Get it on Google Play
Download on the App Store

चंपारण आणि खेडा

गांधीजीना पहिले मोठे यश १९१८ मध्ये चंपारण आणि खेडामधील सत्याग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकर्‍यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे. यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकर्‍यांची गावे अत्यंत घाणेरडी आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, पडदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गुजरातमधील खेडामध्येसुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला. तिथे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व तिचा सखोल अभ्यास केला. गावकर्‍यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा, रुग्णालयाच्या बांधकामाचे काम हाती घेतले. याचसोबत गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले.

जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली व तो भाग सोडून जाण्यास सांगितले, तेव्हा गांधीजींचा प्रभाव जाणवून आला. हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरुंगाबाहेर, पोलिस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. न्यायालयाने शेवटी नाइलाजाने त्यांची मागणी मान्य केली. गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला. त्यानुसार शेतकर्‍यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळीक मिळाली, तसेच करवाढ होऊन दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक "'बापू"' आणि "'महात्मा"' म्हणून करू लागले. खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकर्‍यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. त्यानतर कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली.