प्रकरण पहिलें ऐसीं इये...
प्रकरण पहिलें
ऐसीं इयें निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें ।
तियें वंदिलीं मियां मूळिकें । देवो देवी ॥१॥
ऐसें जें निरुपाधिक उत्पादक आद्य अखिल जगताचें ।
द्वंद्व प्रकृति पुरुष कीं, वंदियलें चरणयुगुल म्यां त्याचें ॥१॥
जो प्रियूचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचिये सरोभरीं ।
चारुस्थळीं एका हारीं । एकांगाचा ॥२॥
निजरूपाच्या प्रेमें याणें स्वीकार शक्तिचा केला ।
एकचि रूप असोनी दृक्दृश्यद्वंद्वभास तैं झाला ॥२॥
आवडीचेनि वेगें । येकयेकां गिळिती आंगें ।
कीं द्वैताचेनि पांगें । उगळिते आहाती ॥३॥
स्वप्रीतीच्या योगें हीं दोघेंही परस्परां गिळिती ।
द्वैताच्या लोभानें पुनरपि दोघेंहि वेगळीं होती ॥३॥
जे एकचि नव्हे एकसरें । मा दोघां दोनीपण कैचें पुरे ।
काय नेणों साकारें । स्वरूपें जियें ॥४॥
एकाला एकपणा नाहीं तरि दोहिंला कसें द्वित्व ।
आकार असे याला कीं न तयाचें कळेचिना तत्त्व ॥४॥
कैसी खसुखाची आळुकी । जे दोनीपणें भिडोनि एकीं ।
नेदिती मा कौतुकीं । एकपण फुटों ॥५॥
स्वसुखाच्या लोभानें पावति ऐक्यासि सांडुनि द्वैत ।
कौतुकरसेंहि पळभर फुटूं न देती स्वकीय अद्वैत ॥५॥
हा ठावोवेर्ही वियोगभेडें । जें बाळ तरि जगायेवढें ।
वियालीं परी न मोडे । दोघुलेंपण ॥६॥
ऐशीं वियोगभीरु प्रसवति जगरूप बालक अखंड ।
ऐसें जरी तथापी त्याच्या दोघेपणासि नच खंड ॥६॥
आपुलिये आंगीं संसारा । देखिलिया चराचरा ।
परि नेदितीच तिसरा । झोंक लागों ॥७॥
आपण एक द्नष्टा दृश्यचि संसार उदकिं लाट जसी ।
यावांचुनि तिसर्याचा स्पर्श न लावून घेति अपणासी ॥७॥
जयां एका सत्तेचें बैसणें । दोघां येका प्रकाशाचें लेणें ।
जें आनादि एकपणें । नांदती दोघें ॥८॥
दोघें बैसति एका सत्तासनिं तींच त्यांसि आधार ।
एकत्वेंचि अनादी दोघां एकचि चिती अलंकार ॥८॥
भेदु लाजोनि आवडीं । एकरसीं देत बुडी ।
तो भोगणया थाव काढी । द्वैताचा जेथ ॥९॥
तो भेद मग्न होतां एकरसीं लाज पावुनी हेर ।
स्वानंदसौख्यभोगीं शोधाया द्वैत येइ बाहेर ॥९॥
देवें संपूर्ण देवी । तियेविण कांहिंना त गोसावी ।
किंबहुना एकोपजीवी । एकमेकां ॥१०॥
देवें पूर्णत्वा ये देवी त्या तिजमुळेंचि देवपण ।
उपजीवन दोघांचे यापरि राहे परस्पराधीन ॥१०॥
कैसा मेळु आला गोडिये । जे दोघें न माती जगीं इये ।
कीं परमाणुहीमाजि उवायें । मांडलीं आहाती ॥११॥
संग परस्पर यांचा नित्य असुनि जंगि न मावती दोघें ।
अणुरेणूही व्यापुनि हें युग्म क्षणहि राहि न वियोगें ॥११॥
जिहीं एकएकावीण । न कीजे तृणाचेंहि निर्माण ।
जियें दोघें जीवप्राण । जियां दोघां ॥१२॥
एका सोडुनि एका तृणही करितां न येचि निर्माण ।
तत्प्रेम एवढें कीं परस्परां होति केवल प्राण ॥१२॥
घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिगे ।
तैं दंपत्यपणे जागे । स्वामिणी जे ॥१३॥
अति निपुण जोडपें हें गृहकृत्यीं पुरुष जाय जरि शयनीं ।
प्रकृती जागी राहे यापरि संसार करिति ते मिळुनी ॥१३॥
जयां दोघांमाजि येखादें । विपायें उमजलें होय निदें ।
रितें घरवात गिळूनि नुसधें । कांहीं ना करी ॥१४॥
या दंपत्यामाजी दोघांतुनि एक होय जैं जागें ।
ग्रासुनि सर्व गृहासह उरवी अवशिष्ट कांहिं नच मागें ॥१४॥
दोहों अंगाची आटणी । गिंवसित आहाती येकपणीं ।
जाली भेदाचिया वाहाणी । आधाआधीं जियें ॥१५॥
एकपणें राहति हे ग्रासुनि अंगद्वयासि शिवशक्ती ।
भेदाच्या दृष्टीनें दो अंगी अर्ध अर्ध दिसताती ॥१५॥
विषो येकमेकांची जियें । जियें येकमेकांचीं विषयी इयें ।
जियें दोघीं सुखियें । जियें दोघें ॥१६॥
पुरुष प्रकृती होती परस्परांप्रति पहा विषय विषयी ।
योगें परस्परांच्या परस्परांला अतीव सुख होई ॥१६॥
स्त्रीपुरूषनामभेदें । शिवपण येकलें नांदे ।
जग सकळ आधाधे । पणें जिहीं ॥१७॥
स्त्रीपुरुषनामभेदें केवल पुरुषत्व एकलें नांदे ।
अर्धार्धांगें ज्याच्या सकलहि जग भासतें विविधभेदें ॥१७॥
दो दांडीं येक श्रुति । दो फुलीं येक द्रुति ।
दोहो दिवीं दीप्ति । एकीच जेंवि ॥१८॥
दो टिपरींचा एकचि नाद तसा वास दोन पुष्पांचा ।
तेंवि प्रकाश एकचि जेंवि असे दोन भिन्न दीपांचा ॥१८॥
दो ओंठीं येक गोठी । दो डोळां एकचि दिठी ।
तेविं दोघीं जिहीं सृष्टी । एकींच जेविं ॥१९॥
नयनद्वयिं एक दिठी दो वोठीं एकची निघे गोष्टी ।
पुरुषप्रकृतींपासुनि एकचि तैसीच जन्मली सृष्टी ॥१९॥
दाउनी दोनीपण । एक रसाचें आरोगण ।
करित आहे मेहुण । अनादि जें ॥२०॥
हें दंपत्य अनादि द्वैताचा दाखवूनि आभास ।
पुरुष प्रकृती दोघें सेवन करिती अखंड एक रस ॥२०॥
जे स्वामिचिया सत्ता । वीण असों नेणें पतिव्रता ।
जियेविण सर्व कर्ता । कांहींच ना जो ॥२१॥
पुरुष पतीविण कांहीं नाहीं प्रकृती सतीस मुळिं सत्ता ।
पुरुषहि प्रकृतीवांचुनि होऊं न शकेचि सृष्टिचा कर्ता ॥२१॥
जे कीं भर्ताराचें दिसणें । भर्तार जियेचें असणें ।
नेणिजती दोघें जणें । निवडूं जियें ॥२२॥
जीच्या योगें पतिचें दिसणें जीचें पतीमुळें असणें ।
मजला असाध्य गमतें परस्परांहूनि यांसि ओळखणें ॥२२॥
गोडी आणि गुळु । कापूर आणि परिमळु ।
निवडू जातां पांगूळु । निवाड होये ॥२३॥
कापूर आणि परिमळ एकचि तैसेचि गोडि अणि गूळ ।
एकांतुनि एकाला निवडाया बुद्धि होय पांगूळ ॥२३॥
समग्र दीप्ती घेतां । जेविं दीपचि ये हाता ।
तेविं जियेचिया तत्त्वतां । शिवचि लाभे ॥२४॥
घेऊं जातां दीप्ती समग्र हातासि येई दीप जसा ।
शक्तिस्वरूप तैसें शोधूं जाता शिवैकलाभ तसा ॥२४॥
जैसा सूर्य मिरवे प्रभा । प्रभे सूर्यचि गाभा ।
तेविं भेद गिळीत शोभा । एकीच जे ॥२५॥
शोभे रवि प्रभेनें आश्रय होवोनि तो स्वतां तिजला ।
तैसी शोभा एकचि उरते ग्रासुनि समग्र भेदाला ॥२५॥
कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक ।
तैसें द्वैतमिसें येक । बरवतसे ॥२६॥
प्रतिबिंबाचे द्योतक, बिंबचि प्रतिबिंब होय अनुमेय ।
मिथ्या प्रतिबिंब दिसे द्वैतव्याजें वसूनि रमणीय ॥२६॥
सर्व शून्याचा निष्कर्षु । तो जिया बाइला केला पुरुषु ।
जेणें दादुलेन सत्ताविशेषु । शक्ति जाली ॥२७॥
शुन्यातीत असे जो त्याला केलें पुरुष ज्या सतिनें ।
दिधलें शक्तित्त्व तिला सृष्टयर्थ तयें स्वकीय सत्तेनें ॥२७॥
जिये प्राणेश्वरीवीण । शिवींही शिवपण ।
थारों न शके ते आपण । शिवें घडिली ॥२८॥
ज्या आर्धांगीवांचुनि राहूं न शके शिवांत शिवपणही ।
तैशा महेश्वरें ही पतिव्रता नारी निर्मिली पाहीं ॥२८॥
ऐश्वर्यैसीं ईश्वरा । जियेचें आंग संसारा ।
आपलाही उभारा । आपणचि जे ॥२९॥
ऐश्वर्यासहित अशा या मायेनेंचि निर्मिलें ईशा ।
अपुली उत्पत्तीही केलि इनें काय हा बघ तमाशा ॥२९॥
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें ।
केलें जगायेवढें लेणें । नामरूपाचें ॥३०॥
पतिरूप हीन पाहुनि भूषविण्या कीं निजांग लाजेनें ।
विविधस्वरूप सृष्टी केली रमणीय याच भाजेनें ॥३०॥
जेथें ऐक्याचा दुकाळा । तेथें बहुपणाचा सोहळा ।
जियें सदैवेंचिया लीळा । दाखविला ॥३१॥
ऐक्याचाच जिथें मुळिं दुष्काल तिथें बहुत्व ये कैसें ।
परि दाविलें विविध जग जीणें सौभाग्य प्रकृतिचें ऐसें ॥३१॥
आंगाचिया आटणीया । कांत उवाया आणिया जिया ।
स्वसंकोचें प्रिया । रूढविली जेणें ॥३२॥
स्वांगा उपसंहरुनी जीणें उदयासि आणिलें कांता ।
संकोचुनी स्वतांला नांवारूपासि आणि शिव कांता ॥३२॥
जियेंते पहावयाचिया लोभा । चढे द्रष्टृत्वाचिया क्षोभा ।
जियेतें देखत उभा । आंगचि सांडी ॥३३॥
जीच्या दर्शनलोभें याणें द्रष्टृत्व आणिलें अंगीं ।
बघणे सोडुनि देतां राहे अपुल्याचि ठायिं निःसंगी ॥३३॥
कांतेचिया भिडा । आवरला होय जगायेवढा ।
आंगवला उघडा । जियेवीण ॥३४॥
भीड धरुनि कांतेची जगताचें वस्त्र पांघरी शिव तो ।
कांतवियोग होतां भर्ता उघडाचि स्वस्थळीं बसतो ॥३४॥
जो हा ठाववेर्ही मंदरूपें । उवायिलेपणें हारपे ।
तो जाला जियेचेनि पडपें । विश्वरूप ॥३५॥
इतुकें सूक्ष्म तयाचें रूप असे कीं दिसे जणूं शून्य ।
कांताप्रेमभरानें तो झाला विश्वरूपचि वदान्य ॥३५॥
जिया चेवविला शिउ । वेद्याचे वोदनें बहु ।
वाढितोनिशिं जेऊं । धाला जो ॥३६॥
जागें करुनि शिवाला दृश्याचें अन्न वाढि जैं देवी ।
तीच्या सगट जगातें भक्षण करितांचि होय तृप्ति शवीं ॥३६॥
निदेलेनि भ्रतारें । जे विये चराचरें ।
जियेचा विसांवला नुरे । आंबुलेपणही ॥३७॥
निजला असतां भर्ता कांता त्याची चराचर प्रसवे ।
जेव्हां घेइ विसांवा लोपे तद्भर्तृताहि त्याचिसवें ॥३७॥
जंव कांत लपों बैसे । तंव नेणवे जियेच्या उद्दिशें ।
जियें दोघें आरसे । जियां दोघां ॥३८॥
तंव नेणिजे पुरुष हा लपला जंव प्रकृति वस्त्र पांघरुन ।
होती परस्परांचे द्योतक अरसेचि हे जणूं दोन ॥३८॥
जियेचनि आंगलगें । आनंद आपणापें आरोगूं लागे ।
सर्वभोक्ता परी नेघे । जियेविण कांहीं ॥३९॥
जीशीं होउनि युक्तचि भोगी आनंद आपणा शिवही ।
हा आसुनि सर्वभोक्ता भोगूं न शकेचि तिजविणें कांहीं ॥३९॥
जया प्रियाचें जें आंग । जो प्रिय जियेचें चांग ।
कालउनी दोन्ही भाग । जिवितें आहाति ॥४०॥
अर्धांगें होती परस्परांचीं कसे प्रकृतिपुरुष ।
मिसळुनि परस्परांमधिं करिती स्वानंदभोगपरिपोष ॥४०॥
जैसि का समीरासगट गति । कां सोनयासगट कांति ।
तैसी शिर्वेशीं शक्ति । आघवीच जे ॥४१॥
जेंवि समीरा सांडुनि गति नाहीं सांडुनी सुवर्णास ।
कांती नाहीं त्यापरि शक्ती नाहींच सोडुनि शिवास ॥४१॥
कां कस्तुरीसगट परिमळ । उष्मेसगट अनळ ।
तैसा शक्तिसीं केवळ । शिवचि जो ॥४२॥
किंवा कस्तूरीसह परिमळ कीं अग्नि उष्णतेसहित ।
तैसा शक्तीसह हा शंभुचि संदेह नाहिं बा यांत ॥४२॥
राति आणि दिवो । पातलिया सुर्याचा ठावो ।
तैसीं आपुला साची वावो । जियें दोघें ॥४३॥
दिवस आणि रात्री हें युग्म नसे ठाउकेंचि सूर्याला ।
तैसें आत्मस्वरूपीं ठाव नसे ईश शक्ति दोघांला ॥४३॥
किंबहुना तियें । प्रणवाक्षरीं विरूढतियें ।
दशेचींही वैरियें । शिवशक्ति ॥४४॥
एवं प्रणवाठाई विकार होवोनि सृष्टि उद्भवली ।
ही वार्ताचि न साहे कीं चिन्मात्रीं मुळीं न ती झाली ॥४४॥
हें असो नामरूपाचा भेद शिरा । गिळीत एकार्थचा उजिर ।
नमो तयां शिववोहरा । ज्ञानदेवो म्हणे ॥४५॥
त्या नामरूप भेदा ज्याची एकार्थता करी ग्रास ।
त्या शिवशक्तिद्वंद्वा ज्ञानेश्वर म्हणति मी नमीं त्यास ॥४५॥
जया दोघांचा आलिंगनीं । विरोनी गेलीं दोन्ही ।
आवघियाचि रजनी । दिठीची जे ॥४६॥
आलिंगनिं दोघांच्या दोघेही आटताति शिवशक्ति ।
दृष्टी जाय विरोनी जातां अस्तासि जेंवि दिवसपति ॥४६॥
जयांच्या स्वरूपनिर्धारीं । गेली परेसी वैखरी ।
सिंधूसीं प्रलयनीरीं । गंगा जैसी ॥४७॥
ज्याच्या स्वरूपनिश्वयिं परादिसह वैखरी विलय पावे ।
गंगेनें सिधूसह जेवीं प्रलयोदकीं गडप व्हावें ॥४७॥
वायु चळवळेंसीं । जिराला व्योमाचिये कुसी ।
आटला प्रळयप्रकाशीं । सप्रभ भानु ॥४८॥
जैसा व्योमिं लयातें पावे निजचळबळीसहित पवन ।
प्रळयप्रकाशिं किंवा होतो सविता प्रभेसहित लीन ॥४८॥
तेविं न्याहाळितां ययांतें । गेलें पाहणेनसीं पाहातें ।
पुढती घरवरौतें । वंदिलीं तियें ॥४९॥
न्याहळुनी बघतां ज्या द्रष्टा लोपेचि दर्शनासहित ।
त्या दिव्य दंपतीला माझें मस्तक सदा असो प्रणत ॥४९॥
जयांचिया वाहणी । वेदक वेद्याचें पाणी ।
न पिये परि सांडणी । आंगाचीही करी ॥५०॥
जाणूं जातां ज्यातें बिंदुहि त्या वेद्यसिंधुचा न मिळे ।
इतुकेंचि नव्हे किंतु ज्ञात्याचेंही समूळ अंग गळे ॥५०॥
तेथ मी नमस्कारा । लागिं उरों दुसरा ।
तरी लिंगभेद पर्हा । जोडूं जावों ॥५१॥
ऐशा ऐक्यस्थळिं जरि नमनालागीं उरेन दुसरा मी ।
तरि या सृष्टींत कुठें अधिक दिसे लिंगभेद या भूमीं ॥५१॥
परि सोनेंनसीं दुजें । नहोनि लेणें सोना भजे ।
हें नमन करणें माझें । तैसें आहे ॥५२॥
सोन्याहूनि निराळा नसुनी शोभवि जसा अलंकार ।
भिन्न न होउनि तैसा करिं शिवशक्तिस मी नमस्कार ॥५२॥
सांगता वाचेतें वाचा । ठाव वाच्य वाचकाचा ।
पडतां काय भेदाचा । विटाळ आहे ॥५३॥
वाचा कथि वाचेतें जेव्हां वाचकचि वाच्यही जैसे ।
मग तेथें भेदाचा सांगा तुम्ही विटाळ काय असे ? ॥५३॥.
सिंधु आणि गंगेचि मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी ।
दिसतसे तरी पाणी । काय द्वैत होईल ॥५४॥
गंगासागरसंगमिं एक स्त्रीनाम पुरुषनाम दुजें ।
नामीं भेद दिसे जरि नच उदकीं तो द्वयांत एकचि जें ॥५४॥
पाहे पां भास्य भासकता । आपुला ठाई दावितां ।
एकपणा काय सविता । मोडित असे ॥५५॥
जो दावी भासकता आणि भास्यत्व आपुला ठांई ।
तेणें त्या सूर्याचा एकपणा काय मोडतो पाहीं ॥५५॥
चांदाचिया दोंदवरी । होत चांदणियाची विखुरी ।
काय उणें दीप्तीवरी । गिंवसों पां दीप ॥५६॥
चंद्राच्या बिंबावरि दिसतें जें नयनिं चंद्रिकावरण ।
चंद्राहुनि भिन्न नसे किंवा दीपहि नसेचि दीप्तिविण ॥५६॥
मोतियाची कीळ । होय मोतियावरी पांगुळ ।
आगळें निर्मळ । रूपा ये कीं ॥५७॥
मोत्यावरि जें राहे तेज तयावरिच जेंवि तें झळकें ।
मौक्तिकनैर्मल्यानें त्याचें सौदर्य अधिक तें फांके ॥५७॥
मांत्राचिया त्रिपुटिया । प्रणव काय केला चिरटिया ।
कींणकार त्रिरेघटिया । भेदावला काई ॥५८॥
प्रणवांत तीन मात्रा ज्या त्यांनीं प्रणव न त्रिविध झाला ।
रेषा तीन णकारीं ज्या तेणें विविधता नये त्याला ॥५८॥
ऐक्याचें मुदल न ढळे । आणि साजरेपणाचा लाभ मिळे ।
तरी स्वतरंगाचीं मुकुळें । तुरंबु कां पाणी ॥५९॥
मुळिंचें ऐक्य न ढळतां शोभा ये जरि विशेष पाण्याला ।
स्वतरंगाचीं पुष्पें लेण्यानें काय हान बा त्याला ॥५९॥
म्हणोन भूतेश भवानी । न करूनि शिनानी ।
मी निघालों नमनीं । तें हें ऐसें ॥६०॥
त्यापरि किवशक्ति जीं एकचि ज्यां अंत मध्य ना आदि ।
त्यांशी अभिन्न होउनि मीपण सांडूनि त्यांसि मी वंदीं ॥६०॥
दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं रिघे ।
कां बुडी दीजे तरंगे । वायूचा ठेला ॥६१॥
प्रतिबिंब बिंबिं शिरतें दर्पण एकीकडेसि सारीतां ।
कीं लाट बुडी मारी पाण्यांतचि वायु थांबला असतां ॥६१॥
नातरी निद जातखेंवो । पावे आपुला ठावो ।
तैसीं बुद्धित्यागें देवीदेवो । वंदिलीं मियां ॥६२॥
किंवा निद्रेंतुनि नर पावे उठतांचि आपुला ठाव ।
तेविं अहंबुद्धीतें टाकुनि मी वंदिं देवि अणि देव ॥६२॥
सांडुनी मीपणाचा लोभु । मिठें सिंधुत्वाचा घेतला लाभु ।
तेविं अहं देउनि मी शंभु । शांभवी जालों ॥६३॥
सांडुनि मीठपणाचा लोभ समुद्रत्व पावलें मीठ ।
तेविं अहंपण अर्पुनि शिवशक्तिशिं जाहलोंचि एकवट ॥६३॥
शिवशक्तिसमावेशें । नमन केलें म्यां ऐसें ।
रंभागर्भ आकाशें । रिघाला जैसा ॥६४॥
शिवशक्तिसमावेशें यापरि म्यां भक्तिनें नमन केलें ।
आकाशामधिं जैसें अंतर्नभ केळिचें जसें शिरलें ॥६४॥
॥ पहिलें प्रकरण समाप्त ॥