Get it on Google Play
Download on the App Store

संपादकीय

"आषाढस्य प्रथम दिवसे .. " ह्या ओळीने महाकवी कालिदास मेघदूत ह्या आपल्या काव्याची सुरुवात करतात. वैशाख-आषाढांत पावसाची सुरुवात होते पण श्रावणात हा पाऊस यौवन धारण करतो. अक्षातून अगम्य पद्धतीने पडणारे पाणी, ढग, कडाडणाऱ्या विजा इत्यादींचे कौतुक मानवाला हजारो वर्षांपासून आहे.

भारताच्या संस्कृतीतील सर्वांत जुने पुस्तक म्हणजे रिग्वेद. रिग्वेदांत अनेक प्रकारच्या प्राचीन कथा आहेत.  म्हणजे दशराजन. दहा राजांच्या युद्धाची कथा. सुदास हा भारतीय राजा तापी नदीच्या किनाऱ्यावर राज्य करत होता. त्याचे गुरु वसिष्ठ. तर ९ ईराणी जमाती आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण प्रदेशांत राज्य करत होत्या ह्यांचे गुरु होते विश्वामित्र. ह्या नऊ राजांनी एकत्र होऊन सुदास वर हल्ला चढवला. सुदास चा पराभव निश्चित होता पण ऐन वेळी पावसाने सुदासची साथ दिली. तापी नदी पार करताना ढगफुटी झाली आणि अचानक पाण्याचा लोंढा येऊन ९ राजाच्या सेनेला प्रचंड नुकसान करून गेला. ह्यामुळे सुदास ते युद्ध जिंकला. ह्या युद्धानंतर ईराणी जमाती एक तर पुन्हा कधी भारताच्या दिशेने आल्या नाहीत किंवा भारतीय संस्कृतीत त्या मिसळून गेल्या. ह्या ९ जमाती पैकी ८ आजची इराण देशांत आहे. कथा सांगायचे प्रयोजन म्हणजे रिग्वेदांत सुद्धा पाऊस आणि त्याचे मानवी संस्कृतीवरील प्रभाव हे इतक्या ठळक पणे मांडले गेले आहे.

थोर हा नॉर्डिक देव. मारवेल कॉमिक्स मधून हा आम्हा सर्वानाच हा ठाऊक आहे पण एके काली जर्मन प्रदेशांत लोक थोर चे भक्त होते. थोर हा वादळ आणि विजा ह्यांचा देव आहे तर फ्रे हा पावसाचा देव आहे. ज्या पद्धतीने वरून ह्या देवाला भारतीय संस्कृतीत अगदी महत्वाचे स्थान आहे तिथे फ्रे ला विशेष स्थान नाही. ह्याचे कारण म्हणजे ज्या पद्धतीने भारतांत मान्सून असतो त्या पद्धतीने पाऊस त्या प्रदेशांत पडत नाही पण वीज कडाडणे आणि वादळे इत्यादी मात्र वारंवार येतात. त्यामुळे थोर हा महत्वाचा देव असला तरी फ्रे तितका महत्वाचा देव नाही.

वरुण ह्या देवतेचा इतिहास सुद्धा रंजक आहे. भारतीय लोक ज्याला वरुण म्हणतात त्याला इराणी किंवा पारसी लोक अहूर माझदा म्हणून संबोधतात. हिंदू संस्कृतीत इंद्राचे जे स्थान आहे तेच स्थान त्यांच्या संस्कृतीत अहूर मजदा चे होते. इराणी भाषेतील अहूर म्हणजे संस्कृत मधील असुर. त्यांच्या भाषेंत असुर म्हणजे देव. त्यांच्या दृष्टिकोनातून इंद्र इत्यादी देव म्हणजे खलनायक होते. पण १० राजाच्या युद्धा नंतर इराणी जमातींचा पराभव झाला आणि त्यांच्या देवाला वरूण ह्या नावाने हिंदू वेदात मनाचे स्थान प्राप्त झाले.

पाऊस ह्या संकल्पनेला फक्त धार्मिक समजूतींनाच प्रभावित केले असे नाही तर नाट्य, संगीत, काव्य आणि विज्ञान ह्यांत सुद्धा पावसाने मानवाला आपल्या क्रियाशीलतेला चालना देण्यास भाग पडले. कालिदासाचे मेघदूत ह्याचा अक्षरशः अर्थ ढगांचा संदेशवाहक असाच होतो. संगीतात तर अक्षरशः अनेक राग आणि चाली पावसाला संबंधित आहेत. असे म्हटले जाते कि तानसेन गाऊ लागला तर पाऊस पडत असे. चातक आणि त्याचे पर्जन्य प्रेम हा तर भारतीय काव्यांत वारंवार येणारा अलंकार आहे. असे म्हटले जाते कि भारतीय कालमापन हे चंद्रावर आधारित आहे त्यांचे मूळ कारण पाऊस हे आहे. फक्त कालमापन हा उद्देश नसून पावसाचे आगमन इत्यादी जास्त चांगले समजावे म्हणून चंद्र आणि नक्षत्रे ह्यावर आधारित कालमापन प्रणाली भारतात निर्माण झाली.

आधुनिक काळांत सुद्धा पाऊस हा आमच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला आहे. राजकपूर आणि नर्गिस ह्यांचे "प्यार हुवा इकरार हुवा" हे पावसातील गाणे कुणाला आठवत नाही ? त्यानंतर "टीप टीप बारसा पानी" म्हणून उत्तान नृत्य करणारी रविना आणि अक्षय सुद्धा तितकीच आमच्या मनात घर करून आहेत. आमच्या चित्रपट क्षेत्रांत पाऊस पाडणे ह्यासाठी एक अक्खे युनिट असते.

माझ्या साठी पाऊस म्हणजे काही तरी नवीन गोष्टीची सुरवात असे समीकरण मनात बसले आहे. बहुतेक लोकांसाठी प्राथमिक शाळेतून, माध्यमिक शाळेंत, शाळेतून कॉलेज मध्ये जाणे इत्यादी बदल जून म्हणजे पावसाळ्यांत होतात त्यामुळे मनात कुठेतरी खोल पाऊस म्हणजे मोठा बदल असे वाटते. शाळा, कॉलेज इत्यादी बदलले कि मित्र, मैत्रिणी बदलतात अभ्यासाचे विषय बदललतात आणि ह्या बदलला लोकलचे धक्के, मेगाब्लॉक आणि छत्री सांभाळत सामोरे जावे लागते. तुमच्या साठी पाऊस म्हणजे नक्की कुठल्या भावना मनात येतात ?

ह्या अंकात अनेक लेखक आणि कवी मंडळींनी त्यांच्या दृष्टिकोनातून पावसाचे वर्णन केले आहे. वाचक मंडळींनी आपले अभिप्राय आम्हाला जरूर पाठवावेत. आरंभ मासिक १००% विनामूल्य असून ह्यावर काम करणाऱ्या सर्व व्यक्ती मोबदला न घेता काम करतात. त्यामुळे आपला अभिप्राय हाच आमच्यासाठी मोबदला आहे आणि त्यामुळे काम करण्यासाठी आम्हाला हुरूप चढतो. आपले अभिप्राय आमच्या फेसबुक पेज वर जरूर कळवावेत.

लोभ असावा.

धन्यवाद!

अक्षर प्रभू देसाई
सह-संपादक