Android app on Google Play

 

भुजरिया

 

राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे भाद्रपद वद्य प्रतिपदेला, मध्य प्रदेशातील गावांमध्ये भुजरिया नावाचा सण साजरा होतो. या सणादरम्यान लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक व्यक्ती भुजलियांची देवाणघेवाण करताना दिसतात. या दिवशी देशात समृद्धी आणि शांती रहावी अशी कामना केली जाते. गावातील लोकांमधील जातिभेद दूर होऊन सदभाव नांदावा यासाठी हा सण उत्साहात साजरा होतो. भुजरिया पर्वाच्या दिवशी विविध संस्था भुजरिया संमेलन भरवतात.

भुजरिया सणाच्या निमित्ताने घरात राखून ठेवलेल्या गव्हाच्या बियाणांची गुणवत्ता तपासली जाते. या सणाच्या दिवसाआधी, म्हणजे श्रावण शुक्ल नवमीला एका बांबू आणि मोहाच्या पानांनी बनलेल्या टोपलीत माती भरून तीत कोठारात बिजाणे म्हणून जपून ठेवलेल्या गव्हाचे थोडे दाणे पेरतात. भुजरियाच्या दिवशी टोपलीत उगवलेली कोवळी रोपे उपटून ती तलावावर किंवा नंतर त्यांची पूजा करून त्यांची मिरवणूक काढतात. नंतर गावकरी त्या रोपांची आपआपसात देवाणघेवाण करून त्यांची गुणवत्ता तपासतात. या सणाच्या दिवशी तलावांवर जत्रेचे वातावरण असते.

गव्हाच्या या कोवळ्या रोपांना भुजलिया किंवा कजलिया म्हणतात. काही पंचांगांत या सणाचे नाव कजलिया पर्व असे दिलेले आढळते.