Get it on Google Play
Download on the App Store

मोरी गाय 19

एक दिवस मॅजिक लॅन्टर्नच्या साहाय्याने गोपाळने गोपालनावर सुंदर व्याख्यान दिले. व्याख्यान देता देता त्याने हजारो शेतक-यांची मने जिंकली. त्यांना गोभक्ती शिकवली. प्राचीन वेदकाळापासून आपल्या देशात गोभक्त शिकवली. प्राचीन वेदकाळापासून आपल्या देशात गोभक्ती कशी आली ते त्याने चित्रांतून दाखवले होते. मधून मधून त्याने गीते म्हटली. मो-या गायीचाही त्याने उल्लेख केला आणि शेवटी तिचे चित्र दाखवले. कसायाजवळून घेतलेली, पाच रुपायांनाही महाग असलेली मोरी-आणि सध्याची तेजस्वी मोरी !

मोरी गाय प्रदर्शनाचे मुख्य भूषण होते. मो-या गायीच्या दर्शनाला लोकांचे थवेच्या थवे येत.

मोरीला व चांद्याला धेऊन गोपाळ व सावळ्या परतले. आश्रमात मोरी आली. जणू दिग्विजय करुन आली होती ! त्या दिग्वीजयी गोमातेचे स्वागत करायला वनमाला आणि सावित्री हातात पंचारती घेऊन उभ्या होत्या. त्यांची बाळे दुस-या दोन सेवकांच्या कडेवर होती. गोठ्यातील गायी हंबरल्या. मोरी हंबरली ! आपला भाग्यकाल आला... आला! गोमातेचा आला म्हणजे भारतमातेचाही आलाच. कारण जसजशी गोपूजा वाढेल तसतसे भारताचे भाग्य वाढेल.

भारताचे भाग्य गो-सेवेशी निगडीत आहे. गाय म्हणजे भारताच्या संस्कृतीचे प्रतीक. भारताच्या संस्कृतीचे मंगल चिन्ह. गाय म्हणजे भारताचे तप, गाय म्हणजे भारताचा जय, भारताचे बळ. गाय म्हणजे भारताचे सत्त्व, गाय म्हणजे भारताचे औदार्य़. भारताचा ज्याला उद्धार करायचा आहे त्याने गोसेवा करावी !