अहिल्याबाई होळकरीण
सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई । गेली कीर्ति करूनिया भूमंडळाचे ठायी ॥ ध्रुवपद ॥
महाराज अहिल्याबाई पुण्य प्राणी । सम्पूर्ण स्त्रियांमधी श्रेष्ठ रत्नखाणी ।
दर्शने मोठ्या पापाची होईल हानी । झडतात रोग पापांचे पिता पाणी ।
वर्णिती कीर्ति गातात संत ते गाणी । झाली दैवदशे ती होळकरांची राणी ॥चाल॥
उद्धार कुळाचा केला । पण आपला सिद्धिस नेला । महेश्वरास जो कुणी गेला ॥चाल पहिली॥
राहिला तेथे तो घेउन बाप भाई । संसार चालवी दीन दुबळ्यांची आई ॥१॥
प्रत्यही द्यावी ब्राह्मणास दश दाने । ऐकावी पुराणे बहुत आनंदाने ।
लाविली हरी हर मंदिरी तावदाने । गर्जती देउळे कीर्तन नादाने ॥
शोभती होम कुंडे द्विजवृंदाने । टाकिती हजारो नमात अवदाने ॥चाल॥
कधी कोटि लिंगे करवावी । वधुवरे कधि मिरवावी । अर्भका दुधे पुरवावी ॥चा०प०॥
पर्वणी पाहुन दान देतसे गाई । जपमाळ अखंडित हाती वर्णू काई ॥२॥
जेथे ज्योतिलिंग जेथे तीर्थ महा क्षेत्रे । घातली तेथे नेहमीच अन्नछत्रे ।
आलि जरा झालि काही ज्याची विकल गात्रे । पुरवावी त्यास औषधे वस्त्रे पात्रे ।
कितिकांनी घेतली स्मार्त अग्निहोत्रे । दिली स्वास्थे करुन त्या भटास क्षणमात्रे ॥चाल॥
आधि इच्छा भोजन द्यावे । उपरांतिक तीर्थ घ्यावे । वाढून ताट वर मग न्यावे ॥चा०प०॥
जेविल्या सर्व मग आपण अन्न खाई । रघुवीर चरित्रे रात्रीस गोड गाई ॥३॥
आल्या यात्रेकर्याला वाटी पंचेजोडे । कोणास आंगरखे कोणास नवे जोडे ।
कोणास महेश्वरी उंच धोत्रजोडे ।
कोणास दुशाला कोणास बट घोडे । गवयास मिळाति कडी कंठ्या तोडे ।
घाली गिराशांचे पायात बिड्या खोडे ॥चाल॥
बांधिले घाट मठ पार । कुठे शिवास संतत धार । कुठे वनात पाणी गार ॥चाल पहिली॥
त्यासाठी मुशाफर काय धावत जाई । विश्रांत पावती पाहुन अमराई ॥४॥
किती सूर्य ग्रहण संधीत तुळा केल्या । कधी कनक रौप्य कधी गुळाच्या भेल्या ।
संभाळ करून काशीस यात्रा नेल्या । कावडी शतावधी रामेश्वरी गेल्या ।
संसारी असुन वासना जिच्या मेल्या । तिजपुढे सहज मग मुक्ति उभ्या ठेल्या ॥चाल॥
कवी गंगु हैबती म्हणती ॥ पुण्याची कोण करी गणती ॥ राज्यास होती पडपण ती ॥चा०प०॥
महादेव गुणीचे लक्ष तिचे पाई । कवनात प्रभाकर करितसे चतुराई ॥५॥