दुसरा विवाह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर, दिल्ली, १९४८
इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाई यांचे निधन झाले. १९४० च्या दशकात भारताच्या संविधानाचा मसुदा पूर्ण केल्यानंतर डॉ. आंबेडकरांना झोप येत नव्हती कारण त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक वेदना होत होत्या आणि ते इंसुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते. यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर ह्या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील सदस्य होत्या. पुढे त्यांनी कबीरांशी १५ एप्रिल १९४८ रोजी नवी दिल्ली येथील आपल्या घरी नोंदणी पद्धतीने विवाह केला. डॉ. कबीर यांच्याकडे डॉ. आंबेडकरांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय ज्ञान होते. आंबेडकरांसोबत विवाहानंतर शारदा कबीरांनी सविता आंबेडकर हे नाव स्वीकारले आणि आयुष्यभर त्यांची काळजी घेतली. 'माई' किंवा 'माईसाहेब' म्हणून ओळखले जाणाऱ्या सविता आंबेडकर यांचे २९ मे २००३ रोजी नवी दिल्लीतील मेहरौली येथे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.