श्री गजानन महाराज संस्थान मठ
श्री गजानन महाराजांचे मंदिर, ओंकारेश्वर
महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला. त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने १९०८ मध्ये ट्रस्ट स्थापन झाला. शेगावात नवीन मठ स्थापित झाला आणि महाराजांच्या श्रेष्ठतेचे आणि संतत्वाचा महिमा सर्वदूर पसरला. भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करुन घेण्याकरिता लोक शेगावला अमाप गर्दी करू लागले. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात. स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त १५ मिनिटांचा रस्ता आहे. स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे १७२ बसेस येतात. त्या व्यतिरिक्त देवास-उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांहूनही बसेस चालतात. श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री ९.३० पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात. या मठाचे तसेच मंदिराचे वैशिष्य म्हणजे, येथे असलेली स्वच्चता, शांतता, शिस्त आणि कर्मचाऱ्यांची तसेच सेवेकऱ्यांची भक्तांशी उत्तम तसेच प्रेमळ वर्तणूक. दर्शनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केलेली असून, दुपारच्या वेळी सर्व भकतांना भोजन प्रसाद वाटप केले जाते. भोजनस्थळ देखिल अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटके असून सेवेकरी प्रेमाने भक्तांना जेवायला वाढतात. खरोखरच, जागजागी श्री महाराजांचे प्रेम जाणवते आणि ते देहात असताना त्यांचे आपल्याला दर्शन झाले नाही, ह्याची पुन्हा पुन्हा खंत वाटत राहते. स्वार्थाने बरबटलेल्या या कलियुगात, अशा थोर संतांची कीर्ति वाढत जाण्याचे कारण काय, तर त्यांचे भक्तांवरील निर्व्याज, निष्काम, निरपेक्ष प्रेम (अकारण कारुण्य). भक्तांचा उद्धार व्हावा हीच, त्यांचे आचारविचार बदलावेत, त्यांना शाश्वत आणि अशाश्वत ह्यांमधिल फरक कळावा, त्यांच्या हातून साधना व्हावी आणि त्यांचे जन्म-मृत्युचे फेरे चुकावेत ह्या उदात्त हेतुने ते भक्तांना जवळ करतात. ते स्वत: निरपेक्षच असतात. अशा ह्या थोर सद्गुरु महाराजांचे वर्णन मी पामर काय करणार? खरी भक्ति करणाऱ्या भक्तांना त्यांचे अनुभव येतच असतात.