शिकवणे अर्थांत लर्निंग
ज्या प्रमाणे लहान मूल स्वानुभवाने शिकते कि गरम पदार्थाला हात लावू नये त्याच प्रमाणे संगणकाला सुद्धा शिकवावे लागते. न्यूरल नेटवर्क निर्माण केले तरी ते ह्या शिकण्याच्या प्रक्रिये शिवाय निरर्थक आहे.
समजा तुम्हाला संगणकाला एखाद्या चित्रातून कुत्रा आणि गाडी ओळखायला शिकवायचे आहे तर आधी तुम्ह स्वतः लक्षावधी चित्रे आणून त्यांत कुत्रा आणि गाडी शोधून संगणकाला दाखवायला पाहिजे, संगणक मग नव्या न पाहिलेल्या चित्रातून सुद्धा कुत्रा आणि गाडी ओळखू शकतो.
समाज एक लहान मूल आहे त्याला तुम्ही एक रेडा दाखवला आणि "ह्याला रेडा म्हणतात" असे सांगितले तर पुढच्या वेळी तो कदाचित काळ्या गायीला सुद्धा रेडा म्हणेल कारण त्या लहान मुलाच्या मेंदूत काळा रंग, ४ पाय => रेडा असे समीकरण असू शकते. पण तुम्ही त्याला अनेक रेडे दाखवले तर हळू हळू रेड्याची शिंगे, आकार इत्यादी त्याला समजायला लागून त्याच्या मेंदूतील न्यूरॉन्स रेड्याला ओळखू शकतात. संगणकाचे सुद्धा तसेच आहे.
फक्त चित्रे ओळखणे इतकेच नाही तर एखाद्या बॅंकेचे सर्व व्यवहार पाहून त्यातील कुठले व्यवहार संशयास्पद आहेत हे संगणक ओळखू शकतो. सर्व टॅक्स रिटर्न्स पाहून त्यातील कोणता माणूस कर बुडवत आहे हे संगणक सांगू शकतो. तुमच्या शरीराचे रिपोर्ट्स पाहून तुम्हाला भविष्यांत कॅन्सर होऊ शकतो का हे सांगू शकतो. इतकेच नाही तर तुमच्या आजूबाजूचे रिअल इस्टेट दार पाहून तुमच्या घराची किंमत किती आहे हे सांगू शकतो. हरवलेल्या माणसांना CCTV फुटेज पाहून शोधून काढू शकतो.
पण आज पर्यंत संगणक फक्त एखादी विशिष्ट गोष्टच करू शकतो. माणसाप्रमाणे चतुरस्त्र बुद्धी असलेला संगणक मात्र बनवला गेलेला नाही.तसा संगणक आम्ही बनवू शकू कि नाही हे सुद्धा अज्ञात आहे.