Get it on Google Play
Download on the App Store

लेखन

महात्मा गांधींनी विपुल लेखन केले आहे. अनेक दशके त्यांनी बऱ्याच वर्तमानपत्रांचे संपादन केले. यामध्ये गुजराती, हिंदी आणि इंग्रजीमधील हरिजन, दक्षिण आफ्रिकेमध्ये असतांना इंडियन ओपिनियन आणि भारतात परत आल्यावर इंग्रजीमधील यंग इंडिया, गुजराती मासिक नवजीवन यांचा समावेश आहे. नंतर नवजीवन हिंदीमधून पण प्रकाशित केले गेले. या बरोबरच, ते जवळपास प्रत्येक दिवशी अनेक वर्तमानपत्रांना आणि व्यक्तींना पत्रे लिहीत असत.

गांधींनी काही पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रकाशित झाले आहे. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील संघर्षावर त्यांनी "Satyagraha in South Africa (दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह)" हे पुस्तक लिहिले आहे. तसेच त्यांनी "हिंद स्वराज" किंवा "Indian Home" ही राजकीय पुस्तिका लिहिली आहे आणि जॉन रस्किनच्या "Unto This Last" चे गुजराती भाषांतर केले आहे. हा शेवटचा लेख त्यांच्या अर्थशास्त्रावरील विचारसरणीचे वर्णन करतो. त्यांनी शाकाहार, आहार आणि स्वास्थ्य, धर्म, सामाजिक परिवर्तन इत्यादी विषयांवरसुद्धा विपुल लेखन केले आहे. ते सामान्यतः गुजराथीमध्ये लिखाण करत, पण त्यांच्या पुस्तकांच्या हिंदी आणि इंग्रजी भाषांतरांचे परीक्षणसुद्धा ते करत असत.

गांधींचे पूर्ण लेखन भारत सरकारने "संकलित महात्मा गांधी" (The Collected Works of Mahatma Gandhi) या नावाखाली १९६०च्या दशकात प्रकाशित केले आहे. यामध्ये जवळपास १०० खंड व त्यांची ५०,००० पृष्ठसंख्या आहेत. इ.स. २००० मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधित आवृत्तीवरून अनेक वाद झाले होते. सरकारने राजकीय फायद्यासाठी त्यात बदल केले आहेत असा आरोप गांधींच्या अनुयायांनी केला होता.