संग्रह १
१
हौस मला मोठी लोटीशेजारी वाटीची
ल्येक ल्येकाच्य़ा पाठीची
२
हौस मला मोठी, ल्येक असावी ल्येकामंदी
गाठू पुतळी गोफामंदी
३
देवाला मागते, औतीकुळवी चौघं लेक
न्हाहारी न्यायाला रंभा एक
४
लुगड्याच्या घडीवर चोळ्याची चवड
मला लेकीची आवड
५
ल्येकाचे नवस, तुला केल्याती लेकीबाई
माझी मोगर्यामंदी जाई
६
ल्येकापरायास लेक कशानं उणी ?
एका कुशीचीं रत्नं दोन्ही
७
ल्येकापरायास लेक कशानं उणी झाली
आईबापाला ओवी गाते कैलासी ऐंकुं गेली
८
ल्येकीच्या आईला नका म्हनूसा हालकी
ल्येकाच्या आईला कुनी दिलीया पालकी
९
जोंधळ्यापरायास वाढवते तुरी
ल्येकापरीस मला लेक प्यारी
१०
ल्येकापरायास मला ल्येकीची माया येती
जडभारीला माझ्या होती
११
वाणियाच्या घरी खडीसाखर मोलाची
माझिया घरामंदी लेक ल्येकाच्या तोलाची
१२
किती हाक मारू लेकाच्या नावानं ?
दिली राधिका देवानं
१३
लई झाल्या लेकी नका घालूसा वानवळा
देवाघरीचा पानमळा
१४
थोरला माझा लेक वाडयाचा कळस
धाकुटी बाळाबाई माझ्या दारीची तुळस
१५
लई झाल्या लेकी, बाप म्हणे माझ्या वाल्या
चहुंदिशे चिमन्या गेल्या
१६
लाडक्या लेकीचं नावं ठेवावं बिजली
आंकडी दुधात खडीसाखर भिजली
१७
लाडक्या लेकीचं नांव ठेविलं मी साळू
किती नांवानी आळवूं
१८
लाडक्या लेकीचं नांव ठेविलं अक्काताय
गोंडं टाकीलं गाठवाय
१९
लाडाक्या लेकीचं नांव ठेविलं मी मैना
एका शब्दान ऐका
२०
सावळया सुरतीचं रूप आरशांत माईना
लाडी वडिलांसारखी मैना
२१
कुरूळ केसाची वेणी किती घालूं
माझ्या मैनाताईचं रूप सुंदर ओठ लालू
२२
कुरळ केसाचा वेणीबाईचा आंकडा
रूप राधाचं ठकडा
२३
कुरूळ केसाची भांगशेजारी तुझी वाकी
तुं ग दैवाची माझ्या लेकी
२४
मोठेमोठे डोळे भुवयांमंदी बांक
गोरे नागिनी रूप झाक
२५
लाडक्या लेकीला काटा रुतल भोपळीचा
पाय नाजूक पुतळीचा