संग्रह ३
५१
मावळण धाडी काशितले खण
दंडावरती मोर दोन
५२
दंडकी जरीचोळी जराशी वर सार
बाझुबंदाला जागा कर
५३
दंडावरची चोळी साजेल त्यानं ल्यावी
माझ्या बाळाबाई मधे कंगनी पडू द्यावी
५४
काळ्या चोळीवर कशिदा भिंगाचा
लेकी तुला प्रसाद गंगेचा
५५
काळी चंद्रकळा पदरावरी मासा
माझ्या बाळाबाई, गोकाकी रंग खासा
५६
काळी चंद्र्कळा रंग तिचा फिकाफिका
माझ्या मैनाताईचा हेका
५७
काळी चंद्रकळा नेस म्हणतां नेसेना
गोर्या अंगाला सोसेना !
५८
काळी चंद्र्कळा कशीदा कोथंबिरी
माझी मैना किती गोरी
५९
काळी चंद्रकळा नेसन्याची खुबी
बाळाबाई नगं रस्त्याला र्हाउं उभी
६०
काळी चंद्रकळा आजला खपली
तुझ्या रूपाला दंडली
६१
काळी चंद्रकळा जरीची किनार
मैनाबाई ग लेनार
६२
काळी चंद्रकळा मैना नेसली सुंदर
निरी पडते शंभर
६३
काळी चंद्रकळा यमना- जमना काठची
राधा पुनेरी थाटाची
६४
काळी चंद्रकळा तिचा पदर सोनेरी
मामा घेणार हुन्नेरी
६५
काळी चंद्रकळा तिचा पदर ममई
बाळे तुझ्या बापाची कमाई !
६६
काळी चंद्र्कळा नेसतां अंग दिसं
गोरे बाळाबाई, दृष्ट होते खाली बैस
६७
लाडाक्या लेकींचं गोडसं जेवण
दुधा साखरेचं विरजण
६८
लाडाक्या लेकीला लाडासारीखं काम सांगा
पूजेला पानी मागा
६९
वाईट माझा राग दुधावाणी उतूं गेला
सखी माझीनं शांत केला
७०
दिव्याला भरन घालते पळी पळी
आली गुजाला चाफेकळी
७१
थोरलं माझं घर दानं लागे खंडीखंडी
माझी बाळाई मणाला देई माडी
७२
ऐन दुपार झाली, माझ्या एकलीच्या कामा
बाळाबाई लावी हात भुकेला तुझा मामा
७३
सडा सारवन चुल भानुशा लकालकी
तुला आईचं गुन लेकी
७४
थोरली झाली लेक, मातेला सोडवण
घाली आडावं सारवण
७५
लाडाक्या लेकीचं खेळणं हुड्यावरी
भिंग झळकती चुडयावरी