Get it on Google Play
Download on the App Store

भक्तगण

हरी पाटील, बंकटलाल आगरवाल, पितांबर, बाळाभाऊ प्रभू, बापुना काळे, भाऊसाहेब कवर, पुंडलीक भोकरे, बायजाबाई, भास्कर पाटील हे महाराजांचे काही श्रेष्ठ भक्त होते. बंकटलालाच्या घरून ते वेगाने निघून गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागले. महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले.

हरी पाटील - हरी पाटील हे महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि अंतरंगातील भक्त होते असे म्हणणेच सार्थ ठरेल; कारण महाराजांची गूढ भाषा केवळ त्यांनाच समजत असे. हरी पाटलांची भक्ती रांगडी होती, परिपूर्ण शुद्धता, पूर्ण समर्पण आणि अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रेमाने गाढ अशी ती भक्ती होती, तिथे दांभिकता आणि खोटेपणा ह्या गोष्टींना किंचितही थारा नव्हता. परंतु ह्या सर्व गोष्टी काही एका क्षणात घडल्या नाहीत. महाराज शेगांवात प्रकट झाल्यावेळी सर्वच पाटील बंधु अत्यंत मग्रूर आणि धनशक्तीने बेधुंद झालेले होते, सर्व प्रकारचे वैभव, धनसंपत्ती, गिरण्या पेढ्या व दुकाने असल्याकारणाने ते कोणालाही हवे ते बोलत आणि लोकही त्यांच्याशी शक्तीत तुल्यबळ नसल्याने सर्व गोष्टी शांतपणे सहन करीत. महाराजांचीही ते सर्वजण पुष्कळ चेष्टामस्करी व निंदानालस्ती करीत, परंतु महाराज अत्यंत कृपाळू असल्याने ह्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत. एकदा हरी पाटलांनी जेव्हा महाराजांना तालमीत येऊन स्वतःसोबत कुस्ती खेळण्याचे आवाहन केले त्यावेळी महाराज तालमीत जाऊन बसले आणि त्यांनी हरी पाटलाला त्यांना उठविण्यास सांगितले. नानाप्रकारचे पेच आणि सर्व ताकद वापरुनही जेव्हा हरी महाराजांना उठवू शकला नाही त्यावेळी त्याचा अहंकार नष्ट झाला आणि त्या दिवसापासून तो महाराजांना पूर्णपणे शरण गेला. जेव्हा महाराजांनी स्वतःच्या समाधीची जागा स्वतःच ठरविली त्यावेळी ते सर्व भक्तांना सोडून त्या जागी (ज्या जागेला त्यावेळी गाढवभुंकी असे म्हणत कारण त्या जागेवर कुंभारांची सर्व गाढवे चरण्यास जात असत) अचानक जाऊन बसले. भक्तांना काय करावे हे सुचेना व महाराज तर ती जागा सोडून येईनात. शेवटी त्यांनी हरी पाटलांना बोलावले. हरी पाटील जवळ जाऊन प्रेमळपणे महाराजांना म्हणाले, "महाराज, ही जागा अशुद्ध आहे, आपण मठात चलावे." त्यावर सदगुरु म्हणाले, "येथे राहील रे!" त्यावर हरी पाटलांना समजले की महाराजांनी स्वतःच्या समाधीकरिता ती जागा निवडली आहे. समाधी घेण्यापूर्वी महाराज एकदा हरी पाटलांना घेऊन पंढरपुरास गेले असता, त्यांनी स्वतःच स्वतःच्या समाधिदिनाबद्दल त्याला माहिती दिली. महाराजांच्या समाधिनंतर हरी पाटलांच्या दु:खाला पारावार राहिला नाही, म्हणूनच "श्री गजानन विजय" ह्या पोथीमध्ये छापलेल्या त्यांच्या फोटोमध्येसुद्धा त्यांच्या चेहर्‍यावर शोककळा दिसून येते. महाराजांच्या समाधिनंतर त्यांनी काही वर्षांतच म्हणजे १९१७ साली देह विसर्जित केला.

बाळाभाऊ प्रभु - महाराजांच्या आवडत्या भक्तगणांमधील एक. बाळापुरातील आत्माराम भिकाजी ह्यांचा भाचा म्हणजेच महाराजांचे परमभक्त श्री बाळाभाऊ प्रभु होत. "उपास्यापदी भाव उपासके ठेवावा" ह्या उक्तीप्रमाणे त्यांनी त्यांचे उपास्य दैवत म्हणून गजानन महाराजांचे चरणी पूर्ण श्रद्धाभाव अर्पण केला व ते मुंबई व तेथील त्यांच्या समस्त कुटुंबीयांना सोडून कायमचेच सद्‌गुरूंच्या चरणी सेवेस सादर झाले. स्वतः महाराजांनी त्यांचा भक्तिभाव शुद्ध असल्याचे शाबीत करून भास्कर पाटील ह्याचा संशय दूर केला आणि बाळाभाऊंना स्वत़:च्या अंतरंगातील एकनिष्ठ भक्ताची जागा दिली. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी स्वतः बाळाभाऊंचा हात धरून त्यांना स्वतःच्या गादीवर बसविले. महाराजांच्या समाधिनंतर, ज्या जागी बसून महाराजांनी संजीवन समाधि घेतली त्याच जागेवर बसून ते श्रीमद्भगवद्गीतेवर प्रवचने करीत असत, त्यावेळी देहभान हरपल्याने त्यांना देहावरील वस्त्राचेदेखिल भान राहात नसे. परंतु बाळाभाऊ हे महाराजांचे सच्चे भक्त असल्याकारणाने महाराजांच्या समाधीनंतर त्यांना ह्या भौतिक जगात आनंद वाटेना, त्यामुळे ते हळूहळू खंगू लागले आणि १९१२ साली त्यांनी कृश होऊन देह सोडला.
पितांबर - शेगांवीचाच रहिवासी असलेला पितांबर हा महाराजांचा अत्यंत प्रेमळ, भोळा आणि कपटरहित अशा मनाचा भाविक भक्त होता. बंकटलालाने सांगितलेल्या महाराजांच्या थोरवीवर त्याचा चट्कन विश्वास बसला. इथेच त्याच्या आध्यात्मिक प्रगतिची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर जुन्या शिवमंदिरात जेव्हा टाकळीकरांचे कीर्तन होते त्यावेळी अचानक महाराजांची भेट होऊन त्याचा विश्वास अधिकच गाढ झाला. महाराजांचे सदैव ध्यान आणि नामस्मरण ह्याची फलश्रुति म्हणूनच की काय एकदा महाराजांची त्याच्यावर कृपा झाली आणि परिणामी महाराजांनी त्यास पर्यटनाला जाण्यास सांगितले. त्यानंतर अकोलीच्या शिवारातील वठलेल्या आंब्याला जेव्हा पितांबराच्या सद्गुरुभक्तीच्या प्रभावाने सर्वांदेखत हिरवी पाने फुटली तेव्हा मात्र सर्वांना त्याच्या थोरवीचा प्रत्यय आला. अजूनही अकोलीत पितांबराचा मठ आहे आणि सद्गुरूंच्या कृपेने पल्लवित झालेला आंबा अजूनही तसाच हिरवागार असून त्यास इतर आंब्यांच्या झाडांपेक्षा जास्ती फळे येतात. पितांबराचा अंतदेखील अकोलीतच झाला. पितांबराच्या जीवनाचा आढावा घेता असे दिसून येते की सद्गुरूंची आज्ञा पालन करणे हेच त्याच्या श्रेष्ठ गुरुभक्तीचे मुख्य लक्षण होते.

श्रीधर गोविंद काळे - श्रीधर गोविंद काळे हे मॅट्रिकनंतर इंटरला नापास झाल्याने वर्तमानपत्रे वाचीत वेळ घालवीत असताना त्यांनी टोगो आणि यामा ह्या जपानी व्यक्तींच्या जीवनचरित्राविषयी वाचले. आपणही मायदेश सोडून विलायतेला जाऊन नाव आणि पैसा कमवावा असे त्यांना वाटू लागले. परंतु पैशाची व्यवस्था होईना त्यामुळे ते निराश झाले आणि कोल्हापूरला जाताना वाटेवर शेगांवला थांबून महाराजांना भेटायला गेले असताना सर्वज्ञ असलेल्या महाराजांनी त्यांचे मनोगत जाणले आणि परदेशी जाण्यापासून त्यांना परावृत्त केले. सरतेशेवटी महाराज त्याला म्हणाले, "कोठे न आता जाई येई|." त्यानंतर महाराजांच्या कृपेने त्याची उत्तम भौतिक प्रगति झाली. त्याचवेळी महाराजांनी त्यांना बहुमोल उपदेश दिला की अतिशय पुण्य केल्याखेरीज भारतात जन्म होत नाही आणि योगापेक्षा अध्यात्मविचार श्रेष्ठ आहे. महाराजांच्या आशीर्वादाने ते बी.ए.एम्.ए. झाले आणि त्यांना शिंद्यांच्या राज्यातील शिवपुरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपालच्या जागी नेमले गेले.

त्र्यंबक उर्फ भाऊ कवर - त्र्यंबकला घरी भाऊ असे प्रेमाने म्हणत असत, परंतु ही गोष्ट फक्त जवळच्या माणसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही माहिती नव्ह्ती. जेव्हा महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरली तेव्हा कवरला त्यांना भेटण्याची तीव्र तळमळ लागली. त्याप्रमाणे त्याने तीनवेळा शेगांवला भेटी दिल्या परंतु तिन्ही भेटींमध्ये सदगुरुमहाराजांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले; कवर मनोमनी दु:खी झाला. अखेरची एक भेट घ्यावी म्हणून कवर शेगांवला गेला आणि भक्तांच्या गर्दीत जाऊन बसला. थोड्या वेळात महाराज सरळ त्याच्याकडेच आले आणि म्हणाले, "काय भाऊ, एकटाच चिकण सुपारी खातोस होय? तुझ्या खिशातली सुपारी दे बरं मला थोडी!" कवराला आश्चर्याचा धक्काच बसला. ह्यांना माझे नाव कसे कळले, ह्यांना कसे कळले की माझ्या खिशात चिकण सुपारी आहे? ह्या घटनेतूनच भाऊ कवराला महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली आणि त्याची महाराजांवर असीम श्रद्धा जडली. त्या क्षणापासून् भाऊ कवर त्यांच्या श्रेष्ठ भक्तांपैकी एक झाला. तो त्यावेळी हैदराबादमध्ये डॉक्टरी शिकत होता. सुटीमध्ये घरी आला असता त्याला वाटले की महाराजांचे आवडीचे पदार्थ करून घेऊन त्यांना जेवण नेऊन द्यावे. त्याप्रमाणे त्याने भाकरी, अंबाडीची भाजी, हिरव्या मिरच्या, कांदे, लोणी असे पदार्थ बरोबर घेतले; पण तो स्टेशनवर येण्याअगोदर गाडी निघून गेली. कवराला अतोनात दु:ख झाले, गुरुमहाराज जेवून घेतील आणि आपण आणलेली शिदोरी वाया जाईल या विचाराने तो व्यथित होऊन स्टेशनवर तसाच बसून राहिला. परंतु भक्तवत्सल महाराज त्या दिवशी आलेले सर्व नैवेद्य बाजूला सारून तसेच उपाशी बसले होते. शेवटी जेव्हा कवर चार वाजता शेगांवच्या मठात आला, तेव्हा महाराज म्हणाले, "तुझ्या भाकेत गुंतलो | मी उपाशी राहिलो | आण तुझी शिदोरी||." त्यावेळी कवराला काय वाटले असेल ह्याची कल्पना एक भक्तच करू शकेल. इतर भक्त म्हणाले, "भाकरीवर गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे."

बापुना काळे - बापुना काळे हे पाटलांच्याकडे हिशेबनीस म्हणून काम बघत होत कारण ते आकडेमोड आणि तोंडी हिशोबात तरबेज होते. त्यांनी उपनिषदांचा अभ्यासही केलेला होता. जेव्हा महाराज बापुना काळे आणि अन्य भक्तांसोबत आषाढी एकादशीला पंढ‍रीला गेले तेव्हा स्नानाला गेलेल्या बापुनाला दर्शनाला जायला उशीर झाल्याकारणाने सबंध दिवसभर दर्शन मिळू शकले नाही. बापुनाचे विठ्ठलाकडे लागलेले मन, इतर भक्तांनी त्याची केलेली चेष्टा हे सर्व पहात असलेल्या महाराजांनी त्याला विठ्ठलाचे दर्शन करविले. बापुना खरोखर धन्य झाला. दासगणू म्हणतात, "संत आणि भगवंत | एकरूप साक्षात | गुळाच्या त्या गोडीप्रत | कैसे करावे निराळे?||." ह्या विठ्ठलदर्शनावे फळ म्हणूनच की काय बापुनाला एक मुलगा झाला त्याचे नाव त्याने नामदेव ठेवले. पुढे हा मुलगा प्रख्यात कीर्तनकार बनला. बापुना दररोज न चुकता एक शेर धान्य दान करीत. अशा ह्या महाराजांच्या थोर भक्ताने १९६४ला देह सोडला. मरणाच्या दारात असलेल्या कवठे बहादूरच्या वारकऱ्याला मरीच्या रोगापासून वाचविले. सोवळे ओवळे पाळणे, घडाघडा मंत्र म्हणून बराच वेळ देवपूजा करणे (एकंदरीत सांप्रदायिक कर्मकांडे करणे) म्हणजेच देवभक्ती करणे असे समजणाऱ्या एका कर्मठ ब्राह्मणाचा, एक प्रहरापूर्वी मेलेल्या कुत्र्याला केवळ स्वतःच्या पदस्पर्शाने त्याच्या समोर जिवंत करून, त्याचा कर्माभिमान गलित केला. दासगणू म्हणतात, "समर्थ साक्षात भगवंत | ऐसी प्रचिती आली तया ||."

श्रीमंत गोपाळराव बुटी - श्रीमंत गोपाळराव बुटी हे नागपूरचा कुबेर म्हणवून घेण्याइतपत धनवंत होते; तेही महाराजांचे भक्त होते. नागपुरच्या सिताबर्डी ह्या भागात त्यांचा ५२ खोल्यांचा आलिशान आणि भव्य असा वाडा होता. त्यांच्या श्रीमंतीविषयीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. ते सावकारी करीत. त्यामुळे दर महिन्याला त्यांना व्याज अथवा मुद्दलरूपात मिळणाऱ्या धनाने भरलेल्या गोण्या लादलेल्या बैलगाड्यांची रांग त्यांच्या घरापासून कित्येक किलोमीटर दूरपर्यंत असे. अर्थात त्यांनी त्यांच्या पैशाचा संतसेवेकरिता योग्य असा विनियोग केला हेही तितकेच खरे आहे. त्यांच्या आग्रहामुळे महाराज १९०८ला नागपूरच्या सीताबर्डी भागात त्याच्या आलिशान वाड्यात त्याच्या भावनांचा मान राखण्याकरिता गेले. महाराज त्याच्या वैभवाला भुलून मुळीच गेले नव्हते, ते तर अनेक भक्तांचा उद्धार करण्याकरिता तेथे गेले होते. महाराजांना तो महालात कोंडून ठेऊ शकला नाही; महाराज नागपुरात सर्वत्र हिंडून लोकोद्धार करीत. शेवटी मनगटाच्या बळावर[ संदर्भ हवा ] हरी पाटलांनी त्यांना परत शेगांवी आणले.

धार कल्याणचे रंगनाथ महाराज - धार कल्याणचे रंगनाथ महाराज त्यांना भेटायला आले, परंतु त्यांचे सांकेतिक भाषण समजण्यास कोणीच समर्थ नव्ह्ता. या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, "धार कल्याणचा साधु रंगनाथ|आला शेगावासी भेटावया|उभयतांमाजी ब्रह्मचर्चा झाली|ती ज्यांनी ऐकली तेच धन्य||." "श्रीवासूदेवानंद सरस्वती | जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती | ऐशा जगमान्य विभूती | आल्या आपल्या दर्शना ||," असे दासगणूंनी सार्थच म्हंटले आहे. "तुम्हा दोघांचा मार्ग वेगळा असूनही तुम्ही दोघे भाऊ कसे?" ह्या बाळाभाऊच्या प्रश्नाला उत्तर देतानाच महाराजांनी 'ज्ञानाच्या गावी' जाण्याचे तीन मार्ग कोणते, त्या त्या मार्गांचे पालन कसे केले जाते आणि त्या मार्गाने जाऊन संतत्व प्राप्त केलेल्या आजवरच्या थोर विभूतींची नावे इत्यादि गोष्टींवर सुंदर आणि रसाळ विवेचन केले. सरतेशेवटी महाराज म्हणाले, "जो माझा असेल | त्याचेच काम होईल | इतरांची ना जरूर मला ||." महाराजांचे म्हणणे आहे की व्यर्थ धार्मिक वादविवादात पडू नका, ते म्हणतात, "कोणी काही म्हणोत | आपण असावे निवांत | तरीच भेटे जगन्नाथ | जगदगुरु जगदात्मा ||."
बायजा माळीण - मुंडगावच्या बायजा माळिणीचे लग्न एका नपुंसकाशी झाले होते, तिच्या थोरल्या दिराने तिला स्वतःच्या पापवासनेला बळी पाडायचे ठरविले.[ संदर्भ हवा ] परंतु सच्छील बायजाबाई त्याच्या वासनेला बळी पडली नाहीच उलट तिने महाराजांना सदगुरु मानून अखंड भक्तीत उर्वरीत आयुष्य घालविले. मुंडगावचाच आणखी एक परमभक्त, पुंडलीक भोकरे सोबत बायजा शेगावच्या वाऱ्या करू लागली, तेव्हा समाजकंटकांनी तिच्या चारित्र्यावर शंका घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्यावर आलेले चारित्र्यहननाचा बालंट दूर् करून महाराजांनी तिला, 'जशी नामदेवाची जनी, तशीच माझी बायजा' असे सांगून तिच्या भक्तीचा आणि पावित्र्याचा गौरव केला. तसेच महाराजांनी पुंडलिकाला सांगितले की बायजा ही त्याची पूर्वजन्मीची बहीण होती आणि त्याने तिला अंतर देऊ नये. महाराजांचे शब्द पुंडलिकाने अखेरपर्यंत पाळले. बायजाबाईच्या मृत्यूनंतर २८ वर्षांनी (म्हणजे १९६८ मध्ये) पुंडलिकाचे मुंबईत जरी निर्वाण झाले तरीदेखील त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार त्याची समाधी मुंडगावी बायजाबाईच्या समाधीजवळच बांधली आहे. जिच्या आयुष्याचे महाराजांनी सोने केले त्या बायजाबाईने १९४० मध्ये पुण्यदिनी देह ठेविला. आज मोठ्या आदराने तिचा "सती बायजाबाई" असा उल्लेख करतात.

बंकटलाल अगरवाल - पातुरकरांच्या घरामधील भेटीनंतर महाराज तेथून वेगाने निघून गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागले. महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले. तोवर बंकटलालाने वाटेमध्ये भेटलेल्या पितांबरासारख्या भोळ्याभाबड्या मित्राला महाराजांच्या थोरवीची कहाणी ऐकविल्याने तोही महाराजांना भेटावयाला उत्सुक आला होता. तो प्रसंग होता टाकळीकरांच्या कीर्तनाचा. भागवताच्या एकादश स्कंधातील ज्या श्लोकाचा पूर्वभाग कीर्तनकार बोलले त्याचा उत्तरार्ध महाराज दूर लिंबाच्या झाडाखाली बसून उच्चारते झाले; कीर्तनकारबुवा थक्कच झाले. त्यानंतर बंकटलाल मोठ्या सन्मानाने महाराजांना स्वगृही घेऊन गेला व त्यांना मोठ्या प्रेमादराने त्यांना तेथे ठेवून घेतले. परंतु महाराज स्वतः सच्चे परमहंस संन्यासी असल्याकारणाने काही कालावधीनंतर त्यांनी बंकटलालाचे घर सोडून दिले व ते गावातील मारुतीच्या मंदिरात विसावले. महाराजांच्या समाधीनंतर जेव्हा समाधीसमोर अनेक धार्मिक कार्यक्रम झाले त्यांत बंकटलालाच्या सुपुत्राने केलेला शतचंडीचे अनुष्ठान अथवा यज्ञ प्रख्यात झाला. त्या समयी बंकटलालाचा देहान्त होण्याचा प्रसंग उद्भवल्याने सर्वच चिंतीत झालेले पाहून बंकटलालाने सर्वांना सांगितले, "अरे, माझा तारक समाधीमध्ये बसला असताना तुम्ही कशाला काळजी करता!" त्यांच्या भक्तीनुसार त्यांच्या जिवावरचे संकट टळले आणि यज्ञसांग झाला. बंकटलालाचे सदन आजही शेगांवला पहावयास मिळते; सर्व भक्त्तांनी ते अवश्य जाऊन पहावे.

पुंडलिक भोकरे - महाराजांच्या भक्तरत्नांमध्ये श्री पुंडलीक भोकरेंचे नाव आवर्जून घेतले जाते. अतिशय लहान असतानाच पुंडलिकाला भक्तिचे बाळकडु पूर्वभाग्याने लाभले होते. आईवडिलांचा एकुलता एक असल्याने तो फारच लाडावलेला होता. एकदा लहानपणी एका सणाच्या दिवशी पुरणपोळीऐवजी त्याने तांदूळडाळीची खिचडी खाण्याचा आग्रह धरल्याने त्याला आईकडून मार मिळाला; त्याच तिरमिरीत तो काही वारकऱ्यांसोबत सरळ शेगावला निघून आला. वारकरी रांगेतून एकएक करून श्री महाराजांचे दर्शन घेत होते, जेव्हा पुंडलिकाची पाळी तेव्हा श्री महाराजांनी त्याला जवळ बसवून घेतले आणि साळूबाईला "गरम गरम खिचडी आणि तूप" आणायला सांगितले. त्याचक्षणी पुंडलिकाची त्याच्या सद्गुरुमाऊलिशी ओळख पटली. समोर बसलेल्या त्रिकालज्ञ देवाला पाहून भारावलेला पुंडलीक जन्मोजन्मींकरिता त्यांचा भक्त झाला. त्यानंतर त्याने वद्यपक्षात मुंडगाव ते शेगाव ही पायी वारी करण्याचा नियम केला आणि तो अविरतपणे पाळला. सद्गुरुमाऊलींनी त्याला स्वतःच्या पादुका दिलेली घटना सर्वांना विदितच आहे. त्यानंतरही आश्चर्यकारक घटना घडली ती अशी. झ्यामसिंगाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पुंडलिकाने स्वतः जवळच्या पादुका त्याच्या घरी ठेवण्याकरिता दिल्या; प्रतिवर्षी उत्सवामध्ये पादुकांची पालखी उचलण्याचा पहिला मान पुंडलिकाला दिला जात असे. परंतु, झ्यामसिंगाच्या मृत्युनंतर इतर भक्तांनी त्या पद्धतिस आक्षेप घेतला व पुंडलिकास तो मान दिला नाही. तेव्हा व्यथित झालेल्या पुंडलिकाने आमरण उपोषण आरंभले. त्याच्या आईला भयंकर चिंता वाटू लागली. सरतेशेवटी, मध्यरात्री धाङ्कन दरवाजा उघडला आणि आश्चर्य म्हणजे साक्षात श्री महाराज सरळ दरवाजातून आत प्रवेशले. ते म्हणाले, "वेड्या पादुका गेल्याचे दु:ख कशाला करतोस? मी तर प्रत्यक्ष तु़झ्या हृदयातच स्थित आहे," असे म्हणून ते त्याच्या छातीवर उभे राहिले आणि नंतर अंतर्धान पावले. ही गोष्ट श्री महाराजांनी समाधी घेतल्यानंतर कित्येक वर्षांनंतर घडलेली आहे. श्री महाराजांची कृपा झाल्याने पुंडलिकाला अंतर्ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले कित्येक शब्द अक्षरश: खरे झाल्याच्या कितीतरी घटना मुंडगावच्या पंचक्रोशीतील लोक आजही सांगतात. श्री महाराजांनी त्यांना, "बायजा तुझी पूर्वजन्मिची बहिण असून, ह्या जन्मीही तू तिला अंतर देऊ नकोस," ही आज्ञा त्यांनी तंतोतंत पाळली. शेवटी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना औषधपाण्याकरिता मुंबईला जावे लागले. तेथेच त्यांचा मृत्यु झाला (सन १९६८). स्वतःच्या मृत्युची त्यांना पूर्वकल्पना असल्याकारणाने त्यांनी सती बायजाबाईच्या कुटुंबियांना मुंबईला जाण्यापूर्वी "अक्काजवळच थोडी जागा द्याल का?" अशी विनंती केली होती. त्यांच्या विनंतिला मान देवून त्यांचा पार्थीव देह मुंबईहून मुंडगावला वाजतगाजत आणला गेला. सती बायजाबाईंच्या समाधिशेजारीच तिच्या लाडक्या धाकट्या भावाची समाधिदेखिल बांधली गेली.