Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह २

२६

लाडक्या लेकीचं तळहात किती मऊ

कुन्या राजाला कन्या देऊं

२७

गोरीचं गोरेपन काळी झुरती मनामंदी

माझी मैनाबाई बेगड उन्हामंदी

२८

गोरीचं गोरेपन, उन्हान झालं लाल

मैना माझ्या साउलींन चाल

२९

गोरीचं गोरेपन काळीच जातं मन

माझ्या मैनबाई नको लेऊं दांतवन

३०

झाला समदा बाजार, इसरले शिकंकाई

माझ्या मैनाईचं केस लई

३१

हंडा तापविते, शिकंकाईला आला कड

नगगोडयाची वेणी सोड

३२

समूरल्या सोप्या ठेविते आरसाफणी

घालू लाडीची ग वेणी

३३

मोठंमोठं डोळ हरिनीबाई भ्याली

कुन्या वाटेनं माझी राधा गेली ?

३४

चांगलपन तुझं लांब गेलीया आवई

मामासारखी मैना देवई

३५

अंगनी खेळत्यात सयांच्या पोरीसोरी

हिरव्या साडीची लेक माझी गोरी

३६

शिंदेशाई तोडे केल्याती दिवाळीला

हौस तुझ्या मावळ्याला

३७

लाडक्या लेकीचं लाडासांरिखं कोड केलं

झुंब तोळ्याचं न्हान झालं

३८

नाकाच्या नथनीला मोती लाविले सात

मैना केवडयाची जात

३९

नाकाच्या नथनीला मोती लाविले ते चवदा

मैना लेनार पोरसवदा

४०

लेन्यामंदी लेन टिक्काचं कवळं

चोळीवरी गाडं लोळती पिवळं

४१

साता सरज्याची नथ आखूड तिचा दांडा

शोभते बाळीच्या गोर्‍या तोंडा

४२

हातांत गोटतोडे गळ्यांत मोहनमाळ

बिदी खेळे चंद्रावळ

४३

साखळ्यावाळे पायी, सोप्यामळीतून हिंडे

तालेवाराला लेक दंडे

४४

लाडकी ग लेक खिडकीखाली उभी

मैना बाजूबंदा जोगी

४५

लाडकी ग लेक चुलत्याला म्हने तात्या

पायी पैंजण उभी जोत्या

४६

भरल्या बाजारी उंच दुकान बिनाडीला

मामा हिंडतो भाचीच्या चुनाडीला

४७

काळीकुरूंद चोळी लेऊं वाटली जीवाला

हरनीला किती सांगू, शिंपी येऊंदे गावाला

४८

तापत्याची चोळी निपत्याचा बंद

लेकी लाडाके तुझा छंद

४९

लाडक्या लेकीचा लाडाचा ग हेका

मागे चोळीवरी टीक्का

५०

वळण धाडी काशीतल्या चोळ्या

दंडावरती मासोळ्या