मोरी गाय 9
गोपाळ सजनच्या गायी पाहू लागला, “आज तुमच्या पसंतीस यातली एकही येणार नाही, ही तर अगदी फुकट गाय. लोक मला हसले, पण घेतली मी विकत पाच रुपयांस! काय वाटलं कोणास ठाऊक. मला तिची करुण, केविलवाणी मुद्रा पाहून तिला घ्यावसं वाटलं.” सजन सांगत होता. गोपाळ मोरीकडे पाहू लागला. “काय बघता इतकं त्या गायीला? माझं अंग चाटू लागली. जरा आश्चर्य़कारक गाय आहे नाही!” सजन स्वतःच आता गायीकडे पाहू लागला.
गोपाळ म्हणाला, “सजन, ही गाय मी घेऊन जातो. ही फार थोर गाय आहे. जणू माझी मायच आहे. माझ्या आईची गाईवर फार भक्ती, हिला पाहून वाटतं, ती तर नाही हिच्या रुपात अवतरली? माझं हृदय हिला पाहताक्षणीच विरघळलं. आज मी बाजाराला येणारच नव्हतो. सध्या ब-याच गायी झाल्या आहेत. अरे, पैसे तरी कोण देतो? मदत कोण करतो? पुढं गायी दूध देतील, उत्पन्न होऊ लागलं तर वाढवता येईल पसारा. परंतु घरी मला स्वप्न पडलं. भगवान् गोपालकृष्ण जणू म्हणाले, ‘जा, जा. माझी गाय घेऊन ये.’ मी जागा झालो, उठलो. भगवंताची इच्छा मी जावे अशी, म्हणून आलो. योगायोगा तरी पहा सा. सजन, ही मी घेऊन जातो. जणू धवल यशाचा, सत्त्वकलांचा चंद्रमा हिच्या माथ्यावर, भालप्रदेशावर विलसत आहे. पवित्र व पुण्य वस्तू, सजन, तू आज मला दिलीस! सजन, तूही गोभक्त आहेस हो! सजन, मी हिला नेतो. आज माझं हृदय भरुन आलं आहे. घे हे पाच रुपये.” गोपाळने पाच रुपये सजनच्या पुढे केले.
“गोपाळदादा, नको मला या गाईचे पैसे! तिनं माझं अंग चाटलं; जणू आईचं प्रेम मला दिलं! ती थोर माता गोरुपाने आली असेल.” सजनने एक सैल दोरी मोरीच्या गळ्यात बांधली व ती गोपाळच्या हाती दिली. त्याने गायीला वंदन केले. सजन इतर गायी घेऊन गेला.
मोरीला त्या इतर गायींची करुणा आली. आपण तेवढे जगावे, याचे तिला वाईट वाटले. परंतु मी मरणाला तयार नव्हते का? मी स्वार्थासाठी थोडीच जगत आहे? परमेश्वराची सारी इच्छा! असे मानून मोरी गाय गोपाळकडे गेली.