'बाबासाहेब' उपाधी
डॉ. भीमराव आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध आहेत. बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांना बाबासाहेब ही उपाधी त्यांचे अनुयायी व भारतीय जनतेने सप्टेंबर-आक्टोबर १९२७ मध्ये बहाल केली. 'बाबासाहेब' चा अर्थ 'पिता' किंवा 'वडील' असा आहे. प्रथम त्यांचे अनुयायी त्यांना 'बाबासाहेब' म्हणत असत, नंतरच्या काळात हेच नाव रूढ झाले आणि त्यांचे विरोधकही त्यांना बाबासाहेब संबोधू लागले. आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना 'बाबासाहेब' संबोधित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीमा, भीम, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बाबासाहेब इत्यादी नावांनी संबोधिले जाते. आंबेडकरवादी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी आणि बाबासाहेबांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी जय भीम हा शब्द आदराने व अभिमानाने उच्चारतात. 'जय' चा अर्थ 'विजय', 'भीम' चा अर्थ 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' आणि 'जयभीम' या संयुक्त शब्दाचा अर्थ 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो' असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरूवात बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी असलेल्या एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९४१ पासून स्वत: बाबासाहेब ''जय भीम'' लिहू लागले आणि अभिवादन म्हणूनही जयभीम वापरू लागले तसेच अभिवादनाच्या उत्तरातही ते जयभीम वापरू लागले. आधुनिक भारतातील प्रथम समतावादी पुरूष हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.