संग्रह ४
७६
सातीच्या सुगरनी बसल्या पुरन वाटायाला
माझ्या मैनाबाईला बसवा सजुरी लाटायला
७७
नऊ महिने ओझं वागवितां न्हाई भ्याले
बाळे तुला शिकवीतां कष्टी झाले
७८
शेजेबाजेवरी उसुशी भिंगाची
मैनाबाई माझी पोफळी रंगाची
७९
काजळ कुकू लेते, बामन आळी जाते
बाळाबाईला माझ्या दृष्ट होते
८०
कुनी ग दृष्ट केली, पापी चंडाळीन
दृष्टावली माझी नागीन
८१
दृष्ट मी काढीते मीठ मोहर्या वळचनीला
दृष्ट झालीया तान्हीला
८२
दृष्ट झाली म्हनू मीठमोहर्या अगिनीला
झाली दृष्ट नागिनीला
८३
दृष्ट झाली म्हनु विसुबंद पलानीला
दृष्ट झालीया माझ्या मालनीला
८४
मोठंमोठं डोळं भुंवया लैनालैना
दृष्टावली माझी मैना