Android app on Google Play

 

भूतविद्या

 

अतिप्राचीन भारतातील चिकित्सकांना मानसिक विकारांची कल्पना नीट आलेली नव्हती. त्या काळात माणूस असंबद्ध बोलू अथवा वागू लागला की त्याला भुताने अथवा परकीय आत्म्याने झपाटले आहे किंवा कुणी दुष्ट हेतूने जादूटोणा केला आहे, असे समजले जात होते. अशा व्याधीवर अंगारे-धुपारे, मंत्रतंत्र इ. लोकभ्रमावर आधारित व गुह्य उपाय केले जायचे. देवाचे नाव घेऊन प्रचलित धार्मिक संकेत अथवा भाकिते सांगू लागल्यास, देव अंगात आले असे समजून त्या व्यक्तीला पूज्य मानीत असत. अशा कल्पना ग्रामीण समाजात अजूनही रूढ आहेत.

सुमारे २,५०० वर्षांपूर्वी मनाबद्दल शास्त्रोक्त कल्पना आयुर्वेदात मांडली गेली ती अशी : देह, इंद्रिये, मन व आत्मा मिळून शरीर बनते व या चारींच्या संयोगाला जीवित अथवा आयुष्य अशी संज्ञा आहे. मन हे स्वतंत्र अणुरूप द्रव्य असून त्याचे स्थान (चेतनास्थान) हृदयात आहे. म्हणून ते अंतरेंद्रिय. मनावरचे नियंत्रण वायू अथवा प्राण ह्यांच्यातर्फे होते व मन स्वतःचे व इंद्रियांचे नियंत्रण करते. तसेच ते ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिय या दोन्ही स्वरूपाचे (उभयात्मक) आहे. मनामुळे बाह्य विषयांचे ज्ञान एका वेळेस एका इंद्रियातर्फे होते. मनाचे कार्य संकल्पन स्वरूपात असते. इंद्रियांतर्फे झालेले बाह्य विषयाचे ज्ञान मुळात आलोचनात्मक व निर्विकल्पक असते. नंतर मन, अहंकार व बुद्धी ह्या तिहीने बनलेल्या अंतःकरणात पुढील क्रिया होतात :

मन बाह्य विषयाच्या घटकांचे पृथःकरण करते (म्हणजे अनावश्यकाचा त्याग व आवश्यक अंशाचे एकत्रीकरण) तसेच संकल्पित कल्पना निर्माण करते. त्यानंतर अहंकार हा आवड, इच्छा ठरवतो आणि त्यानुसार अभिमान बाळगतो. बुद्धी ही विषयपरीक्षण करून स्वतःच निर्णय घेते. या एकत्र अभिप्रायानुसार मन पुढील कार्यवाही कर्मेंद्रियातर्फे करते. मनाचे पोषण करणारे अंश अन्नात असतात असे मानणारा ‘आहार शुद्धी सत्त्वशुद्धिः’ नामक सिद्धांत आहे.

‘धी’,‘धृति’ व ‘स्मृति’ अशा तीन मानसशक्ती आहेत. धी म्हणजेच बुद्धी, धृती ही संयमशक्ती असून ती मनाचे नियमन करते व स्मृती योग्य तत्त्वाची आठवण देऊन मनाला सावध करते.

]मनाचे विविध ‘गुणधर्म’ आहेत. पैकी सत्त्व हा गुण इष्ट समजला जातो. रज व तम हे दोष मानले जातात. ह्या गुणदोषांच्या निरनिराळ्या प्रमाणावर आधारित अशा मनाच्या तीन प्रवृत्ती (चित्तप्रकृती) वर्णिलेल्या आहेत : (१) सात्विक म्हणजे संयमी, विवेकी व जिज्ञासू. (२) राजस म्हणजे उत्कट, अतिसंवेदनाक्षम व प्रेरणाप्रधान. (३) तामस म्हणजे अज्ञानी, मोहवश व निष्क्रीय. काम, क्रोध, लोभ, मोह इ. मनोवृत्ती रज व तम या दोषांमुळे वृद्धिंगत होतात आणि मनाचे आवेग तयार होतात. मोहाचा अतिरेक हे चित्तविकल्पाचे लक्षण आहे.

 रज व तमामुळे मानसशक्ती भ्रष्ट झाल्यास मानसिक कर्म बिघडते. भोगतृष्णा प्रबळ होते व आचरणात चुका होतात. ह्यालाच ‘प्रज्ञापराध’ म्हणतात. प्रज्ञापराधामुळे बुद्धिभ्रंश, स्मृतिभ्रंश आणि धृतिभ्रंश होतो. जी गोष्ट जशी समाजावयाला हवी तशी न समजता तिच्याविषयी ज्या विपरीत कल्पना असतील त्यांनुसार ग्रहण केली जाते व तसे वर्तन घडते. मानसविकार ह्याच्यातूनच उद्‌भवतात. ह्याशिवाय मानसविकारांची आधिभौतिक कारणेही आहेत :

(१) अभिशप्तक (मोठ्यांचे शाप)

(२) मंत्रप्रयोग (करणी, जादूटोणा)

(३) उपसर्गकृत (भूतपिशाच).

तंद्रा व मूर्च्छा ह्या निद्रेच्या विकृत अवस्था आहेत. हवे ते मिळाले नाही आणि नको ते प्राप्त झाले म्हणजे चित्ताचा क्षोभ होऊन ज्या मद, मूर्च्छा, उन्मादादी व्याधी होतात, त्यांस मानसव्याधी म्हणतात.

 भूतविद्या हे वैद्यकाचे एक स्वतंत्र अंग आहे. त्यात तज्ञता संपादन करणाऱ्या वैद्याला भूतचिंतक म्हटले आहे.भूतबाधा हा स्वतंत्र विकार नसून एक कारक आहे; ज्यापासून अनेक शारीरिक व मानसिक व्याधी होऊ शकतात, त्याचे देव, दानव, पिशाच इ. अठरा प्रकार नमूद केलेले आहेत. आयुर्वेदात विकारांच्या प्रत्यक्ष उपचारांपेक्षा मानसिक आरोग्य तसेच नीतिमत्ता समृद्ध करण्यासाठी प्रतिबंधक उपाय जास्त सांगितलेले आहेत. मुख्यत्वे अशा उपचारांचे तीन प्रकार आहेत  

(१) देवव्यपाश्रय (डिव्हाइन थेरपी)

(२) युक्तिव्यपाश्रय (फिजिकल थेरपी)

३) सत्त्वावजय (मनाचे नियंत्रण).


याशिवाय त्रासनचिकित्सा व मंत्रचिकित्सा ह्या मानसिक व्याधींवरील उपचारांचाही वापर बराच होतो.