Get it on Google Play
Download on the App Store

असा गुरु, असा शिष्य

गिर्यारोहकांची एक तुकडी एक अवघड शिखर सर करण्यासाठी चालली होती. वाट खूप अवघड व धोकादायक होती. वेळेत शिखरावर पोहोचू शकणार नसल्याची जाणीव होताच सर्वांनी बेस कॅम्पवर परतण्याचे ठरवले. पण एक जिद्दी गिर्यारोहक तसाच पुढे चालत राहिला. शिखर जवळ आले पण तेवढयात अंधार पडला. तरीही तो चालत राहिला व दुर्दैवाने अंधारात पाय घसरून पडला आणि खोल दरीत कोसळू लागला. कोसळत असताना त्याला जाणवले की  या प्रचंड उंचीवरून खाली पडल्यानंतर त्याच्या देहाच्या चिंधड्या उडणार आहेत. तो जीवाच्या आकांताने ओरडला,


"गुरुजी मला वाचवा … वाचवा … "

कोसळताना त्याच्या कमरेच्या दोरीमुळे तो अधांतरी लोंबकळू लागला. डोळे विस्फारून पाहिले तरीही खाली अजून किती खोल दरी आहे याचा अंधारामुळे त्याला अंदाज येत नव्हता. त्याने पुन्हा एकदा गुरुजींचा धावा केला. त्या भीषण दरीतील अंधारात त्याचा आवाज घुमला व क्षणार्धात प्रतिध्वनी उमटला,

"तुला मी खरंच वाचवावं  असं वाटतं काय ?"

"होय गुरुजी, मी अत्यंत कळकळीची विनंती करतो, मला वाचवा"

"ठीक आहे", दरीतून आवाज आला," मग तुझ्या खिशातला चाकू काढ आणि कमरेला गुंडाळलेली दोरी कापून काढ."

गिर्यारोहकाला ही सूचना पार वेडेपणाची वाटली. आजूबाजूला हाडे गोठवणारी कडाक्याची थंडी होती. पण दोरीला लोंबकळत राहिल्याने जगण्याची थोडीतरी खात्री होती. पण गुरूच्या आज्ञेनुसार कमरेची दोरी कापली तर खोल दरीत कोसळून आपण नक्कीच मरणार या कल्पनेने तो क्षणभर गोंधळला. शेवटी त्याने दोरी कापून शरीराच्या चिंधड्या उडवून घेण्यापेक्षा रात्रभर थंडीत लोंबकळत राहण्याचा पर्याय स्वीकारला.

सकाळ झाली. ऊन पडले. बर्फ वितळू लागले. गिर्यारोहकांची तुकडी रात्रभर कॅम्पवर न परतलेल्या सहकाऱ्याच्या शोधात बाहेर पडली. थोडयाच वेळात ते त्या शिखराच्या खालच्या भागात पोहोचले. तेथे त्यांना दिसले कि त्यांच्या सहकाऱ्याचा मृतदेह दोरीला लोंबकळत होता आणि जमिनीपासून अवघ्या पाच फूट उंचीवर तो देह थंडीने गारठून थिजलेला होता!

वरील कथेचा भावार्थ असा -

जेंव्हा आपली बुद्धी चालेनाशी होते तेंव्हा आपण गुरूला शरण जातो. पण एकदा शरण गेल्यानंतर उपदेश मानण्याच्या वेळी पुन्हा आपली बुद्धी चालवण्याचा मोह किंवा स्वसामर्थ्याची व्यर्थ जाणीव धोक्याची असते. सर्व गोष्टींचा विचार करूनच गुरूने मार्गदर्शन केलेले असते. पण समर्पणाऐवजी अहंभाव जागा झाल्यास सर्वनाश होतो!