Android app on Google Play

 

निर्लज्ज

 

*निर्लज्ज,..*

1) त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी
माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट
मी हळूच खिशात दाबलं...

आणि त्याच्याच मागून
भिकाऱ्यासारखं हात जोडून
मला विनंती करीत आलेल्या
कफल्लक म्हाताऱ्याला
वयाचा दाखला आणायला
मी बळेच पिटाळून लावलं...

त्याच्या डोळ्यातला
तो अश्रूचा थेंब पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....

*लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची..!*

3) रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या
तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची
तिने विनंती करताच
माझी नवी कोरी चमचमीत आलिशान कार
रक्ताने माखेल की काय या भीतीने
मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून
हळूच टांग मारली...

तिच्या नजरेतली भीक
मी स्पष्टपणे पहिली
तरीही मला लाज नाही वाटली ....

*लाज माझ्या दिखावेबाज श्रीमंतीची...!*

4) बलात्काराच्या केसमधून
त्याला निर्दोष सिध्द करताना
मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली...

बलात्काराच्या बळीची आब्रू
पुन्हा वेशीवर टांगली.
तिच्या डोळ्यातला राग पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....

*लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची...!*

5) एअरकंडीशनर मॉल मधून
महागडे कपडे अन शूज खरेदी करून
मी अभिमानाने कार्ड स्वाईप केलं...

फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानीनंतर
वेटरच्या हातावर
१०० रुपयांची टीप सुध्दा टेकवली...

मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना
१० रुपयासाठी अपार घासाघिस केली...

त्या गरीब शेतकऱ्याच्या
आर्त विनवणीचा सूर
कानात घुमत राहिला.
तरीही मला लाज नाही वाटली....

*लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची...!*

6) समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून
शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या
मी खूप गप्पा मारल्या...

पण जिथे माझा राजानं अखेर प्राण सोडला
त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र
दयनीय अवस्था केली...

शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी
टीव्हीवरती पसरली...

प्रेमी युगुलांची नावं लिहलेल्या
गडाच्या बुरुजांचा आक्रोश
कानठळ्या फोडू लागला
तरीही मला लाज नाही वाटली....

*लाज माझ्या नादान शिवभक्तीची...!*

7) गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स,
३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात
कुणी आरक्षणासाठी तर कुणी
आरक्षणाच्या विरुध्द भांडला...

आदिवासी पाड्यावरचा रुग्ण
वाहतूकसुविधे अभावी अजूनही
झोळीत टाकून आणलेला पहिला...

डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला.
तरीही मला लाज नाही वाटली....

*लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची...!*

8) २६/११ ला मी मेणबत्त्या लावून
श्रद्धांजली वाहिली...

पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून
देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या...

त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट
मी चवीने पहिले...

माझ्याच पैशात मी
कित्त्येक कसाब पोसले
तरीही मला लाज नाही वाटली....

*लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!*

आणि अजूनही मला
लाज नाही वाटत....

*माझ्या निर्लज्जपणाची...!!!*
*******************

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻