भ्रमंती
आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवमध्ये व्यतीत केला असला तरीही कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव , रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे . उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे .
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत . त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात . नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे . सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो . शे-सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराज मात्र हा संपूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घालवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले दिसतात.