मोरी गाय 15
एका वैद्याने शामरावांना सांगितले, “गायीचे निर्भेळ तूप मिळेल तर उपाय आहे. मी एक चूर्ण देईन ते त्या तुपात मिसळून प्यायचं.” वैद्याने औषध देऊन ठेवले. पण गाईचे तूप कोठे मिळणार ? आणि शामरावांच्याजवळ पैसे तरी कोठे होते ? त्यांना कोणीतरी गोपाळचे नाव सांगितले.
मो-या गाईला गर्भ राहीला होता. ती सुंदर दिसे. तीन-चार महिन्यांनी ती व्याली असती. आज गोपाळ गाईचे तूप विकावयास बाजारात जाणार होता ! सावळ्याने मळ्यातील भाजी काढली. छोटी गाडी जुंपली.
“लौकरच या परत.” वनमाला म्हणाली.
“जरा उशीर झाला तर भीती वाटेल एकटीला ?” गोपाळने विचारले.
“मी एकटी थोडीच आहे ? इथं गाई आहेत; बैल आहेत, इथं परमेश्वर आहे. भीती नाही वाटत एकटीला. म्हटलं आपलं लौकर या. मला एकटीला करमत नाही.” वनमाला म्हणाली.
“अगं, गाईची वासरं आहेत. फुलझाडं आहेत. त्यांच्याशी खेळ. नाहीतर पाणी घाल झाडांना.” गोपाळ म्हणाला.
“मी दमत्ये. तुम्ही लवकर याल का?”
“हो, हो. येऊ. झालं ?” गोपाळ म्हणाला.
“सावळ्या... लौकर या रे.”
“होय वयनी. लौकर येऊ.” सावळ्या म्हणाला. गाडी बाजारात गेली.
वनमालेने थोडा वेळ सूत काढले. मग थोडा वेळ बागेत रमली. मग गोठ्यात जाऊन तिने शेणमूत दूर केले. अंगण झाडले. घरातील दिवे पुसले. तो गाडीच्या घुंगरांचा आवाज आला. “आले वाटतं...” म्हणून वनमाला बाहेर आली. गाडीत आणखी कोणी तरी होते. ती ओसरीत उभी राहिली. गोपाळ शामरावांना घेऊन ओसरीवर आला. “आपल्या घरात ते कमळीचं तूप ठेवलेलं आहे ना ? ते आण बरं.” गोपाळ वनमालेला म्हणाला. गोपाळने प्रत्येक गायीला नाव दिले होते. तो गायींवर वेगवेगळे प्रयोग करी. कमळीला दुधाचा चारा थोडा देण्यात येत असे. कमळीच्या दुधाचे तूप कसे रसरशीत होते. “पाहिलतं शामराव, मी मुद्दाम हे विकत नाही. औषधाला म्हणून ठेवलं आहे. तु्म्ही यातील दोन शेर घेऊन जा. पैसे नको हो. बरी होऊ दे तुमची बायको म्हणजे झाले.” गोपाळ म्हणाला.
गोपाळ त्यांना गायी दाखवायला गेला. पाहता पाहता ते मोरीजवळ आले. “ही आमची आराध्यदैवत. विईल दोन-तीन महिन्यांनी, मग तुम्हांला तूप देऊ पाठवून.” गोपाळ म्हणाला.
शामराव ऐकत होते. ते गायीकडे पाहातच राहीले. त्यांनी गायीला ओळखले नाही, पण तिने ओळखले, ती ओशाळली, लाजली. आपल्याला पाहून धनी लाजेल, शरमेल. आपल्याला त्याने ओळखू नये म्हणून तिने मान फिरवली.
“ही कुठं मिळाली गाय तुम्हाला ?” शामरावांनी विचारले.
गोपाळने सारी हकीगत सांगितली. शामरावांच्या डोळ्यांतून आसवे ओघळली ! ते मोरीजवळ आले. मोरीने त्यांचे पाय चाटले.