Get it on Google Play
Download on the App Store

तत्त्वे

गांधीजीनी एकादश (अकरा) व्रतांचा स्वीकार केला होता. ती पुढीलप्रमाणे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन (निर्भयता), सर्वधर्म सामान्ताव्य (सर्वधर्म समभाव), स्वदेशी, स्पर्शभावना (अस्पृश्यतेचा त्याग). निर्भयता या तत्वाला गांधीजी आधारभूत मानत. त्यांच्यामते निर्भयतेमुळेच इतर तत्वांचे पालन करता येऊ शकते.

सत्य

गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केले होते. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रसिद्ध आहे. गांधीजींनी म्हटले आहे की, सर्वांत महत्त्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय. "परमेश्वर सत्य आहे." असे त्यांचे मत होते. पुढे त्यांनी ते, "सत्य (हेच) परमेश्वर आहे." असे बदलले.

अहिंसा

जरी अहिंसेचे तत्त्व गांधीजींनी स्वतः मांडले नसले तरी इतक्या मोठ्या राजकीय स्तरावर अहिंसेचा अवलंब करणारे ते पहिले व्यक्ती होते. हिंदू, बौद्ध, जैन, ज्यू धर्मात अनेक ठिकाणी अहिंसेच्या तत्त्वाचा उल्लेख आहे. "माझे सत्याचे प्रयोग" मध्ये गांधीजींनी त्यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान मांडले आहे. ते म्हणतात,

"जेव्हा मी निराश होतो,तेव्हा मी स्मरण करतो की, इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेमाचाच विजय होत आला आहे. (इतिहासात) अनेक क्रूरकर्मे होऊन गेले आणि काही काळासाठी ते अजिंक्य पण वाटले, पण नेहमी शेवटी त्यांचा पराभवच झाला आहे-विचार करा, नेहमीच."
"विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली-(त्यातील) मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहीनांसाठी काय फरक असणार?"
"डोळ्यासाठी डोळा सर्व जगाला आंधळे करून सोडेल."
"अशी अनेक ध्येये आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन."

पण गांधीजींना माहीत होते की, अहिंसेचे या पातळीपर्यंत पालन करण्यासाठी प्रचंड श्रद्धा आणि धैर्य आवश्यक आहे, आणि प्रत्येकाजवळच ते असणे शक्य नाही. त्यामुळे ते सल्ला देत की जर अहिंसा भित्रेपणाला झाकण्यासाठी वापरण्यात येत असेल तर प्रत्येकाने अहिंसेचे पालन करणे आवश्यक नाही.

स्वदेशी
शाकाहार


लहानपणी अनेकदा गांधीजींनी मांस भक्षण केले होते. ते मुख्यत्वेकरून त्यांच्या कुतुहलामुळे तसेच त्यांचा मित्र शेख मेहताब याच्या सांगण्यावरून होते. शाकाहाराची कल्पना हिंदू तसेच जैन प्रथांमध्ये खोलवर रुजली आहे. तसेच गांधीजींची जन्मभूमी गुजरातमध्ये बहुतांश हिंदू आणि सर्व जैन शाकाहारी होते आणि गांधीजींचे कुटुंबही याला अपवाद नव्हते. लंडनला शिकायला जाण्याआधी गांधीजींनी त्यांची आई पुतळीबाई आणि काका बेचारजी स्वामी यांना वचन दिले होते की ते मांस, बाई व बाटली (दारू) यांच्यापासून दूर राहतील. पुढे गांधीजी कडक शाकाहारी बनले. त्यांनी "मोराल बेसिस ऑफ व्हेजिटेरिअनिझम" (Moral Basis of Vegetarianism) हे पुस्तक लिहिले आहे तसेच शाकाहारावर अनेक लेखसुद्धा लिहिले आहेत. त्यातील काही लेख लंडन व्हेजिटेरिअन सोसायटीच्या "द व्हेजिटेरिअन" या प्रकाशनातून प्रसिद्ध झाले आहेत.