Get it on Google Play
Download on the App Store

श्रीआनंद - अध्याय तिसरा

सन्मार्ग साधन मानवा । देव ब्राम्हाणांची सेवा ॥
कलि - प्रभावें सर्व देवां । जडत्व प्रकट दिसतसे ॥१॥
त्यांत ज्याची जैसी भक्ती । तैसे देव आराधती ॥
कोणी शिलामय प्रतिमा पूजिती । कोणी पूजिती मृण्मय ॥२॥
आता काष्ठमय देव ते ऐसे । अश्वत्थ - औदुंबर - बिल्व सरिसे ॥
तुलसी आदिकरूनि देवांस । भावना युक्त आराधिती ॥३॥
माझे चित्तीं ऐसें भासे । बहुत दिवस देव तैसे ॥
भजतां भावें सायासें । फलदरूप मग होती ॥४॥
संत - सेवा नोहे तैसी । शरण आले त्यां प्रणतांसी ॥
नमोस्तुते म्हणतां सरसी । चारी पुरुषार्थ सिद्ध होती ॥५॥
तेंच साधूचें दर्शन । ब्रम्हाग्रह गेला उद्धरोन ॥
ऐसे जडमूढ उतरून । जाती क्षण न लागतां ॥६॥
नरसिंह म्हणे बापाजी । कर्णीं चरितामृत बा पाजी ॥
श्रीराम वसगडेमाजी । काय करिते जाहले ॥७॥
वक्ता म्हणे ऐका निश्चळ । वसगडेमाजि श्रीगुरु दयाळ ॥
अनंतभट सह - स्त्री - बाळ । वास्तव्य करोनि राहिले ॥८॥
अनंतवृत्ति श्रीपदीं लीन । अन्य विषयीं उदासीन ॥
प्रपंच होऊन गेला शून्य । सर्व साधन गुरुसेवा ॥९॥
आल्या अतिथास अन्नोदक । दिधल्यावीण आपण देख ॥
भोजन न करणें ऐसा एक । निश्चय दृढतर केला असे ॥१०॥
गृहीं सामुग्री तों पाही । केधवा आहे केधवा नाहीं ॥
अयाचित वृत्ति कोणां कांहीं । याचनेतें नावडे ॥११॥
त्या काळीं प्रपंच ओझें । स्वामीस उचलणें पडलें सहजें ॥
भक्तकोंवसा श्रीगुरुराज । स्वांगें सर्व संपादिती ॥१२॥
गोरज स्नानाचें करूइ मिस । अनंतभटाचे गाईस ॥
शिवेबाहेरून आणावयास । जाय श्रीगुरु माउली ॥१३॥
गाईचे गोठणाचे निकट । चतुष्कोण शिला सगट ॥
त्यावरि बैसावयाचा पाठ । प्रत्यहीं गोरज स्नानाचा ॥१४॥
स्वामींची आसनशिळा । जाणोनि पूजिती सकळ ॥
ती शिळा ग्रामदेवते जवळ । नेउनी ठेविली पूजकें ॥१५॥
प्रत्यहीं गांवचा पूजारी । तया शिळेची पूजा करी ॥
अगम्य चरित्र शिळेवरी । मूर्ति उमटली मारुतीची ॥१६॥
तयास रघुनाथ ऐसें जन । नाम ग्रामस्थें स्थापून ॥
काष्ठ - देवालय बांधून । दीप - नैवेद्य चालविले ॥१७॥
प्रत्यहीं रघुनाथ संगमस्थानीं । यावें हो नेम न चुकेचि ॥१८॥
अनंतभटाची दिनचर्या । चालवणें अवश्य श्रीगुरुवर्या ॥
एके दिनीं सायान्ह समया । प्रस्थान करोनि निघाले ॥१९॥
अनंत निघतां सांगातें । येणें केव्हां होईल ॥२०॥
अंगुलि - त्रय संकेत दाऊन । तेथून केलें सवें गमन ॥
अनंत म्हणे दिवस तीन । येणेची खूण दाखविली ॥२१॥
मग निघतां तेथून । मनीं योजिलें संकेश्वर स्थान ॥
तया स्थळा पोचले जाण । अल्प काळा माझारी ॥२२॥
तेथें संकेश्वर संस्थान । दूर असे ग्राम सोडून ॥
जाउनी तेथें स्वस्थांत:करण । राहते झाले ते स्थळीं ॥२३॥
वंशगुल्म निबिड स्थळ । स्नान - संध्ये योग्य प्रांजळ ॥
निर्वात आणि सोज्वळ । उदकही संनिध तुंबळ ॥२४॥
तेथें बैसोन प्रत्यहीं । संध्या - जप नेम करिती पाही ॥
अनंतें धुंडिली बहुत मही । दर्शनवांछा दिननिशीं ॥२५॥
वियागें व्यग्र मानस । युगासमान वाटे दिवस ॥
केव्हां देखेन श्रीचरणास । प्रेमें मिठी घालीन ॥२६॥
शोधिलें समग्र कृष्णातीर । गौतमी - तटाक नासिक क्षेत्र ॥
करवीरादि कितीएक शहरें । शोधितां ठायीं न पडेचि ॥२७॥
हाक फोडी मोकलून धाये । धाव धाव सदगुरु माये ॥
तुजवीण प्राण जावों पाहे । वेगीं पाय दाखवी ॥२८॥
अशन शयन पान । न करितां करी पर्यटन ॥
एक सद्‌गुरु - दर्शनावीण । वेडा पिसा जाहला ॥२९॥
हरपोनि गेली सर्व बुद्धी । स्वामींची कैं लागेल शुद्धी ॥
ठायीं न पडतां निरवधी । प्राण त्यागीन आपुला ॥३०॥
कादुर लाहुर माहूर । शोध करी पृथ्वीवर ॥
मग आटोपिलें संकेश्वर । एके दिवशीं सायान्हीं ॥३१॥
तेथें गुरवागृहीं जाण । द्वारी तुळशीवृंदावन ॥
तया ओटयावरी जाऊन । वसतीकरितां राहिला ॥३२॥
उच्च स्वरें ओरडोनि देखा । सदगुरु शब्दें मारी हाका ॥
स्वामी दयाळा माझी हे कां । उपेक्षा केली गुरुमाये ॥३३॥
शब्द ऐकतां म्हतारी । गुरवीण येवोनि विचारी ॥
कोण तूं गा काय तुजवरी । संकट पडलें मज सांग ॥३४॥
येरू मग सर्व वृत्तांत । तये वृद्धेस सांगत ॥
तिणें पुशिलें श्रीगुरुनाथ । कोणते चिन्हीं आहे तुझा ॥३५॥
येरें कथिली ध्यान - खूण । नात्युच्च ना नीच असा जाण ॥
मस्तकीं जटा लंबायमान । गौरवर्ण साजिरा ॥३६॥
नासापुट अति सरळ । सुहास्य वदन नेत्र विशाळ ॥
स्फटिक रुद्राक्ष भूषणें केवळ । श्रीदत्तमूर्ती सारखा ॥३७॥
कोणी द्दष्टीं पाहतां ध्यान । आनंदरूप होय मन ॥
ऐसें ऐकतां गुरवीण । अनंतालागी सांगतसे ॥३८॥
आमुचा देव संकेश्वर । अरण्यांत येथोनि दूर ॥
तेथें निबिड तरुवर । वंश - गुल्म बहुदाट ॥३९॥
तूं सांगतोस ऐशा चिन्हीं । बोवा येक गुल्मस्थानीं ॥
प्रत्यहीं वसे निरंजनीं । नगरामाजीं न येतां ॥४०॥
लोटले तीन संवत्सर । प्रत्यहीं बैसे योगेश्वर ॥
तपध्यानीं निरंतर । बाहेर येतां न देखों ॥४१॥
तुझा असेल तरी जावोनी । उदईक पहा ओळखोनी ॥
येरू उठला तत्क्षणीं । उदयुक्त झाला जावया ॥४२॥
गुरवीण सांगे स्थळ कठिण । ऐशा रात्नीमाजीं जाण ॥
व्याघ्रवृकादि येऊन । प्राणघात करतील ॥४३॥
आग्रह करोनि अनंता । राहवी तेव्हां गुरव - माता ॥
नि:सीम गुरुभक्ती समजतां । अंतर तिचें कळवळलें ॥४४॥
दोहन करून गाईस । दुग्ध आणोन सायास ॥
पान करवी अनंतास । आवडी निकट बैसोनी ॥४५॥
सूर्योदयीं अनंत । गुरुव घेवोन सांगात ॥
वंश - बेटानिकट त्वरित । उत्कंठित मनें पोंचला ॥४६॥
स्वामी करोनिया स्नान । बैसले आसनीं धरूनिया ध्यान ॥
समाधि - सुखांत अचेतन । अनंतें मूर्त्ति देखिली ॥४७॥
ब्रम्हांडीं न माय हरिख । देखोन हरपलें सर्व दु:ख ॥
जैसें जहाज बुडतां एकाएक । तटीं लागलें येऊनि ॥४८॥
साष्टांग तेव्हां नमस्कार । घालूं आदरिले निरंतर ॥
ध्यान - विसर्जन - अवधि तोंवर । नमस्कार घालीतसे ॥४९॥
ध्यान विसर्जून गुरुमूर्ति । नेत्र - स्पर्शनें पातले स्मृति ॥
पाहिलें तों आनंदमूर्ति । नमस्कार घालीतसे ॥५०॥
सदगदित होऊनि गुरुराणा । प्रेमें आलिंगिला जाणा ॥
मूर्धा अवघ्राणी मना । आल्हाद झाला अपार ॥५१॥
स्वामी पृच्छा करिती आदरे । अनंता कधीं सोडिलें घर ॥
सदगुरूसि सांगितलें येरें । वर्त्लें मुळा पासुनी ॥५२॥
आपण दाखविली खूण । संकेत तीन बोटें करून ॥
त्यावरून दिवस तीन । गृहीं मार्ग लक्षिला ॥५३॥
लागतांचि चवथा दिवस । धैर्य न पोचे चित्तास ॥
अति उत्कंठित मानस । शोध करीत निघालों ॥५४॥
शोधिलें संपूर्ण कृष्णातीर । वन उपवन नगर शहर ॥
गोदातीरींचीं समग्र । पुरें पट्टणें शोधिलीं ॥५५॥
काल - रात्रीं पातलों येथें । भेटलों गुरुव - मातेतें ॥
तिनें कथिली यथार्थ । शुद्धि आपुली गुरुवर्या ॥५६॥
त्यांवरून चरणांपाशीं । आजि पोंचलों अनायासीं ॥
देखतां अंघ्रिद्वयासी । कृतार्थ झालों श्रीगुरो ॥५७॥
नेत्र - द्वय आणि अंत:करणा । आजि जाहली पारणा ॥
क्षुत्पिपासा - रहित चरणा । विनटलों अति आवडीं ॥५८॥
बाष्पधारा स्रवती नयनीं । अभिषिंचिले चरण दोन्ही ॥
गुरुमाय कळवळोनी । ह्रदयीं धरिलें प्रीतीनें ॥५९॥
श्रीगुरु होऊन सदय - ह्रदय । सच्छिष्यास बोलिले स्वयें ॥
आजि जाहलें वर्षत्रय । वसगडें ग्राम सोडोनी ॥६०॥
तुवां होवोनि हिंपुटी । आम्हांलागि शोधिली सृष्टी ॥
ब्रम्हानंदाची पाउटी । चढशील आतां मद्वाक्यें ॥६१॥
आनंद केला मज लागून ।  यालागीं आनंदमूर्ति अभिधान ॥
आजपासून ठेविलें जाण । सर्वांलागीं प्रसिद्ध ॥६२॥
मुखें तुझे निघतील शब्द । सत्य होतील अभेद ॥
सदवंश वाढेल निर्द्वंद्व । सर्वमान्य होसी पै ॥६३॥
तीन वर्षें संध्या स्नान ।  करोनि जोडिलें जें पुण्य ॥
तें तुझ्या सप्तवंशाकारण । योग - क्षेमार्थ अर्पिलें ॥६५॥
मग शिष्यासह रघुनाथ । पातले संकेश्वर ग्रामांत ॥
भेटोनि सर्व ग्रामस्थांतें । इच्छितार्थ बोलिले ॥६६॥
तीन वर्षें संध्यास्नान । आम्ही केलें अनुष्ठान ॥
त्याचे पूर्णते कारण । ब्रम्हाण भोजन करावें ॥६४॥
ऐसी इच्छा मानसीं । साहय होवोनी धर्म - कृत्यासी ॥
सामुग्री जया अनुकूळ जैसी । तैसी सिद्धी नेइजे ॥६७॥
अवश्य म्हणोनी सकळ । कोणी न होतां प्रतिकूळ ॥
सर्व साहित्य द्विज - मंडळ । करिते झाले सुश्रद्धें ॥६८॥
पुरण पोळिया नूतन घृत । शाल्योदन शर्करा - युक्त ॥
शाका - कथिकादि वरान्न सहित । पाकसिद्धी करविली ॥६९॥
सांग जाहलें संतर्पण । मग शिष्यासहित आपण ॥
संपादूनिया पारण । संतोष - युक्त बैसले ॥७०॥
खूण समजले आनंदमूर्ति । नैवेद्य पुरणाचा यावरी भक्ती ॥
श्रींची असे निश्चिती । जाणिलें तधीं पासुनी ॥७१॥
तीच चाल अद्यापिवरी । चालत आहे ब्रम्हानाळ - क्षेत्नीं ॥
वेदा संगम कृष्णातीरीं । रामनवम्यादि उत्साहीं ॥७२॥
असो दुसरे दिवशीं आनंदमूर्ति । सवें घेऊनि श्रीरघुपती ॥
पंथ क्रमोन सत्वर गती । वसगडें ग्रामीं पातले ॥७३॥
मार्गीं येतां चिकोडींत । ब्रम्हाण स्त्री सौभाग्य - युक्त ॥
वयातीत साठ पर्यंत । जन्मादारभ्य वंध्या ते ॥७४॥
तिनें येऊनि अकस्मात । नमस्कारिले श्रीगुरुनाथ ॥
श्रीनें आशिर्वादिलें तीतें । “पुत्रवती - भव” ऐसें पै ॥७५॥
येरी बोले जोडूनि पाणी । सुतवती भव ऐसी वाणी ॥
वदलेति दया करोनी । जन्मप्रभृती मी वंध्या ॥७६॥
तशांत रजही माझें गेलें । त्या संवत्सर दहा लोटले ॥
जन्मास संवत्सर साठ भरले । वार्धक्यें गात्रें व्यापिलीं ॥७७॥
आशीर्वाद वचन निरवधी । सिद्धी नेइजे दयानिधी ॥
तथेति म्हणोनी पुन्हा शब्दीं । वदते झाले श्रीगुरू ॥७८॥
आश्चर्य झालें सकळ जनां । पुढें एक वर्ष पर्यंत जाणा ॥
पुत्र प्रसवतां आनंद मना । जाहला ब्राम्हाणीस उत्कृष्ट ॥७९॥
सवें घेऊनि आपुला पती । वसगडेस आली पुत्रवंती ॥
परमोत्साहें कृपामूर्ती । श्रीरघुनाथ पूजिले ॥८०॥
त्यांचा वंश अद्यापपर्यंत । कुशळरूपें चिकोडींत ॥
आहे हे प्रख्यात । परंपरा जाणतसां ॥८१॥
वसगडें ग्रामीं उभयतां । येऊन पोंचतां तत्वतां ॥
आनंद वाटला समस्तां । परमोत्साह केला त्यांहीं ॥८२॥
तों इकडे वर्ष तीन । गृहीं सखूबाई बाळंतीण ॥
त्यांचें न पडों दिलें न्यून । ग्रामस्थ ब्राम्हाणीं त्या काळीं ॥८३॥
हें वृत्त समजूनि श्रीरघुवीर । ग्रामस्थांवरी संतुष्ट फार ॥
आशीर्वाद वारंवार । देते झाले आवडीं ॥८४॥
नित्यपाठ सगंमस्नान । संध्यादि जपानुष्ठान ॥
सारोनि भरतां माध्यान्ह । वसगडेस यावें पुन्हा ॥८५॥
आनंदमूर्ति शिष्योत्तम । गुरुभक्त श्रेष्ठ नि:सीम ॥
गुरुसेवा हा द्दढ नेम । अन्य कांहीं रुचेना ॥८६॥
कोणे एके दिवशीं जाण । सवें घेऊनि शिष्य - निधान ॥
जात असतां सहजीं वचन । बोलते झाले गुरुवर्य ॥८७॥
त्वचेनें व्याप्त भुजगोत्तम । त्वचा - विसर्जनास स्थळ उत्तम ॥
कृष्णा - वेदा हा संगम । पवित्रांमाजी पवित्न ॥८८॥
भाषण ऐकून शिष्यरायें । भाविला परम अंतराये ॥
मनीं धरिलें श्रीगुरुवर्यें । निजधामा जाणें हें ॥८९॥
आतां श्रीस्वामि - निर्याण । वत्सर - मास - पक्ष - प्रमाण ॥
लेखा पूर्वींच करोन । श्लोक रचोनि ठेविला ॥९०॥

[संमत श्लोक :--- निध्यष्ट - भूतविधुशाकसमाश्रिताब्दे । भाद्रे प्लवंगे सितयाम्यतिथ्याम् ॥
ग्रामे वसंते परिहाय भौतं । श्रीराघवो ब्रम्हापुरं समाविशत् ॥१॥]

शके पंधराशें एकुण्णवदाशीं ।  प्लवंग संवत्सर नभस्यमासीं ॥
शुक्लपक्ष द्वितीयेसी । अवतार समाप्त रविवारीं ॥९१॥
स्वामी इच्छा कृष्णातीरीं । देह त्यागावा निर्धारीं ॥
ती खूण पूर्वींची अंतरीं । आनंदमूर्तींसि आठवली ॥९२॥
मग तें श्रींचें कलेवर । नेवोनि आटोपिलें कृष्णातीर ॥
तेथें सार्थकविचार । करिते झाले प्रयत्नें ॥९३॥
ब्रम्हानाळींचे ग्रामस्थ । बोलिले स्पष्ट अनंतातें ॥
परसीमांतरींचें कुणप येथें । काय म्हणोनि जाळितां ॥९४॥
मग आनंदमूर्तींनीं देखा । अंतरीं विचार केला निका ॥
पंधरा होन देऊनि भूतिका । कृष्णा - पुलिनांत घेतली ॥९५॥
पूर्व पश्चिम चाळीस हात । तैसेंचि दक्षिण - उत्तर गणित ॥
विक्रीत भूमिकेच्या आंत । सार्थक मंत्रोक्त करविलें ॥९६॥
उत्तरकार्य यथायुक्ति । संपादिती आनंदमूर्ति ॥
तये स्थळीं रघुवीर चित्तीं । स्मरोनि पादुका स्थापिल्या ॥९७॥
वसगडे ग्रामीं राहून । प्रत्यहीं कृष्णेस य़ेऊन ॥
करोन स्नान जपध्यान । पादुका - पूजन यथासांग ॥९८॥
षोडशोपचार पादपूजन । नैवेद्य यथासांग करून ॥
वसगडे ग्रामीं येणें परतून । नित्य - नेम हा चालविला ॥९९॥
धन्य रघुनाथ - पादारविंद । आमोद सेवीत मूर्ति आनंद ॥
झुंकारित शब्दें मिलिंद । गोपाळ - तनय सर्वदा ॥१००॥
आनंदचरितामृत ग्रंथ । बापानंद - विरचित ।
स्नेहें परिसोत श्रोते संत । तृतीयोध्याय रसाळ हा ॥१०१॥


॥ श्रीरघुनाथार्पणमस्तु ॥

श्रीआनंद - चरितामृत

भगवान दादा
Chapters
श्रीआनंद - अध्याय पहिला श्रीआनंद - अध्याय दुसरा श्रीआनंद - अध्याय तिसरा श्रीआनंद - अध्याय चवथा श्रीआनंद - अध्याय पांचवा श्रीआनंद - अध्याय सहावा श्रीआनंद - अध्याय सातवा श्रीआनंद - अध्याय आठवा श्रीआनंद - अध्याय नववा श्रीआनंद - अध्याय दहावा श्रीआनंद - अध्याय अकरावा श्रीआनंद - अध्याय बारावा श्रीआनंद - अध्याय तेरावा श्रीआनंद - अध्याय चवदावा श्रीआनंद - अध्याय पंधरावा श्रीआनंद - अध्याय सोळावा श्रीआनंद - ओव्या श्रीआनंद - निर्याणाचे श्लोक श्रीआनंद - पद १ श्रीआनंद - पद २ श्रीआनंद - अभंग श्रीआनंद - भूपाळी १ श्रीआनंद - भूपाळी २ श्रीआनंद - भूपाळी ३ श्रीआनंद - भूपाळी ४ श्रीआनंद - भूपाळी ५ श्रीआनंद - भूपाळी ६ श्रीआनंद - स्फुट पदे श्रीआनंद - विशेष