Get it on Google Play
Download on the App Store

बॅरिस्टर

शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी इ.स. १८८८ मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यानी इनर टेंपल या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला जैन साधूच्या उपस्थितीत आपण मांस, बाई व बाटली (दारू) यापासून दूर राहू असे वचन दिले होते, त्याचे त्यांनी तिथे पालन केले. परंतु लंडन मधील सपक शाकाहारी जेवणाची चव त्यांना आवडली नाही. आणि लंडनमधील दुर्मिळ असलेली एक भारतीय खानावळ सापडेपर्यंत ते खूप वेळा उपाशी राहत. गांधींनी तेथे इंग्रजी चालीरीती ग्रहण करण्याचा प्रयत्‍न केला. उदाहरणार्थ नर्तनाची शिकवणी लावणे. ते इंग्लंडमध्ये शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले आणि लवकरच त्याच्या अध्यक्षपदी पोहोचले. तेथे ज्या शाकाहारी व्यक्तीना गांधी भेटले, त्यातील काही स्त्रिया थिओसोफ़िकल सोसायटीच्या सदस्य होत्या. त्यांनी गांधीना आपल्यात येऊन मिळण्यासाठी आणि भाषांतरित आणि मूळ भगवद्‌गीता वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. आधी धार्मिक गोष्टीत रस नसणारे गांधी धार्मिक गोष्टीत रस घ्यायला लागले.

इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले. १८९१ मध्ये ते इंग्लंड सोडून परत भारतात आले. भारतात आल्यावर कळले की त्यांच्या आईचा ते लंडनमध्ये असतानाच देहान्त झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबाने ही बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवली. मुंबईमध्ये कायद्याची प्रॅक्टिस उभी करण्याची त्यांची योजना सफल झाली नाही कारण ते कोर्टात बोलण्यासाठी अतिशय लाजाळू होते. खटल्यांसाठी मसुदा तयार करण्याच्या साध्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ते राजकोटला परत आले परंतु एका ब्रिटिश अधिकार्‍याच्या विरोधात गेल्याने हे काम त्यांना बंद करावे लागले. १८९३ मध्ये त्यानी त्या काळच्या ब्रिटिश साम्राज्यामधील नाताळ (दक्षिण आफ्रिका) येथील दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीतील एका पदासाठी एक वर्षाचा करार केला.