प्रकरण पाचवे सत्ता प्रक...
प्रकरण पाचवे
सत्ता प्रकाश सुख । या तिहींतिहीं उणें लेख ।
जैसे विषपणें विष । विषा नाहीं ॥१॥
सत्ता चेतन सुख या तानींमाजीं उणेपणा राही ।
जेंवि विषाला विषपण नाहीं त्याच्याचि विषपणें पाही ॥१॥
कांति काठिण्य कनक । तिन्ही मिळोनि कनक एक ।
द्राव गोडी पीयूख । पीयूखचि जेविं ॥२॥
काठिण्य कांति सोनें तीन मिळोनी जसें सुवर्णचि तें ।
अमृत द्रव माधुर्य त्रयहि मिळोनी सुधाचि ते होते ॥२॥
उजाळ द्रुति मार्दव । या तिहीं तिहीं उणिव ।
देखिजे सावेव । कापुरीं एके ॥३॥
मृदुता सुगंध आणी पांडुरता कापुरीं जरी भिन्न ।
दिसती प्रेक्षकदृष्टिस एकचि कापुर परि तिथें त्रय न ॥३॥
आंगे कीर उजाळ । कीं उजाळ तोचि मवाळ ।
कीं दोन्ही ना परिमळ । मात्रचि जें ॥४॥
धवलपणा अणि मार्दव फोल उभयही सुगंध एक खरा ।
प्रत्यय एकचि कापुर असा दिसे शब्दिं मात्र भेद जरा ॥४॥
ऐसें एके कापूरणीं । तिन्हीं इयें तिन्हीं उणीं ।
यापरी आटणी । सत्त्वादिकांची ॥५॥
जैसे कापुरिं तीनी सत्तादिकही तसेचि गुण अटती ।
आत्मत्वीं भिन्न असे ते प्रेक्षकदृष्टिला जरी दिसती ॥५॥
येर्हवीं सच्चिदानंदभेदें । चाललीं तिन्हीं पदें ।
परी तिन्हीं उणीं आनंदें । केलीं येणें ॥६॥
सच्चित्सुखभेदाने यद्यपि आत्म्यास लाविलीं त्रिपदें ।
परि तीं तीनहि झालीं वस्तूच्या ग्रस्त ठाई आनंदें ॥६॥
सत्ताचि कीं सुखप्रकाशु । प्रकाशचि सत्ता उल्हासु ।
हे न निवडे मिठांशु । अमृतीं जेवीं ॥७॥
आनंदचि सत्ता हा सत्ता जी तीच होय चैतन्य ।
तीनी अभिन्न असती अमृतीं मधुरत्व जेविं नच अन्य ॥७॥
शुक्लपक्षींचिया सोळा । दिवसें वाढती कळा ।
परि चंद्रमात्र सगळा । चंद्री जेविं ॥८॥
चंद्रांत शुक्लपक्षीं प्रतिदिवशीं वाढती कला सोळा ।
परि चंद्र चंद्रि जैसा क्षयवृद्धीवांचुनी असे सगळा ॥८॥
थेंबीं पडतां उदक । थेंबी धरूं ये लेख ।
परी पडिल्या ठाई उदक । वांचूनि आहे ॥९॥
जल खालीं पडतांना जलबिंदू वेगळे जसे दिसती ।
परि पडल्या ठाई ते उदकचि एकत्र होउनी असती ॥९॥
तैसें असतांचि या व्यावृत्ती । सत् म्हणे आलें श्रुती ।
जडाचिया समाप्ती । चिद्रूप ऐसें ॥१०॥
असताची व्यावृत्ती जी तीतें सत् असे म्हणे वेद ।
चिद्रूप तेंचि कथिलें केला वेदांत जो जडनिषेध ॥१०॥
दुःखाचेनि सर्व नाशें । उरलें तें सुख ऐसें ।
निगदिलें निःश्वासें । प्रभूचेनि ॥११॥
अत्यंत नाश होतां दुःखाचा त्या स्थितीस नांव दिले ।
सुख ऐसें वेदानें होतें वस्तुस्वरूप जें पहिलें ॥११॥
ऐसीं सदादि प्रतियोगियें । असदादि तिन्हीं इये ।
लोटितां जालीं त्रयें । सत्तादिकें ॥१२॥
यापरि सदादि शब्द प्रतियोगी तीन शब्द असदादी ।
याचा निषेध करितां सच्चित्सुख या पदा मिळे अवधी ॥१२॥
एवं सच्चिदानंद । आत्मा हा ऐसा शब्द ।
तो अन्यव्यावृत्तिसिद्ध । वाचक नव्हे ॥१३॥
वाचक नव्हते म्हणुनी आत्माचींही सदादि तीन पदें ।
अन्यव्यावृत्तिस्तव होती हे शब्द तो म्हणे वेद ॥१३॥
सूर्याचेनि प्रकाशें । जें कांहीं जड आभासे ।
तया तो गिंवसे । सूर्य काई ॥१४॥
सूर्याच्या तेजानें जड वस्तू ज्या प्रकाशिल्या जाती ।
सांगा सूर्या कैशा भासविण्याला समर्थ त्या होती ? ॥१४॥
तेवीं जेणें तेजें । वाचेसि वाच्यता सुजे ।
तें वाचा प्रकाशिजे । हें कें आहे ॥१५॥
तैशी वाणी ज्याच्या तेजानें दर्शवी पदार्थातें ।
कैसी समर्थ होई दाखविण्या त्या सदात्मवस्तूतें ॥१५॥
विषो नाहीं कोणाही । जया प्रेमयत्वचि नाहीं ।
तया स्वप्रकाशा काई । प्रमाण होये ॥१६॥
नोहे विषय कुणाचा ज्याला ये ना कधीं प्रमेयत्व ।
किमपि प्रमाण शक्त न साधाया स्वप्रकाश तें तत्त्व ॥१६॥
प्रमेयपरिच्छेदें । प्रमाणत्व नांदे ।
तें काय स्वतःसिद्धें । वस्तूच्या ठाई ॥१७॥
मर्यादित होई जैं प्रमेय तैं त्या प्रमाणगोचरता ।
जी वस्तु स्वतःसिद्धचि तेथें कैंची प्रमाणसार्थकता ॥१७॥
एवं वस्तुसी जाणों जातां । जाणणेंचि वस्तु तत्त्वतां ।
मग जाणणें आणि जाणता । कैंचा उरे ॥१८॥
एवं जाणों जातां वस्तूतें जाणणेंचि ती होई ।
ऐसें होतां एकचि ज्ञान ज्ञाता तिथें कसें राही ॥१८॥
म्हणोनि सच्चित्सुख । हे बोल वस्तुवाचक ।
नव्हेति हे शेष । विचारांचे ॥१९॥
म्हणुनी सच्चित्सुख हे वाचक होती न शब्द आत्म्याचे ।
अवशिष्ट आत्मवस्तू राहे मौनचि जिथें विचाराचें ॥१९॥
ऐसेनि इयें प्रसिद्धें । चालिलीं सच्चिदानंद पदें ।
मग द्रष्ट्या स्वसंवादे । भेटती जेव्हां ॥२०॥
ऐसीं प्रवृत्त होती सच्चित्सुख हीं विशेषणें तीन ।
मग द्रष्ट्याला भेटति सत्तादी त्रिविध भेद टाकून ॥२०॥
ते वेळीं वरिसोनि मेघ । समुद्र होऊनि वोघ ।
सरे दाऊनि माग । राहे जेसा ॥२१॥
तेव्हां वर्षोनीयां सागररूपेम उरे जसा मेघ ।
किंवा गंतव्य स्थळ दावुनि मागे उरे जसा मार्ग ॥२१॥
फळ विऊनि फूल सुके । फळनाशें रस फांके ।
तोही रस उपखे । तृप्तिदानीं ॥२२॥
फल विउनी फूल सुके रस देउनि फलहि पावतें नाशा ।
तोही रस भोक्तयाला पावे देऊनि तृप्ति तीच दशा ॥२२॥
कां आहुती अग्निआंत । घालूनि वोसरे हात ।
सुखा चेववूनि गीत । उगा राहे ॥२३॥
अथवा आहुति अर्पुनि अग्निमधें हात मागुती परते ।
किंवा गायन जैसें राहे उगि गुंगवूनि चित्तातें ॥२३॥
नाना मुखामुख दाउनी । आरिसा जाय निघोनी ।
का निदैलें चेववुनी । चेववितें जैसें ॥२४॥
दावुनि मूख मुखाला एकिकडे सारिला जसा मुकुर ।
किंवा सुप्त नराला चेववुनी निघुनि जाय अन्य नर ॥२४॥
तैसें सच्चिदानंद चोखटा । दाऊनि द्रष्ट्या द्रष्टा ।
तिन्हीं पदें लागती वाटा । मौनाचिया ॥२५॥
तैसीं सच्चित्सुख हीं तीन पदें देख गणितलीं साचीं ।
द्रष्ट्याला द्रष्ट्यातें दाखवुनी धरिति वाट मौनाची ॥२५॥
जें जें बोलिजे तें तें नव्हे । होय तें तंव न बोलवे ।
साउलीवरी न मववे । मवितें जैसें ॥२६॥
शब्दांत बोलवे जें नोहे तें बोलवे न तें होय ।
छायेसि मोजिल्यानें नच जैसा पुरुष मोजिला जाय ॥२६॥
मग आपुलियाकडे । मवितया से पडे ।
तैं लाजही आंखुडे । मविती जैसी ॥२७॥
नंतर जेव्हां आठव होई त्या आपुल्याचि देहाचा ।
तेव्हां लज्जा वाटुनि होई संकोच त्याचि लाजेचा ॥२७॥
तैसी सत्ताचि स्वभावें । असत्ता तंव नव्हे ।
मा सत्तात्व संभवे । सत्तेसी कायि ॥२८॥
स्वाभाविक जी सत्ता कधिंहि असत्ता न वस्तुची होई ।
मग मुळच्या सत्तेला कैसें सत्तात्व संभवे पाहीं ॥२८॥
आणि अचिदाचेनि नाशें । आलें जें चिन्मात्रदशे ।
आतां चिन्मात्रचि मा कैसें । चिन्मात्रीं इये ॥२९॥
तैसेंचि जडनिरासें मुळचें चैतन्य अनुभवा आलें ।
मग केविं सभवें त्या चित्पद चिन्मात्र जें असे पहिलें ॥२९॥
नीद प्रबोधाच्या ठाई । नसे तैसें जागणेंही ।
तेवीं चिन्मात्रचि मा काई । चिन्मात्रीं इये ॥३०॥
निद्रा जागरिं नाहीं जैसी तैसेंचि जागणें नाहीं ।
त्यापरि या चिन्मात्रीं जडवत् चैतन्यही नसे पाहीं ॥३०॥
ऐसें यया सुखपणें । नाहीं दुःख कीर होणें ।
मा सुख हें गणणें । सुखासी कायी ॥३१॥
ज्याच्या आनंदाला दुःखाचा स्पर्श लेशही नाहीं ।
मग त्या सुखासि सुख हें म्हणणें नच युक्त होय बा पाहीं ॥३१॥
म्हणोनि सद्सदत्वें गेलें । चिदचिदत्वें मावळलें ।
सुखासुख झालें । कांही ना कीं ॥३२॥
सत्ता सत्त्वें गेली चित्ता चित्त्वें तशीच मावळली ।
सौख्यें सौख्य तसेंची स्वरूपाची मात्र शांतता उरली ॥३२॥
आतां द्वंद्वाचें लवंचक । सांडूनि दुणीचें कंचुक ।
सुखमात्रचि एक । स्वयें आथी ॥३३॥
सुखदुःखद्वंद्वाचें कंचुक सांडोनि जें उरे एक ।
केवल सुखमात्रचि तें सुखदुःखस्पर्श ज्यासि न मनाक ॥३३॥
वरी एकपणें गणिजे । तें गणितेंनसीं दुजें ।
म्हणोनि हें न गणिजे । ऐसें एक ॥३४॥
एकपणेंचि गणावें तरि गणित्यासह दुजेपणा येई ।
म्हणुनि न गणना साहे एकपणें वस्तु गण्य ती नाहीं ॥३४॥
सुखाआंतोनि निघणें । तें सुखिये सुखें तणें ।
हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ॥३५॥
पूर्वी अनुभव घेउनि नंतर होई सुखी तया योगें ।
परि जें सुखमात्रचि तें होय सुखी केंवि आत्मसुखभोगें ॥३५॥
जैं प्रकृति डंका अनुकरे । तैं प्रकृति डंके अवतरे ।
मा डंकुचि डंका भरे । हें कें आथी ॥३६॥
जैं प्रकृतीला डंकू करि अनुकरणासि अवतरे प्रकृती ।
डंकुचि डंका भरला केंवि घडे हें अशक्य या जगतीं ॥३६॥
तैसें आपुलेनि सुखपणें । जया नाहीं सुखावणें ।
आणि नाहीं हेंही जेणें । नेणिजे सुखें ॥३७॥
तैसें स्वतांचि सुख जें तें स्वसुखानें कसें सुखी होई ।
आत्मसुखाच्या योगें न कळे त्या मी नव्हे सुखी हेंही ॥३७॥
आरिसां न पाहतां मुख । स्वयेई सन्मुख ना विन्मुख ।
तेंवि नसोनि सुखासुख । सुखचि जें ॥३८॥
अरसां न पहातां मुख सन्मुख विन्मुख नसे जसा दोही ।
तेविं स्वरुपसुखाला भोग नसोनी सदाचि सुख पाहीं ॥३८॥
सर्व सिद्धांताचिया उजरिया । सांडूनियां निदसुरिया ।
आपलिया हातां चोरिया । आपणचि जो ॥३९॥
सांडुनि सिद्धांताच्या सकलहि उपपत्ति फोल ज्या दिसती ।
अपुल्याला चोरोनि अपुल्या ठांईच जो करी वसती ॥३९॥
न लवितां ऊंस । तैं जैसेनि असेनि असे रस ।
तेथिंचा मिष्टांश । तोचि जाणे ॥४०॥
लागवडीच्या पूर्वी रसरूपें राहतो जसा ऊंस ।
न कळत अन्याला तो जाणे त्यांतिल स्वतांचि मिष्टांश ॥४०॥
कां न सज्जितां वीणा । तो नाद जो अबोलणा ।
तया तेणेंचि जाणा । होआवें लागे ॥४१॥
किंवा न लावितां जो वीण्याचा नाद होय अव्यक्त ।
त्याचा श्रोता तोचि त्याविण दुसर्यासि तो नसे ज्ञात ॥४१॥
नाना पुष्पांचिया उदरा । न येतां पुष्पसारा ।
आपणचि भंवरा । होआवें पडे ॥४२॥
पुष्पविकासापूर्वीं पुष्पांतिल जाणण्यासि मकरंद ।
भ्रमर असे कोण दुजा तेंचि तयाचा रसज्ञ अरविंद ॥४२॥
नाना न रंधितां रससोये । ते गोडी कैसी पां आहे ।
हें पाहणें तें नोहे । आणिका जोगें ॥४३॥
कीं अजुनि पाकसिद्धी नाही त्याचा रसज्ञ कवण असे ।
तोचि तयाचा भोक्ता रस त्यावांचूनि कोणि अन्य नसे ॥४३॥
तैसें सुखपणा येवों । लाजें आपुलें सुख पावों ।
तें आणिकां चाखों सुवो । येईल कायी ॥४४॥
त्यापरि केवल सुख जें होई ना आपणासि भोग्य कधीं ।
तें सेव्य व्हावयाला त्याविण दुसर्या कुणा नसे अवधी ॥४४॥
दिहाचिया दुपारीं । चांदु जैसा अंबरीं ।
तें असणें चांदाचिवरी । जाणावें कीं ॥४५॥
किंवा ऐन दुपारीं स्वस्थानीं राहुनी जसा तैसा ।
अपुली सत्ता जाणे अन्याला जरि अदृश्य विधु जैसा ॥४५॥
रूप नाहीं तैं लावण्य अंग नुठी तैं तारुण्य ।
क्रिया न फुटे तैं पुण्य । कैसें असे ॥४६॥
रूपाविण सुंदरता अंगावांचूनि जेंवि तारुण्य ।
कर्माची उत्पत्ती होण्यापूर्वीं जसें असे पुण्य ॥४६॥
जैं मनाचा अंकुर नुपजे । तेथिलेनि मकरध्वजें ।
तोचि हन माजे । तरीचि घडे ॥४७॥
नुपजे अंकुर जेव्हां तेव्हां अव्यक्त वसतसे मदन ।
तेव्हां उन्मत्तपणा तैसें आत्मस्वरूपसुख जाण ॥४७॥
कां वाद्यविशेषांची सृष्टी । जैं जन्म नेघे दृष्टी ।
तैं नादु ऐसी गोष्टी । नादाचिजोगी ॥४८॥
वाद्याची उत्पत्ती होण्यापुर्वींचे जो असे नाद ।
तेव्हां स्वकीय सत्ता कवण असे जाणण्यासि अन्य वद ॥४८॥
नाना काष्ठांचिया विटाळा । वोसरलियाही अनळा ।
लागर्णे तैं केवळा । अंगासीचि ॥४९॥
किंवा अनला जेव्हां काष्ठाचा स्पर्श जाहला नाहीं ।
त्याचें इंधन तोची ते वेळीं अन्य दह्य त्या नाहीं ॥४९॥
दर्पणाचेनि नियमें । वीणचि मुखप्रेमें ।
आणिती तेचि वर्में । वर्मती येणें ॥५०॥
दर्पणिं न देखतांही अपुलें मुख ज्यासि पाहतां येतें ।
आत्म्याविषयींचें जें प्रेम तयाविण कळे न अन्यातें ॥५०॥
न पेरितां पीक जोडे । ते मुडाचि आहे रोकडें ।
ऐसिया सोई उघडें । बोलणें हें ॥५१॥
सिद्धचि असे मुड्यामधिं जैसें तें पीक पेरण्याआधीं ।
तैसें अस्तित्वाविण चिन्मात्रचि नित्य सिद्धचि अनादी ॥५१॥
एवं विशेष सामान्य । दोहों नातळें चैतन्य ।
तें भोगिजे अनन्य । तेणेंसि सदा ॥५२॥
आत्मा चिद्रूप असा म्हणवेना जो विशेष सामान्य ।
तो भोग्य तोचि भोक्ता एकचि केवल न त्या शिवे अन्य ॥५२॥
आतां यावरी जें बोलणें । तें येणेंचि बोलें शहाणें ।
जें मौनाचेंही निपटणें । पिऊनि गेलें ॥५३॥
यावरि जें बोलावें आतां ऐसेंचि बोलणें विहित ।
कीं उरल्या मौनातें ग्रासुनि राहे अहंपणासहित ॥५३॥
एवं प्रमाण अप्रमाण । प्रमेय केलें अप्रमाण ।
दृष्टांतीं वाइली आण । दिसावयाची ॥५४॥
ठरलींच अप्रमाणें यापूर्वीं ग्राह्य जीं प्रमाणें तीं ।
अपुलें कांहिं न चाले वाहिली म्हणुनि आण दृष्टांतीं ॥५४॥
अंगाचिया अनुपपत्ति । आटलिया उपपत्ति ।
येथे उठिली पांती । लक्षणांची ॥५५॥
आत्मस्वरूपीं खुंटलि गति अपुली म्हणुनि सर्व उपपत्ति ।
पळुनी गेल्या लक्षणसमुदायाचीहि होय तीच गती ॥५५॥
उपाय मागील पाय । घेऊनि जाले वाय ।
प्रतीति सांडिली सोय । प्रत्ययाची ॥५६॥
वायांचि यत्न अपुला म्हणुनि परतले उपायही सगळे ।
आत्मस्वरुपप्रत्यायिं प्रतीतिचेंही तसेंचि धैर्य गळे ॥५६॥
येथें निर्धारेंसीं विचारू । निमोनि जाला सारू ।
स्वामीच्या संकटीं शूरू । सुभटु जैसा ॥५७॥
निश्चयसहित विचारहि वस्तूचे ठायिं पावला निधन ।
स्वामी पडतां संकटिं वीर जसा देइ आपुला प्राण ॥५७॥
नाना नाशु साधूनि आपुला । बोधु बोधें लाजिला ।
नुसुधेपणें थोटावला । अनुभवु जेथ ॥५८॥
बुद्धीसह बोध तसा जाणाया वस्तु लाजुनी मेला ।
अनुभाव्य नाहीं म्हणुनी कुंठितगति एथ अनुभवहि झाला ॥५८॥
भिंगाचिया चडळा । पदराचा पुंज वेगळा ।
करितां जैसा निफाळा । अंगाचा होय ॥५९॥
काढूं जातां अभ्रकभिंगाचे पदर वेगळे करुनी ।
बाकी उरे न कांहीं सर्वांगाचा अभाव होवोनी ॥५९॥
कां गजबजिला उबा । पांघरणे केळीचा गाभा ।
सांडी ते वेळीं उभा । कैंचा कीजे ॥६०॥
उष्मा होई म्हणुनी पांघरुणा टाकि केळिचा गाभा ।
उरता शून्यचि बाकी होई तो मूर्तिमंत केंवि उभा ॥६०॥
तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोहीं अनुभूतिक ।
तें गेलिया कैंचे एक । एकासीचि ॥६१॥
अनुभाव्य आणि दुसरें अनुभाविक यावरीच अनुभूती ।
तदभावीं तीहि नसे राहे अवशिष्ट केवल ज्ञप्ती ॥६१॥
अनुभव हा ठाववरी । आपुलीचि अवसरी ।
येथें अक्षराची हारे । वाइला कायी ॥६२॥
यापरि जेथ असाया नाहीं अनुभूतिलाहि अवकाश ।
त्या ठायिं अक्षराचा पाड किती होय निश्चयें नाश ।६२॥
कां परेसीं पडे मिठी । तेथें नादा सळु नुठी ।
मा वावरिजैल होठीं । हें कें आहे ॥६३॥
जेथें परचि खुंटलि तेथें नादासि नाहिं अवकाश ।
वैखरिचा पाड तिथें काय तिचा होय निश्चयें नाश ॥६३॥
चेइलियाही पाठीं । चेवणयाच्या गोठी ।
किं धाला बैसे पाठीं । रंधनाच्या ॥६४॥
जागें झाल्यावरती जागविण्याच्या कथा वद किमर्थ ।
कीं अन्न रांधण्याचा यत्न असे जेविल्यावरी व्यर्थ ॥६४॥
उदैजलिया दिवसपती । ते कीं दिवे सेजे येती ।
वांचूनि पिकल्या सेतीं । सुजताती नांगर काई ॥६५॥
सूर्योदय झाल्यावरि होताती दीप जेंवि निस्तेज ।
कीं पिकल्या शेताला नांगरण्याचें नसे किमपि काज ॥६५॥
म्हणोनि बंधमोक्षाचें व्याज । नाहीं निमालें काज ।
आतां निरूपण भोज । वोळगे जर्ही ॥६६॥
आतां बंधा मोक्षा व्याज न कर्तव्य कांहिं नच उरलें ।
यालगीं यानंतर शब्दनिरूपणहि त्यासवें सरलें ॥६६॥
आतां पुढिला का आपणापें । वस्तु विसराचेनि हातें हरपे ।
मग शब्देंचि घेपे । आठऊनियां ॥६७॥
अपणा किंवा दुसर्या स्वरूपाची विस्मृती जरी होई ।
होतां सहाय शब्दचि सत्वर ती वस्तु स्मृतिपथीं येई ॥६७॥
येतुलियाही परौतें । चांगावें नाहीं शब्दातें ।
जर्ही स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥६८॥
ऐसें स्मारक म्हणुनी मिरवी हा शब्द आपुली ख्याती ।
याहुनि या शब्दाची अधिक दिसे थोरवी न या जगतीं ॥६८॥
॥ प्रकरण ५ समाप्त ॥