अध्याय सातवा
होता नरपती एक । मित्रसह तत्सेवक । श्राद्धीं नृमांस दे ठक । वसिष्ठादिक ऋषींसी ॥१॥
ऋषी रुसे देयी शाप । ब्रह्मराक्षस हो भूप । विप्रा मारी तत्स्त्री शाप । दे स्त्रीसंपर्के मरसी ॥२॥
तो भूप बारा साल । जातां प्राग्वत् हो विमल । सांगे राणीसी सकल । शापबोल ब्राह्मणीचा ॥३॥
दुःखें मरुं इच्छी राणी । राजा तिला सांवरोनी । केलें पाप सांगोनी । तारा म्हणूनी प्रार्थी विप्रा ॥४॥
मनस्येकं वचस्येकं । असा नोहे हा सेवक । हें जाणोनी द्विज लोक । सांगे सम्यक् तीर्थयात्रा ॥५॥
ब्रह्महत्या न जाय ती । मग भूपा वाटे भीती । मिथिलापुरीं महामती । सांगे खंती गौतमाते ॥६॥
मुनीं तया आश्वासून । सांगे क्षेत्र गोकर्ण । तेथें दोष निवारुन । तूं पावन होशील बा ॥७॥
ऐक थोडेसें आख्यान । म्यां देखिलें तें सांगेन । शिवदूत येती धांवून । चंडाळी मरतां एक ॥८॥
हर्ष पाहतां हो तयां । म्यां पुसतां, करुनी दया । ते सांगती मातें राया । विप्रजाया प्राग्जन्मीं हे ॥९॥
ही बालविधवा झाली । जारकर्मी रमली । स्वजनांनीं सोडिली । व्यक्त झाली वैश्यकांता ॥१०॥
असभ्य संगें दुष्ट । जारकर्में झाली भ्रष्ट । मद्यमांसें झाली पुष्ट । नेणे कष्ट पुढील ती ॥११॥
मत्ता ते मेष म्हणून । गोवत्सा खायी मारुन । दुजे दिनी शिर पाहून । शिव म्हणून छपवी तें ॥१२॥
असी नांदता ती मेली । गोवघें हो चंडाळी । अविचारें हो आंधळी । व्रणे झाली जारकर्में ॥१३॥
असी तोकपणें झाली । मायबापें रक्षियेली । लवकर तेही मेलीं । पोरी झाली निराश्रय ॥१४॥
ती जन संयोगेशीं । आली गोकर्णक्षेत्रासी । वस्त्रहीन उपवासी । व्रतदिवशी मागे अन्न ॥१५॥
ती याचावया कर । पुढें करी, कोणी नर । करीं टाकी बिल्वपत्र । टाकी दूर हुंगोनी ती ॥१६॥
पडे दिष्टें लिंगावर । तेणें तुष्टे गौरीवर । करी इला भवपार । धाडी शीघ्र आम्हां येथें ॥१७॥
पुनर्न जन्मेल ही । म्हणोनियां नेली त्यांहीं । गौतम म्हणे तूंही । नृपा पाहीं गोकर्णातें ॥१८॥
नृप चमत्कार मानून । जातांची हो पांवन । तेथ साक्षाच्छिव जाण । म्हणोन ये श्रीपाद ॥१९॥
इति श्री०प०प०वा०स०गु०गोकर्णक्षेत्रवर्णनं नाम सप्तमो०