Get it on Google Play
Download on the App Store

गोपाळकाला/दहीहंडी

उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो, व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला |गोकुळात आनंद झाला | असे गाणे गात अनके लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जाता व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.

गोपाल म्हणजे गायींचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. काला म्हणजे एकत्र मिळविणे.
पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते.  गोमंतकात याच काल्याला गवळणकाला म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणतात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात. हा गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.