खर्ड्याचे लढाईचा पोवाडा
दैन्य दिवस आज सरले । सवाई माधवराव प्रतापि कलियुगात अवतरले ॥ध्रुपद॥
भूभार सर्व हराया । युगायुगी अवतार धरी हरी दानव संहाराया ॥
कलियुगी धर्म ताराया ॥ ब्राह्मणवंशी जन्म घेतला रिपुनिर्मूळ कराया ॥
सुकिर्ती मागे उराया ॥ सौख्य दिले सर्वास अहारे सवाई माधवराया ॥चाल॥
धन्य धन्य नानाचे शहाणपण । बृहस्पति ते बनले आपण ।
गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हाच केला दुर्धट हा पण ।
आरंभिले मग रक्षण शिंपण । सरदारांचे घालून कुंपण ।
आपल्या अंगी ठेवून निरूपण । हरिपंताना करुनि रवाना ॥
(चाल) दादासाहेब मागे वळविले । लगट करुनि फौजांनी मिळविले ।
अपुल्या राज्यापार पळविले । काही दिवस दुःखात आळविले ।
इतर कारणी भले लोळविले । लोहोलंगर पायात खिळविले ।
ठेवून गडावर चणे दळविले । बंदीवान तेथेच खपविले ॥चाल॥
बंड तोतया सहज मोडिला । एक एक त्याचा मंत्री फोडिला ।
जमाव ठायींच ठायी तोडिला । अडचण जागी मुख्य कोंडिला ।
शहराबाहेर नेऊन झोडिला । जो नानांनी पैसा जोडिला । तोच प्रसंगी हुजुर ओढिला ।
लागेल तितके द्र्व्य पुरविले ॥चाल॥ तळेगावावर इंग्रज हरला ।
इष्टुर साहेब रणीच वीरला । उरला इंग्रज घाट उतरला ।
सरमजाम गलबतात भरला । रातोरात मुंबईत शिरला ।
सवेच गाढर पुढेच सरला । शिकस्त खाउन तोही फिरला ।
फिरुन पुण्याकडे कधी पाहीना ॥चाल॥ अशी रिपूची मस्ती जिरविली ।
शुद्ध बुद्ध पहा त्याची हरली । कारभार्यांनी पाठ पुरविली ।
पुण्यामध्ये अमदानी करविली । पुरंदराहुन स्वारी फिरविली ।
पर्वतीस मग मुंज ठरविली । गजराची भिक्षावळ मिरविली ।
कालूकर्णे वाजंत्री वाजती ॥चाल॥ लग्नचिठ्या देशावर लिहिल्या ।
ब्राह्मणांस पालख्याश्व वहिल्या । पाठविल्या बोलाऊ पहिल्या ।
पठाण मोंगलसहित सहिल्या । छत्रपति रोहिले रोहिल्या ।
भोसल्यांच्या मौजा पाहिल्या । आणिक किती नावनिशा राहिल्या ।
कवीश्वराची नजर पुरेना ॥चाल॥ आरशाचे मंडप सजविले ।
चित्रे काढून चौक उजविले । थयथयांत जन सर्व रिझविले ।
गुलाब आणि अत्तरे भिजविले । शिष्ठ शिष्ट शेवटी पुजविले ।
रुपये होन मोहोरांनी बुजविले । श्रीमंत कार्यार्थ देह झिजविले ।
यशस्वी झाली सकल मंडळी ॥चाल॥
सत्राशे सातात बदामी । हल्लयाखाली केली रिकामी ।
एक एक मोहोरे नामी नामी । फार उडाले रणसंग्रामी ।
बाजीपंत अण्णा ते कामी हरीपंत तात्याचे लगामी ।
परशुरामपंत त्या मुक्कामी । स्वामी सेवक बहुत जपले ॥चाल॥
गलीमास काही नव्हते भेऊन । पराक्रमाने किल्ला घेऊन ।
अलिबक्षावर निशाण ठेवून । पुण्यास नानासहित येऊन ।
श्रीमंतांनी वाड्यामध्ये नेऊन । पंचामृती आनंदे जेऊन ।
बहुमानाची वस्त्रे देऊन । बोळविले तयाला ॥चाल॥
सत्राशे तेरावे वरीस । अवघड गेले पहिल्या परीस ।
करनाटकच्या पहा स्वारीस । टोपीकर मोंगल पडले भरीस ।
तरी तो टिपू येइना हारीस । त्यावर तात्या गेले परीस ।
आणुन टिपू खूब जेरीस । साधुनी मतलब हरिपंतांनी ॥चाल पहिली ॥
नंतर मागे फिरले । दरकुच येऊन पुण्यास प्रभुचे चरण मस्तकी धरिले ॥
दैन्य दिवस आज सरले ॥१॥
केवढे भाग्य रायाचे । चहुंकडे सेवक यशस्वी होती हे पुण्य त्या पायांचे ॥
करिता स्मरण जयाचे । काही तरी व्हावा लाभ असे बलवत्तर नाम जयाचे ॥
प्रधानपद मूळ याचे । सत्रशे चवदात मिळाले वजीरपद बाच्छायाचे ॥चाल॥
मुगुटमणी ते पाट्लबावा । कोठवर त्यांचा प्रताप गावा ।
दर्शनमात्रे तापच जावा । नवस नवसिता फळास यावा ।
हर हमेशा शत्रुसि दावा । माहित सगळा मराठी कावा ।
हुशार फौजा लढाई लावा । जिंकुन हिंदुस्थान परतले ॥चाल॥
चवदा वर्षे बहुत भागले । म्हणून शिरस्ते पाहून मागले ।
तरतुदीस कारभारी लागले । उंच उंच पोषाग चांगले ।
देउन फार मर्जीने वागले । भेटीसमयी जंबूर डागले ।
मग तोफांचे बार शिलगले । सूर्यबिंब अगदींच झाकले ॥चाल॥
राव जेव्हा नालकीत बसले । कृष्ण तेव्हा ते जनास दिसले ।
अर्जुन पाटिलबावा भासले । पायपोस पदराने पुसले ।
चरणी मिथी माराया घुसले । कर प्रभुनी बगलेत खुपसले ।
इमानी चाकर नाहीत असले । धन्य धनी आणि धन्य दास ते ॥चाल॥
दोन्ही दळे या सुखात दंग । त्यावर जाला अमोल रंग ।
गुलाल आणि अनिवार पतंग । पळस फुलाचा नाही प्रसंग ।
मस्त चालतीपुढे मातंग । कोतवाल घोडे करिती ढंग ।
राज्य प्रभुचे असो अभंग । अहर्निशि कल्याण चिंतिती ॥चाल॥
गुलाम सोदे बुडवुनि पाजी । पंत प्रधान राखुन राजी ।
लष्कर दुनया करून ताजी । शके सत्राशे पंधरामाजी ।
माघ मासी भली मारून बाजी । पाटिलबावा सुरमर्द गाजी ।
अगोदर गेले विष्णुपदाजी । शरीर वानवडीस ठेवुनी ॥चाल॥
सवाचार महिन्यांचे अन्तर । हरीपंत तात्या गेले नंतर ।
तेथे न चाले तंतर मंतर । वर्तमान हे एक अधिकोत्तर ।
काही न करिती नाना उत्तर । दिलगीर मर्जी सुकले अंतर ।
हिरे हरपले राहिले फत्तर । तरि तो पुरुष बहुत धिराचा ॥चाल॥
दौलतीचे आज खांबच खचले । लाल्होते ते कोठेच पचले ।
शिपायांचे काय चुडेच पिचले । परंतु नाना नाही कचले ।
कडोविकडीचे विकार सुचले । कलमज्यारीचे घटाव मचले ।
मोंगलावर मोर्चे रचले । जिकडे तिकडे झाली तयारी (चाल) पुकार पडला पृथ्वीवरती ।
सैन्य समुद्रा आली भरती । आगाऊ खर्ची मोहरा सुर्ती ।
रात्रंदिवस श्रम नाना करती । कशी ही मोहिम होईल पुरती ।
राव निघाले सुदिनमुहूर्ती । लिंबलोण उतरितात गरती । इडापिडा काढून टाकिती ॥चाल॥
गारपिराच्या मग रोखांना । तमाम रिघला फरासखाना ।
उजव्या बाजुस जामदारखाना । डावेकडे तो जवेरखाना ।
देवढीबराबर सराफखाना । चकचकीत खुब सिलेखाना ।
मध्ये रायाचा तालिमखाना खळ ॥ खळ खळ लेजिमा वाजती ॥चाल॥
वाड्याबाहेर जिन्नसखाना । पदार्थ भरपुर मोदीखाना ।
मागे उतरला उष्टरखाना । डेर्यासन्निध नगारखाना ।
तर्हतर्हेचा शिकारखाना । बाजाराच्या पुढे पिलखाना ।
दिला बिनीवर तोफखाना । मोठमोठ्या पल्ल्याच्या जरबा ॥चाल पहिली॥
चोहोंकडे लोक पसरले । नित्य नवे गणतीस लागती एकांडे देशावरले ।
दैन्य दिवस आज सरले० ॥२॥ बहुत शिंदे जमले ।
शिलेपोस पलटणे लाविती पठाण जरीचे समले ॥ रणपंडित ते गमले ।
भले भले पंजाबी ज्वान दक्षिणेत येउन रमले ।
ज्यापुढे शत्रु दमले । त्यांणी शतावधि कोस स्वामिकार्यास्तव लवकर क्रमिले ॥चाल॥
आधीच दौलतराव निघाले । काय दैवाचे शिकंदर ताले ।
फौज सभोवती जमून चाले । खांद्यावरती घेऊन भाले ।
सर्व लढावया तयार झाले । जिवबादादा गर्जत आले ।
हासनभाई उज्जनीवाले । महाराजांचे केवळ कलिजे ॥चाल॥
बाळोबास तर काळिज नाही । धीट रणामध्ये उभाच राही ।
धोंडिबास जगदंबा साही । जय करण्याची चिंता वाही ।
सदाशीव मल्हार काही । मागे पुढे तिळमात्र न पाही ।
देवजी गवळी रिपूस बाही । रणांगणाचा समय साघिती ॥चाल॥
निसंग नारायणराव बक्षी । हटकुन मारी उडता पक्षी ।
बंदुकीला कटपट्यास नक्षी । फत्ते होई तो गौंड न भक्षी ।
रायाजी पाटिल महत्त्व रक्षी । नित्य कल्ल्याण धन्याचे लक्षी ।
पिढीजाद शिंद्याचे पक्षी । केवळ अंतरंग जिवाचे ॥चाल॥
मेरूसाहेब कठिण फिरंगी । कलाकुशलता ज्याचे अंगी ।
सामायन किळकाटा जंगी । मुकीरसाहेब भले बहुरंगी ।
हपिसर पदरी चंगी भंगी । जीनसाहेबाची समशेर नंगी ।
दुर्जन साहेब झटे प्रसंगी । झर झर झर झर बुरुज बांधुनी ॥चाल॥
शाहामतखा सरदार किराणी । बाच्छायजदे थेट इराणी ।
किती काबूल खंदार दुराणी । मुजफरखाची टोळी खोराणी ।
कडकडीत सिंगरूपची राणी । तारीफ करती गोष्ट पुराणी ।
इतरांची ठेविना शिराणी । पंचविशीमधे ज्वान पलटणी ॥ ( चाल ) ॥
येथून सरली शिंदेशाई । होळकराची आली अवाई ।
तुकोजी बावांना गुरमाई । आधीच बळ स्वार शिपाई ।
वारगळ बरोबर फणशे जावाई । लांब हात बुळे वाघ सवाई ।
वाघमारे कुळ धगनगभाई । खेरीज ब्राह्मण नागो जिवाजी ॥चाल॥
शिवाय होळकर खासे खासे । काशीबाजी तर हुंगुन फासे ।
लढाईचे आणून नकाशे । स्वस्थपणे करतात तमाशे ।
बापुसाहेबांना येती उमासे । मल्हारजींनी देउन दिलासे ।
जा जा म्हणती लोक बगासे । जहामर्द तरवारकरांचे ॥चाल॥
हरजी विठूजी आनंदराव । स्वता धनी यशवंतराव ।
संताजीचे प्रसिद्ध नाव । आबाजीचा तिखट स्वभाव ।
दूर नेला साधितात डाव । विचारी मतकर माधवराव ।
भागवतांनी सोडुन गाव । ताबडतोब निघाले ॥चाल॥
महाशूर पटवर्धन सारे । ठाइं ठाइं त्यांचे फार पसारे ।
चिंतामणराव शूर कसारे । केवळ एकांगी वीर जसारे ।
परशुराम रामचंद्र असारे । चहुकडे ज्याचा पूर्ण ठसारे ।
अप्पासाहेब तोही तसारे । थरथर ज्याला शूर कापती ॥चाल॥
रास्ते आनंदराव दादा । पानशांची बहु मर्यादा ।
विंचुरकरांमधि गांडु एखादा । राजाबहाद्दर पुरुष जवादा ।
चौपट खर्च दुप्पट आदा । पुरंधर्यांची कदीम इरादा ।
तत्पर पेठे मोगल वादा । ओढेकरही येऊन भेटले ॥ ( चाल पहिली ) ॥
वामोरकर सावरले । आंबेकर आणि बारामतीकर प्रसंगास अनुसरले । दैन्य दिवस आज सरले ॥३॥
खास पतक नानाचे । निवडक माणुस त्यात पुरातन सूचक संधानाचे ॥
पद देऊनि मानाचे । खुष करुनि बाबास काम मग सांगुन सुलतानाचे ॥
बळ विशेष यवनांचे । हे ऐकुनी लोकांनी सोडिले पाणी शीरसदनाचे ॥चाल॥
आपा बळवंतराव सुबुद्ध । बिनिवाले पुरुषार्थी प्रबुद्ध । पवारात मर्दाने शुद्ध ।
वाढविती भापकर विरुद्ध । केवढ्यांना शुष्कवत युद्ध ।
काढिती हांडे रणी अशुद्ध । धायगुडे निर्बाणी कुबुद्ध ।
शेखमिरा फौजेत मिसळले ॥चाल॥
पराक्रमी हिमतीचे दरेकर । तसेच जाधव बुरुजवाडीकर ।
अमीरसिंग जाधव माळेगावकर । सुजाण गोपाळराव तळेगावकर ।
जानराव नाईक नट निंबाळकर । शेकर सोयरे बाळो वडाळकर ।
करारी डफळे अनंतपुरकर । आढोळ्याचे लोक इमानी ॥चाल॥
कामरगावकर मग बोलवले । प्रतिनिधीला किती गौरविले ।
हर्ष वाहिले पुढे सरसावले । रण नवरे दरकुच धावले ।
समाधान राऊत पावले । बन्या बापु जसे नवरे मिरविले ।
शहर पुणे रक्षणार्थ ठेविले । माधवराव रामचंद्र कानडे ॥चाल॥
सरमजामी सरदार संपले । शिलेदार मागे नाही लपले ।
धाराशिवकर लेले खपले । जमेत सुद्धा ते आपापले ।
गोट गणतिला तमाम जपले । सानपदोर्गे निगडे टपले ।
खुळे वाघ आणि बाबर सुपले । भगत बडे डोबाले दिपले ।
जाधव काळे माळशिकारे ॥चाल॥ बाजीराव गोविंद बर्वे ।
लाड शिरोळे धायबर सुर्वे । दाभाड्याचा हात न धरवे ।
भगवंतसिंग बैसे बेपर्वे । वझरकराचा लौकिक मिरवे ।
खंडाळ्याचे पोषाग हिरवे । नलगे भोयते सुंदर सर्व ।
सखाराम हरी बाबुराव ते ॥चाल॥
कडकडीत हुजुरात हुजुरची । वीस सहस्त्र जूट पदरची ।
राउत घोडा बंदुक बरची । केवळ आगच उतरे वरची ।
एक एक पागा अमोल घरची । दाद न देती देशांतरची ।
काय कथा त्या भागा नगरची । रणांगणी काळास जिंकिती ॥चाल॥
दिघे फडतरे बाबरकाठे । तळापीर मानसिंग खलोट ।
मारिती पुढे समोर सपाटे । निलाम कवडे झाले खपाटे ।
देवकात्याचे फार हाकाटे । मुळे गांवढे करिती गल्हाटे ।
जगतापाचे महतर भोयटे । भले मर्तृजा महात थड्याचे ॥चाल॥
गणेश गंगाधर थोरात । निळकंठ रामचंद्र भरात ।
आयतुळे मान्य सकळ शूरात । बेहरे मांजरे योग्य बीरात ।
राघो बापुजी रणघोरात । येसोजी हरी सैन्य पुरात ।
दारकोजीबावा निंबाळकरांत । वीरश्रीत तो धुंद सग्याबा ॥चाल॥
कृष्णसिंग हैबतसिंग तारे । तसेच लक्ष्मणसिंग बारे ।
दावलबावा महात सारे । मिळाले भापकर ते परभारे ।
मैराळजी पायघुडे विचारे । इंदापुरकर नव्हत बिचारे ।
गणेश विठ्ठल वाघमारे । बिडकर खुर्देकर आटीचे ॥चाल॥
गिरजोजी बर्गे फार दमाचे । बहादर बारगिर ते कदमाचे ।
आठवले तर बहु कामाचे । दुर्जनसिंग राठोड श्रमाचे ।
टिळे कपाळी रामनामाचे । बिनीबरोबर ते नेमाचे ।
श्रीमंतस्मरणे काळ क्रमाचे । जसे दूत सांबाचे प्रतापी ॥चाल पहिली॥
प्रपंच वैद्य विसरले । चिलखत बखतर शिलेटोप मल्हारराव पांघरले ॥ दैन्य दिवस आज ते सरले० ॥४॥
लष्कर सगळे गुर्के । जरी पटक्याभोताले घालिती गरर मानकरी गर्के ।
सुंदर गोरे भुर्के । घोरपडे पाटणकर महाडिक खानविलकर शिर्के ।
मुंगी मध्ये ना फिर्के । चव्हाण मोहिते गुजर घाडगे निंबाळकर दे चर्के ॥चाल॥
पुढे पसरले रिसालदार । मुसा मुत्रीम नामदार । सय्यद अहमद जमादार ।
अमीर आबास नव्हे नादार । शहामिरखा ते डौलदार ।
इतक्या वर ते हुकूमदार । राघोपंत ते दौलतदार । तसे काशिबा बल्लाळ रानडे ॥चाल॥
गोरा मुसावास अमोल । मुसानारद तो समतोल ।
विनायकपंताचा गलोल । आबा काळे गुणीच डोल ।
टोपकराचे बोलती बोल । पायदळांचा बांधुनि गोल ।
तंबुर ताशे वाजती ढोल । उठावल्या बैरखा निशाणे ॥चाल॥
संस्थानी याविरहित राजे । सेनासाहेब किताब साजे ।
राघोजीबावा नाव विराजे । बाणांचा भडीमार माजे ।
सरखेलांचा लौकिक गाजे । समशेर बहादर गरीब नवाजे ।
अकलकोटी लोक ताजे । दुर्जनसिंग रजपूत हडोदी ॥चाल॥
दक्षण उत्तर पश्चिम भागी । पसरुन तोफा जागोजागी ।
तमाम गारदी त्याचे मार्गी । स्वार सैन्य त्यामागे झगागी ।
जरी पटका तो दुरुन धगागी । कोणीच नव्हता त्यात अभागी ।
स्वस्ति बक्षिस पावे बिदागी । जासूद सांडणी स्वार धावती ॥चाल॥
काय पलटणच्या फैरा झडती । पर्जन्यापरि गोळ्या झडती ।
शिरकमळे कंदुकवत उडती । छिन्न भिन्न किती होऊन रडती ।
कितीक पाण्याविण तडफडती । कितीक प्रेतामधीच दडती ।
वीर विरांशी निसंग भिडती । सतीसारखे विडे उचलिती ॥चाल॥
पाउल पाउल पुढे सरकती । घाव चुकाउनी शुर थडकती ।
सपुत वाघापरी गुरकती । हत्यार लाउन मागे मुरकती ।
खुणेने शत्रुवर्म तरकती । मोंगल बच्चे मागे सरकती ।
जिवबादादा मनी चरकती । अररररर शाबास बापांनो ॥चाल॥
सुटती तोफा धुंद दणाणत । गुंगत गोळे येती छणाछण ।
सों सों करिती बाण सणासण । खालेले घोडे उडती टणाटण ।
टापा हाणती दुरुन ठणाठण । वाजति पट्टे खांडे खणाखण ।
नौबती झांझा झडती झणाझण । एकच गर्दी झाली धुराची ॥चाल॥
थोर मांडली रणधुमाळ । अगदीच बसली मग काठाळी ।
फौज पसरली रानोमाळी । लाखो लाख तरवारी झळाळी ।
होळकराची फिरती पाळी ॥ जिवबांची मदुमकी निराळी ।
मोंगलाची केली टवाळी । सबळ पुण्य श्रीमंत प्रभूंचे ॥चाल॥
अठरा घटका लाही फुटली । तोफ हजारो हजार सुटली ।
मिरजकरांची मंडळी झटली । भाउबरोबर निःसंग तुटली ।
मोंगल सेना मागे हटली । त्या समयी कैकांची उपटली ।
पेंढार्यांनी दौलत लुटली । गबर झाले एका दिसात ॥चाल॥
शके सत्राशे सोळा भरता । आनंद संवत्सरही सरता ।
दहा दिवस शिमग्याचे उरता । वद्य पंचमी सुवेळ ठरता ।
ती प्रहरांचा अंमल फिरता । मोंगलाशी प्रसंग करिता ।
पळाले मोंगल धीर न धरता । चंद्रउदयी खर्ड्यात कोंडिले ॥चाल पहिली॥
गढीत खासे शिरले ।
मराठे मोंगल पठाण पुर्भे इतर घरोभर भरले ॥ दैन्य दिवस हे आज सरले ॥५॥
बहुत खराबी जहाली ।
मोहोर्यावरची फौज सैनिका सहित नाहली ॥
त्यात उन्हाची काहाली ।
रुपयाचे दिड शेर पाणी अशा कठीण वेळा वाहाली ॥
ती सर्व जनांनी पाहिली ।
जिवबादादा परशुरामपंतांची दिसंदिस बहाली ॥चाल॥
निजाम अल्लीखान नव्हे सामान्य । बाच्छाई सुलतानात मान्य ।
जुनाट पुरुषात राजमान्य । अपार पदरीमण धनधान्य ।
कोण बरोबरी करील अन्य । दैव धन्याचे मुळी प्राधान्य ।
तशात झाले अनुकुळ दैन्य । नाही तर घेते खबर पुण्याची ॥चाल॥
जेव्हा मारिती यवन मुसंडी । तेव्हाच होईती फौज दुखंडी ।
साठ सहस्त्र पठाण बुडी । तिनशे तोफा खंडी ।
असे असुनिया दबली लंडी । धरून मश्रुल्मुलूख आणिला ॥चाल॥
झाला जन्म त्या कुळात माझ्या बाई राजेंद्राचा ।
केवळ माघव मूर्ति म्हसोबा नव्हेच शेंदराची ॥
अणीक मंत्री मर्द मराठा बंद्रोबंद्रांचा ।
ऐरावत बांधून आणतिल प्रसंगी इंद्राचा ॥
येथे न चाले यत्न ब्रहस्पती भार्गव चंद्राचा ।
उपाय असता तरी न मरता बापू रामचंद्राचा ॥
चा० हरहर जगन्निवासा, अता काय करू ॥
पोटी जरी एक झाले असते राजबीज लेकरू ॥
राज्य न बुडते मी मात्र मरत्ये शोक सदा कर शकू ॥
चा० पुढे काळ सख्यांनो कसा मी घालवू ॥
हिरकणी कुटुन जाऊ पाण्यामधे कालवू ॥
ती पिउन पौढत्ये नका ग मज हालवू ॥
चा० जा समया मालवून आपल्या घरास न्हायाला ।
जिवंत मी असल्यास उद्या मी नेत्र पुसायाला ॥ कमि नव्हते० ॥१५॥
धन्य वंश एकेक पुरुष कल्पवृक्ष पिकले ।
शत वर्षे द्विज पक्षी आनंदे त्या तरुवर टिकले ।
जलचर हैदर नबाब सन्मुख रण करिता थकले ।
ज्यांनी पुण्याकडे विलोकिले ते संपतिला मुकले ।
असे प्रभु कसे अमर कराया ब्रह्मदेव चुकले ।
गहन गती कर्माची सर्वजण पूर्वी फळ विकले ॥चाल॥
संपविला अवतार धन्यांनी म्हणे गंगुहैबती ।
ध्वज पडले उलथुनी थडकल्या सुरु साहेब नौबती ।
कोण करिल प्रतिपाळ तुर्त मुलुखास लागली बती ॥चाल॥
महादेव गुणीराज श्रुती गादिचे ।
नवे नुतन नव्हती शाईर जदिप वादिचे ।
पीळ पेच अर्थ अक्षरात वस्तादिए ॥चालपहिले॥
प्रभाकराचे कवन प्रतिष्ठित सभेत गायाला ।
अशा कवीची बुज नाही कोणि करायाला ॥
कमि नव्हते० ॥१६॥