दुसरे बाजीराव पेशवे यांजवर पोवाडा १
यशस्वी झाले श्रीमंत पहिले सवेलढायाला ।
आताच आले अपेश कोठुन बाजीरायाला ॥ध्रु०॥
दादासाहेब पुण्यप्रतापी निस्सीम शिवभक्त ।
स्वारी करुन दरसाल हालविले दिल्लीचे तक्त ।
आनंदीबाई सुशील शिरोमणी सगुणसंयुक्त ।
पतिभजनी सादर घडोघडी अखंड आसक्त ।
बाजिरावसाहेब सदोदित जो जीवनमुक्त ।
जन्मांतरी तप केले निराहारी राहुन एकभुक्त ॥चा०॥
शके सोळाशे शहाण्णवी अति उत्तम जयसंवत्सरी ।
पौषशुद्ध दशमिस भरणी नक्षत्र भौमवासरी ।
ठीक पहिल्या प्रहरात जन्मले रात्रीच्या अवसरी ॥चा०॥
पहा बाईसाहेब धारमुक्कामी राहुनी ।
कंठिला काळ काही दिवस दुःख साहुनी ।
केले तेथुन कुच सुपुत्रमुख पाहुनी ॥चा०॥
गंगातिरी येऊन राहिली अपूर्व ठायाला ।
कचेश्वर शुक्लेश्वर सन्निध दर्शन द्यायला ॥१॥
समाधान सर्वास वाटले कोपरगावास ।
स्वारी शिकारीस बरोबर जाती कथा उत्सवास ।
जे करणे ते पुसून करिती अमृतरावास ।
एकास नख लागल्या दुःख होई त्रिवर्ग भावास ।
असे असुन नानांनी मांडिला अति सासुरवास ।
हळुच नेऊन जुन्नरास ठेविले श्रीमंतरावास ॥चाल०॥
इतक्या संधीत सवाई माधवराव मरण पावले ।
तेव्हापासून नानांनी राक्षसी कपट डौल दाविले ।
परशुराम रामचंद्र निरोपुन मग वाटेस लाविले ॥चा०॥
आले खडकी पुलावर श्रीमंतास घेउनी ।
दर्शनास नाना परिवारे येउनी ।
दाखविली याद रावास एकांती नेऊनी ॥चाल पहिली॥
भय मानून शिंद्यांचे निघाले बाईस जायाला ।
सातार्यात राहून लागले भेद करायाला ॥२॥
आपण बाळोबा होउन एक केली खचीत मसलत ।
चिमाप्पास धनी करून राखिलि जुनाट दौलत ।
करारात दोघांच्या झाली काही किंचित गफलत ।
म्हणुनी फिरून नानांनी उलटी मारुनी केली गल्लत ।
सूत्रधारी जो पुरुष ज्याच्या गुणास जग भुलत ।
हातात सगळे दोर पतंगापरी फोजा हालत ॥चाल॥
परशुराम रामचंद्र आणि बाळोबास ठाउक रण ।
राज्यकारणी नव्हेत एक केसरी एक वारण ।
कठीण गाठ नानांशी न चाले तेथे जारण मारण ॥चाल॥
महाडास बसुनी नानांनी बेत ठरविले ।
बाळोबास शिंद्यांकडून कैद करविले ।
शिवनेरी गडावर पटवर्धन धरविले ॥चाल पहिली॥
रास्ते झाले जामीन प्रसंगी अवघड समयाला ॥
असा गुजरला वक्त नेले मांडवगण पाहायाला ॥३॥
घडी बसवून महाडाहुन नाना त्वरितच उलटले ।
द्वेषबुद्धि विसरून संशय सर्वांचे फिटले ॥
शिंदे भोसले होळकर मुश्रुलमुल्क एकवटले ।
दलबादल डेर्यात श्रीमंतासंन्निध संगटले ।
बाजीराव राज्यावर बसता आनंदे जन नटले ।
तोफांचे भडिमार हजारो बार तेव्हा सुटले ॥चाल॥
नंतर नाना एकविसांमधी समाधीस्त झाले ।
महाल मुलुख शिंद्यांनी बावीसामधि आपले पाहिले ।
यशवंतराव होळकर लढाईस जमुन उभे राहिले ॥चाल॥
शिंद्यांनी करून माळव्यात खातरजमा ।
केली फौज गंगेच्या रोखावर खुप जमा ।
सोडीना कंबर कधी काढिना पायजमा ॥चाल पहिली॥
कुच मुकाम दररोज बनेना पलंगी निजायाला ॥
घेई जोठाची पचंग समरी कोण जिंकील याला ॥४॥
दिला मार पळणास जातिने पुण्यास येऊनिया ।
शहर सभोते वेढुन बसले चौक्या ठेवुनिया ।
खंडेराव रास्त्यांनी प्रभुला वसईस नेउनिया ।
सुखात होते स्वस्थ सतत पंचामृत जेउनिया ।
इंग्रजास कुमकेस प्रसंगी बरोबर घेउनिया ।
सरंजाम अलिबहादरपैकी तयास देउनिया ॥चाल॥
अगोदर सोजर तरुक धावले मप्याशी दक्षिणी ।
त्या भयाने होळकर परतले नाही कोणी संरक्षणी ।
भरघोसाने श्रीमंत त्यावर पुण्यास येता क्षणी ॥चाल॥
झाला बंदोबस्त सर्वही पहिल्यासारखा ।
परि घरात शिरला शत्रु सबळ पारखा ।
लाल शरीर टोपी अंगी आठ प्रहर अंगरखा ॥चाल पहिली॥
धर्म कर्म ना जातपात स्थल नाही बसायाला ।
असे असुन सम्पूर्ण व्यापला प्राण हरायाला ॥५॥
फार दिवस आधि जपत होते या इंग्रज राज्याला ।
अनायासे झाले निमित्त पंढरपुरास कज्जाला ।
संकट पडले काहि सुचेना प्रधानपूज्याला ।
रती फिरली सारांश मिळाले लोक अपूज्याला ।
भय चिंता रोगांनी ग्रासिले काळीज मज्जाला ।
पदर पसरिती उणाख आणखी नीच निर्लज्जाला ॥चाल॥
परम कठिण वाटले आठवले त्रिभुवन राव बाजीला ।
थोर थोर मध्यस्थ घातले साहेबांचे समजीला ।
निरुपाय जाणुनी हवाली केले मग त्रिंबकजीला ॥चाल॥
ठेविला बंदोबस्तीने नेउन साष्टीस ।
एक वर्ष लोटल्यानंतर या गोष्टीस ॥
केले गच्छ भाद्रपद वद्यांतिल षष्ठीस ॥चाल पहिली॥
स्वदेशी जागा बिकट पाहिली निसुर बसायाला ।
शोध लावून साहेबांणी तेथे पाठविले धरायाला ॥६॥
इंग्रजाचा अन्यायी निघाला पाठ पेशव्याची ।
म्हणून साहेब लोकांनी आरंभिली अगळिक दाव्याची ।
वसई प्रांत कल्याण गेली गुजराथ पुराव्याची ।
रायगड सिंहगड बेलाग जागा केवळ विसाव्याची ।
कर्नाटक दिले लिहून ठाणी बैसली पराव्यांची ।
कोणास न कळे पुढील इमारत इंग्रजी काव्याची ॥चाल॥
अश्विनमासी वद्य एकादशी दोन प्रहर लोटता ।
श्रीमंत बापुसाहेब एकांती पर्वतीस भेटता ।
हुकूम होताक्षणी रणांगणी मग फौजा लोटता ॥चाल॥
बैसले राव दुर्बिणीत युद्ध लक्षित ।
भले भले उभे सरदारसैन्य रक्षित ।
लागुन गोळी ठार झाले मोर दिक्षित ॥चाल प०॥
तसाच पांडोबांनी उशीर नाही केला उठायाला ।
उडी सरशी तरवार करुन गेले विलयाला ॥७॥
आला त्रास वाटते फार ह्यावरून लक्षुमीस ।
विन्मुख होऊन श्रीमंत आणिले चहुकडून खामीस ।
फसले शके सत्राशे एकुण चाळीसच्या रणभूमीस ।
ईश्वर संवत्सरात कार्तिक शुक्ल अष्टमीस ।
प्रहर दिसा रविवारी सर्व आले आरब गुरमीस ।
खुप मोर्चा बांधून विनविती श्रीमंत स्वामीस ॥चाल॥
दारूगोळी पुरवावी आम्ही आज हटकुन त्यांशी लढू ।
गर्दीस मिळवून देऊन पलटणे क्षणात डोंगर चढू ।
शिपाइगिरीची शर्थ करून समशेरी सोन्याने मढू ॥चाल॥
लाविले बापुसाहेबांनी तोंड जाउनी ।
दीड प्रहर रात्र होते श्रीमंत दम खाउनी ।
गेली स्वारी महाला हिलाला मग लावुनी ॥चाल पहिली॥
जलदी करुनी साहेबांनी लाविले निशाण पुणियाला ।
खेचुन वाड्याबाहेर काढले कदीम शिपायाला ॥८॥
सकळ शहरचे लोक हजारो हजार हळहळती ।
सौख्य स्मरून राज्याचे मीनापरी अखंड तळमळती ।
रात्रंदिवस श्रीमंत न घेता उसंत पुढे पळती ।
यमस्वरूप पलटणे मागे एकदाच खळबळती ।
धडाक्याने तोफांच्या वृक्ष आणि पर्वत हादळती ।
त्यात संधी साधून एकाएकी दुरून कोसळती ॥चाल॥
भणाण झाले सैन्य सोडिली कितीकांनी सोबत ।
कितीक इमानी बरोबर झुकले घर टाकुनी चुंबत ।
कितीक मुकामी अन्न मिळेना गेली साहेब नौबत ॥चाल॥
कोठे डेरे दांडे कोठे उंट तट्टे राहिली ।
कोठे सहज होऊन झटपट रक्ते वाहली ।
कोठे श्रीमंत बाईसाहेब सडी पाहिली ॥चाल पहिली॥
बहुत कोमावली पाहवेना दृष्टीने उभयाला ।
हर हर नारायण असे कसे केले सखयाला ॥९॥
माघ शुद्ध पौर्णिमेस बापुसाहेब रणी भिडले ।
जखम करुन जर्नेलास फिरता जन म्हणती पडले ।
गोविंदराव घोरपड्याचे दोन हात भले झडले ।
आनंदराव बाबर ढिगामधी खुप जाऊन गढले ।
मानाजी शिंदे मागे फिरताना डोई देऊन अडले ।
छत्रपती महाराज तळावर समस्त सापडले ॥चाल॥
घाबरले श्रीमंत सुचेना मन गेले वेधुनी ।
बाईसाहेबांना तशिच घोड्यावर पाठीस बांधुनी ।
नेले काढुनिया अमृतराव बळवंत ज्येष्ठ बंधुनी ॥चाल॥
दहा प्रहर पुरे पंतप्रधान श्रम पावले ।
नाही स्नान शयन नाही स्वस्थपणे जेवले ।
आले आले ऐकता उठपळ राव धावले ॥चाल॥
गर्भगळित जाहले लागले शुष्क दिसायाला ।
बाईसाहेबांना फुरसद न पडे बसून न्हायाला ॥१०॥
दिवाळी आणि संक्रांत कंठिला दुःखांत फाल्गुन ।
रागरंग नाही आनंद ठाऊक रायालागुन ।
सदैव चिंताग्रस्त शब्द बोलती वैतागुन ।
कर जोडून फौजेस पाहिले घडोघडी सांगुन ।
धैर्य धरून कोणी कसून लढेना क्रियेस जागुन ।
कर्म पुढे प्रारब्ध धावते लगबग मागुन ॥चालव
पांढरकवड्यावर रचविल्या धनगारा अद्भुत ।
थंडीने मेले लोक उठविले गारपगार्यांनी भुत ।
बेफाम होते लष्कर नव्हती काही वार्ता संभुत ॥चाल॥
ओधवले कसे सर्वांचे समयी संचित ।
कडकडून पडले गगन जसे अवचित ।
दुःखाचे झाले डोंगर नाही सुख किंचित ॥चाल पहिली॥
अनुचित घडली गोष्ट दिसेना ठाव लपायाला ।
कोणे ठिकाणी नदीत लागले सैन्य बुडायाला ॥११॥
जे श्रीमंत सुकुमार वनांतरी ते भटकत फिरती ।
कळेल तिकडे भरदिसास प्रभु काट्यामधी शिरती ॥
आपला घोडा आपण स्वहस्ते चुचकारुन धरती ।
खाली पसरुन उपवस्त्र दिलगिरीत वर निद्रा करती ॥
अस्तमानी कधी रात्री भात भक्षिती पाटावरती ।
दरकुच दर मजलीस कृपेतिल सेवक अंतरती ॥चाल॥
पेशव्यांचे वंशात नाही कोणी असा कट्टर पाहिला ।
हत्ती घोडे उंट खजीना जेथील तेथे राहिला ।
बाजीराव होय धन्य म्हणून यापरी आकांत साहिला ॥चाल॥
नर्मदेस शालिवाहन शक संपला ।
त्या ठायी ठेविल शकपंती आपला ।
भरचंद्रराहुग्रहणात जसा लोपला ॥चाल पहिली॥
सांब कसा कोपला लागले गलीम लुटायाला ।
सिद्ध झाले मालकमास राव राजेंद्र मिळायाला ॥१२॥
समस्त लष्कर दुःखित पाहुनी श्रीमंत गहिवरले ।
सद्गद जाला कंठ नेत्र दोन्ही पाण्याने भरले ।
आम्हापुढे जे शत्रु रणांगणी नाही क्षणभर ठरले ।
ते आमच्या जन्मास दुष्ट चांडाळ पुरुन उरले ।
केवळ असा विश्वासघात केल्याने कोण त ले ।
इंद्र चंद्र आदिकरुन आल्या संकटास अनुसरले ॥चाल॥
तुमची आमची हीच भेट आता राव सर्वांना सांगती ।
कृपालोभ परिपूर्ण करित जा द्या दर्शन मागती ।
ऐसे उत्तर ऐकून शतावधी पायी सेवक लागती ।
॥चाल॥ महाराज उपेक्षुन आम्हांस जाऊ नये ।
दूर ढकलुन शरणागतास लावू नये ।
पहाकसबाचे घर गाईस दावू नये ॥चाल पहिली॥
हिंमत सोडू नये सर्व येईल पुढे उदयाला ।
कोण काळ कोण दिवस धन्यांनी पुसावे ह्रदयाला ॥१३॥
प्राण असुन शरिरात बुडालो वियोग लोटात ।
बरोबर येतो म्हणुन घालिती किती डोयी पोटात ।
निराश जाणुन झाली रडारड मराठी गोटात ।
निर्दयांनी लांबविली पालखी पलटण कोटात ।
मातबर लोकांची ओझी चालतात मोटात ।
गरीब करी गुजराण प्रसंगी एक्या जोटात ॥चाल॥
कुंकावाचुन कपाळ मंगळसूत्रावाचुन गळा ।
तया सैन्यसमुदाय उदाशित रंग दिसे वेगळा ।
धर्म बुडाला अधर्म दुनियेमधि आगळा ॥चाल॥
कसे प्रभूंनी ब्रह्मावर्त शहर वसविले ।
अगदीच पुण्याच्या लोकांना फसविले ।
हुर हुर करीत का उन्हात बसविले ॥चाल पहिली ॥
काही तर तोड पुढे दिसेना जीव जगायाला ।
कोणास जावे शरण कोण हरि देईल खायाला ॥१४॥
विपरित आला काळ मेरुला गिळले मुंग्यांनी ।
पंडीतास जिंकिले सभेमध्ये मदांध भंग्यांनी ।
भीमास आणिले हारीस रणांगणी अशक्त लुंग्यांनी ।
कुबेरास पळविले अकिंचन कसे तेलंग्यांनी ।
जळी राघव माशास अडविले असंख्य झिंग्यांनी ।
जर्जर जाहला विष्णुवाहन बदकांचे दंग्यांनी ॥चाल॥
ईश्वरसत्ता विचित्र सारे दैवाने घडवीले ।
हरिश्चंद्र आणि रामचंद्र नळ पांडवास रडवीले ।
फितुर करुन सर्वांनी असले राज्य मात्र बुडवीले ॥चाल॥
म्हणे गंगु हैबती पावेल जर शंकर ।
तर दृष्टीपुढे पडतील राव लवकर ।
महादेव गुणीजन श्रीमंतांचे चाकर ॥चाल पहिली ॥
प्रभाकरची जडण घडण कडकडीत म्हणायाला ।
धुरू नारो गोविंद वंदी त्या निशिदिन पायाला ॥१५॥