Get it on Google Play
Download on the App Store

दुर्दैवी मराठीची होरपळलेली पानं...


          आज काल विंग्रजी बोलायची जी फॕशन झाल्या त्याला काही तोड नाय राव. काल एकाला शुभेच्छा दिल्या तर तेनं Ty ... असं पाठवलं. मी लगेच शब्दकोश मध्ये शोधलं पण हा शब्द मला कुठच भेटला नाय. मला हेच कळत नाय Ty हा नविण शब्द आला कुठुन? दोन मराठी माणसं जेंव्हा आपापसात बोलतात. तेंव्हा त्यांना दुसर्या भाषेची गरज काय? एकतर तुम्ही जास्त शिकलेलं असाल अथवा स्वतःला जरा वेगळं काहीतर दर्शवायची तुमास्नी गरज पडाल्या असं तुमास्नी वाटत नाय का? इतर भाषेला माझा विरोध नाहिच. मी महाराष्ट्रात असेन तेंव्हा मला आपल्या लोकांशी मराठी बोलावच लागणार. मी महाराष्ट्राबाहेर असेल तेंव्हा त्या लोकांशी संवाद साधताना मी हिंदी भाषा वापरणार आणि जेंव्हा मी भारताच्या बाहेर जाईल तेंव्हा जगाशी संबंध साधण्यासाठी मला विंग्रजी शिवाय पर्यायच नसेल. पण आपल्या राज्यात आपल्याला आपल्याच भाषेत बोलायला अडचण काय? विंग्रजी भाषा ही काळाची गरज हाय म्हणुन आपण आपली भाषा सोडायची की काय? जिथं ज्या भाषेची गरज आहे तिथे ती वापरायला हरकत नाहिच. पण जेंव्हा दोन स्वभाषिक माणसं आपापसात इतर भाषेचा वापर करतात तेंव्हा मात्र खटकतय. कधी कधी वाटतय विंग्रजी ही काळाची गरज हाय की फॕशन हेच कळत नाय. काही मराठी माणसं विंग्रजी भाषेचा स्विकार कराल्यात पण आपल्या मातृभाषेचा धिक्कार करताना वारंवार दिसाल्यात. साधं लिवायचं म्हटल्यावरही त्यास्नी English Language लागते. परवा एकाला सहज विचारलं की...
 "...आपली भाषा का वापरत नाहिस?" "
तर... वेळ लागतो म्हणुन आणि वेळेची बचत व्हावी म्हणुन आम्ही विंग्रजी भाषेचा वापर करतो." मातृभाषाप्रेमी सहज घाव घालुन गेला.

पण आश्यानं आपल्या मातृभाषेत वापरली जाणारी देवनागरी लिपी लोप पावत चाललेली वारंवार दिसाल्या. 
            आज काल कोणत्याही टिव्हीवर कुठल्याही नट/नट्यांची मुलाखत बघा. ते ज्या भाषेच्या जीवावर उड्या मारुन तिथं पोहोचल्यात ती भाषा न वापरता, विंग्रजीत बरळत असत्यात. कधी कधी प्रश्न पडतोय की आपण ज्या भाषेतुन त्यांना ते स्थान दिलय तिथं पोहोचल्यावर मात्र ते दुसरीच भाषा बोलत्यात. पण दुःखं याच गोष्टिचं वाटतय की त्यांनी स्टाईल आणि फॕशन मध्ये वापरलेली भाषा त्यांच्या चाहत्यांना १००% कळत नाय. ते बरळत र्हात्यात आणि चाहते काहितरी आश्चर्य घडल्यासारखं तेंच्या तोंडाकडं आ$$$ वासुन टकामका बघत बसत्यात. 

          मित्रांनो, या मातीचा आणि आपल्या भाषेचा गोडवा तुमास्नी स्वतः चाखल्याशिवाय कळणारच नाय. जसं आपल्या आईची माया आपल्या शिवाय कुणिही जास्त समजु आणि अनुभऊ शकत नाय. तसंच आपल्या भाषेचा गोडवा कधिच दुसार्या भाषेच्या ठिकाणी मिळणार नाय. जिथं तुमास्नी विंग्रजी शिवाय पर्याय नाय तिथं १००% विंग्रजी वापराच. पण राहिलेल्या ठिकाणी आपल्या भाषेचा वापर का करु नये? टाईप करायला वेळ लागतुय म्हणुन आपली लिपी का सोडायची? लिवायला वेळ लागतुय हे जर तुमचं कारण असेल तर तो माझ्या नजरेत एक गाढवपणा हाय. अशी कोणती व्यस्तता तुमच्या मानगुटिवर बसल्या की तुमास्नी तुमचिच भाषा लिवायला वेळ भेटत नाय? विंग्रजी शिकताना A for Apple ने सुरवात केलिसा तवा काय वाटलं नाय आणि आज आपल्याच भाषेतले अ, आ, इ, ई... तुमास्नी कठिण वाटाल्यात? आज काल प्रत्येक मोबाईल मध्ये सर्व भाषा दिल्यात. काही मोबाईल मध्ये नसेल तर Play store मध्ये पोत्यानं मराठी भाषेची ॲप हाईत. एकदा तिकडं फिरकुन तर बघा राव. लिवायला थोडा वेळ लागेल पण लिवताना आणि वाचताना खरंच वेड लागेल. मराठी लिवायला सुरवात करा. सुरवातिला भराभरा लिवता येणारच नाय. पण लिवायची सवय कायमच ठिवा. एक दिवस तुमचा आपल्या भाषेकडं बघायचा दृष्टिकोन नक्कीच बदलणार हे मात्र खरं. 

             आमची नोकरी महाराष्ट्राच्या बाहेर असल्यामुळे आमास्नी ९९% हिंदी आणि जर सोबत एखादा कुणी मराठी असला तर १% मातृभाषेचा वापर हुतुय. आमच्या कार्यालयातील कागदपत्री भाषा १००% विंग्रजी आहे. तरिही आमचं आमच्या मातृभाषेप्रती प्रेम हे कधिच आणि इथुन पुढेही तिळमात्रही कमी हुनार नाय. जर महाराष्ट्राच्या भाईर राहुन आमास्नी आमच्या भाषेची इतकी गोडी असेल तर याच् मातीत राहुन तुमच्यात आपल्याच भाषेप्रती इतकी उदासिनता का?

             आपल्या सण उत्सवाला आपल्याच भाषेतुन शुभेच्छा द्या. आपापसातील संभाषणं आपल्याच भाषेत लिवा. प्रसारमाध्यमांच्या मार्फत जितका हुईल तिथं आपल्याच भाषेचा वापर करा. दुःखं याच् गोष्टिचं वाटतय की...
आई Mom मध्ये होरपळु लागली,

बाबांची Daddy मध्ये पानं गळु लागली,

भाऊ Bro. मध्ये गुंगला, 
तर...

बहिण Sis. मध्ये ओक्साबोक्सी रडु लागली.

काका, मामा Uncle मध्ये लोप पावले,

तर...
आत्या अन् काकु Aunty मध्ये स्वतःचं अस्तित्व शोधु लागल्या.

नवरा तर Hubby मध्येच् लागिर लागल्सासारखं औषधासाठी तडफडालाय.

सगळी नाती अशिच आपापल्या अस्तित्वाच्या लढाईत तुरटी सारखी विंग्रजीत विरघळुन चालल्यात.

               या आपल्या मातीचं आपण कायतर देनं लागतुय, मग ते कोणत्याही स्वरुपाचं असो. देणं तर फेडावच लागणार...मग ते कोणत्याही स्वरुपाचं असो. हे देनं फेडण्यासाठी तुमास्नी सीमारेषेवर जाऊन बंदुक हातात घिऊन लढाई करायची गरज नाय. आपल्या भाषेकडं बघण्याचा आणि तिला स्वतःच्या अस्तित्वासाठी बघण्याचा दृष्टिकोन बदला. स्वतःच्या आयुष्यात बदल हुईल आणि नाय झाला तर आमच्या डोसक्यात धोंडा घाला व तुमची ती विंग्रजी बरळत र्हावा. कारण आमी तर आमच्या भाषेचा प्रचार आणि प्रसार हा करणारच्... 
मग आलात तर तुमच्यासह... 
नायतर तुमच्या शिवाय...
एकटाच्...





श्री सुनिल शांताबाई सूर्यवंशी.
राजा शिवछत्रपती परिवार.
भ्रमणध्वणीः ७७४४०६२५४२.
suryawanshisunil.blogspot.com

मराठी कथा नि गोष्टी

परम
Chapters
कुटुंब सोहोराब काका शाॅपींग फेस्टिव्हल... मामा गुरूमूर्ती यांचे नोटबंदीवरिल विचार अत्यंत सोप्या शब्दात शंभू तरुण रामस्वामी चोरकाका... #कुटुंब प्रोजेक्टचे व्हॅल्यूएशन सोबत रसायन साबून स्लो हैं क्या? "या सूरांनो चंद्र व्हा...." कोजागरी पौर्णिमा दरमहा पैसे वाचविण्याच्या सात टिप्स... जादूगर ची बायको प्रेम प्रेम आणि विश्वास निरोगी राहण्याचे काही नियम लेखन संकष्टी महात्म्य समाधान श्रीमंतीचं दुसरं नावं मला वाटायच गोष्टी परीक्षण करतानाच्या (supervisionच्या) !! लेखन !! अखेर श्रीखंडाच्या वड्यांची रेसिपी सापडली गोष्टी परीक्षण करतानाच्या लक्ष्मी पंगिरा मधुमालतीचा वेल अप्रूप मसालेभात स्पर्श अखेरचा डाव.... आजी आईचा आत्मा जड झालेले आई-बाप दुर्दैवी मराठीची होरपळलेली पानं... निरोप.. हुरहुर दिवाळीची.... कळीचा नारद जन्याच पोर. ऍपल छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना माहिती नाही.. आरोग्यम धनसंपदा श्रीमंत वृद्धाश्रम