मोरी गाय 8
मो-या गायीला ते ऐकून प्रेमाचे भरते आले. सजनची इतर कसायांनी चेष्टा केली. तो म्हणाला, “त्या गाईचे अधिक हाल होऊ नयेत म्हणून ती मी विकत घेतली. तिला मी घेतलं नसतं तर त्या शेतक-यानं तिचे हाल केले असते. अन्न-पाण्याशिवाय मारल असतं. माझ्याकडे की गाय किती आशेनं पाही. तिचे मी हाल नाही होऊ देणार. एका घावानचं मान दूर करीन तिची!”
मोरीला कृतज्ञता वाटू लागली. ती सजनचे हात चाटू लागली. सजनला आश्चर्य़ वाटले. मारणा-यावर प्रेम करणारी ती गाय! सजनच्या डोळ्यांत पाणी आले. सजन प्रेमाने तिच्या पाठीवरुन हात फिरवत होता. मित्र म्हणाले, “सजन, चल घरी.” सजन म्हणाला, “अजून मला काम आहे. अजून तो गोपाळ कसा आला नाही? मी घेतलेल्या गायीत एखादी चांगली गाय असली तर तो घेऊन जातो. मी तेवढ्याच पैशांत त्याला देतो. तो गायीची उपासना करतो. सेवा करतो. गायीच्या सेवेत आपलंही कल्याणच आहे. आपण भाकर खातो ती गायीच्या पुत्राच्या श्रमाचीच ना? गोपाळ फार थोर मनाच तरुण आहे. त्यानं गोसंवर्धन शाळा उघडली आहे; जणू गायींचा आश्रमच त्यानं काढला आहे. आज अजून का येत नाही! का त्याच्याजवळ पैसे नाहीत?” सजन असे म्हणत आहे तो गोपाळ दिसला.
सजनचे शब्द ऐकून मोरीच्या मनात विचार आले. ‘आपल्याला तो गोपाळ घेईल का? तो गोपाळकृष्ण तर नाही? स्वतः परमात्मा तर नाही? या सज्जन कसायाच्या हाती मी पडल्ये. दुस-या कसायांनी लगेच दंडे हाणीत नेले असते. घेईल का गोपाळ आपल्याला विकत? पण लगेच मनात येई, कशाला जगायची आशा? त्या देवाजवळ, त्याच्या अव्यंग धामी जा. पण का आशा धरु नये? मी मानवाची जास्त सेवा करीन. सेवेसाठी जगता आले तर त्यात किती आनंद आहे? यामुळं मर्त्यलोकाचा देवानाही हेवा वाटतो. ही कर्मभूमी. ही सेवाभूमी, मला संधी सापडली की, मी त्यांची सेवा करीन. म्हणावं, प्रेमदृष्टीनं बघा; दोन काड्या घाला; वेळेवर पाणी दाखवा; मी त्यांच्या बाळांना दूध देईन.’ असे विचार ती मनात खेळवीत होती.
तो पाहा गोपाळ आला, सजनने त्याला सलाम केला. त्याने उलट केला. “आज फार गाई आल्या नव्हत्या. पुढच्या बाजाराला येतील. आणि गोपाळदादा, चांगली गाय आज एकसुद्धा नव्हती. सा-या मरतुकड्या, मी तीन-चारच विकत घेतल्या.” सजन बोलत होता. मोरीचे हृदय खालीवर होत होते, ती गोपाळकडे बघे आणि पुन्हा खाली मान घाली. जगण्यासाठी याचना नको. मोरी सत्त्वनिष्ठा होती.