रामायणातील अप्सरांचे संदर्भ
रामायणात बर्याच ठिकाणी अप्सरांचे उल्लेख आढळतात. त्यापैकी काही श्लोक खाली दिले आहेत.
अप्सु निमर्थनात् एव रसात् तस्मात् वर स्त्रिय:।
उत्पेतु: मनुज श्रेष्ठ तस्मात् अप्सरसो अभवन् ॥ १-४५-३३
हा श्लोक बालकांडात येतो. राम-लक्ष्मणांना विश्वामित्र सम्रुद्रमंथनाची कथा सांगत असताना समुद्रमंथनातून अप्सरा हे रत्न निघाल्याचे सांगतात. यानंतर येणार्या श्लोकांतून अप्सरांच्या सौंदर्याचे वर्णन येते. तसेच विश्वामित्रांच्या कथेनुसार अप्सरांना आपला प्रियकर म्हणून देव, दानव, मानव या सर्वांची निवड करण्याची मुभा होती. लग्नबंधनाच्या नीतिनियमांपासून त्या मुक्त होत्या या अर्थांचे श्लोकही बालकांडात येतात.
घृताचीम् अथ विश्वाचीम् मिश्रकेशीम् अलम्बुसाम् ।
नागदन्तां च हेमां च हिमामद्रिकृतस्थलाम् ॥ २-९१-१७
अयोध्याकांडातील या श्लोकांत भारद्वाज ऋषीने केलेल्या भरताच्या आदरसत्कारात घृताची, विश्वाची, मिश्रकेशी, अलम्बुसा, नागदंता, हेमा व हिमा या अप्सरांना पाचारण केल्याचा उल्लेख येतो. या सर्व नृत्य, गायन व वादन कलांत निपुण होत्या आणि त्यांनी भरत व अयोध्येच्या सेनेला रिझवण्यासाठी नृत्य-गायन केल्याचा उल्लेखही नंतरच्या श्लोकांतून येतो.