प्रास्ताविक
अथर्ववेद हा चार वेदांपैकी एक वेद आहे. या वेदात विविध प्रकारचे अभिचारमंत्र म्हणजे जारणमारणमंत्र आणि इतर जादूचे मंत्र मोठ्या प्रमाणावर संगृहीत केले आहेत.
ह्यातील बहुसंख्य ऋचांचा साक्षात्कार अथर्वन् नामक ऋषीला झाल्यामुळे ह्या वेदास अथर्ववेद हे नाव प्राप्त झाले, असे म्हटले जाते.
अथर्वन् हे एका वैदिक आचार्याचे नाव असले, तरी त्याच्या वंशात उत्पन्न झालेला ऋषिसमुदायही त्याच नावाने ओळखला जातो. अथर्वन् ह्या शब्दाचा आणखी एक अर्थ, ‘अग्नी आणि सोम यांना पूजणारा’ असा आहे. प्राचीन काळी अग्निहोत्री पुरोहित अथर्वन् या नावाने ओळखला जाई. अवेस्ता या पारश्यांच्या धर्मग्रंथातील ‘अथ्रवन’ या शब्दाचा अर्थ अग्निपूजक असाच आहे.
हे अग्निपूजक ऋषी यातुविद्येतही प्रवीण होते. अशा ऋषींची मंत्ररचना अथर्ववेदात आहे. अर्थर्वांगिरसवेद, भृग्वंगिरसवेद, ब्रह्मवेद, क्षत्रवेद, भैषज्यवेद अशा विविध नावांनीही हा वेद ओळखला जातो.