॥
ह्मणे जनी आलें शरण । जरी त्वां धरिलेंसे मौन्य ॥४॥
४९.
हा दीनवत्सल महाराज । जनासवें काय काज ॥१॥
तुझी नाहीं केली सेवा । दुःख वाटे माझ्या जिवा ॥२॥
रात्रंदिवस मजपाशीं । दळूं कांडूं तूं लागसी ॥३॥
जें जें दुःख झालें मला । तें तें सोसिलें विठ्ठला ॥४॥
क्षमा कीजे पंढरिराया । दासी जनी लागे पायां ॥५॥
५०.
ऐक बापा ह्रुषिकेशी । मज ठेवीं पायांपाशीं ॥१॥
तुझें रुप पाहीन डोळां । मुखीं नाम वेळोवेळां ॥२॥
हातीं धरिल्याची लाज । माझें सर्व करीं काज ॥३॥
तुजविण देवराया । कोणी नाहींरे सखया ॥४॥
कमळापति कमळपाणी । दासी जनी लागे चरणीं ॥५॥
५१.
पोट भरुनी व्यालासी । मज सांडुनी कोठें जासी ॥१॥
धिरा धिरा पांडुरंगा । मज कां टाकिलें निःसंगा ॥२॥
ज्याचा जार त्यासी भार । मजला नाहीं आणिक थार ॥३॥
विठाबाई मायबहिणी । तुझे कृपें तरली जनी ॥४॥
५२.
अविद्येच्या वो रात्रीं । आडकलों अंधारीं ॥१॥
तेथुनी काढावें गोविंदा । यशोदेच्या परमानंदा ॥२॥
तुझें सन्निधेचे पाशीं । ठाव नाहीं अविद्येसी ॥३॥
तुझे संगती पावन । उद्धरिले ब्रह्में पूर्ण ॥४॥
अजामेळ शुद्ध केला । ह्मणे दासी जनी भला ॥५॥