Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ३

४१.

वैराळ्दादा उंच बांगड्या भर मला

बाप्पाजी माझे थोर नको पैशाची चिन्ता तुला

४२.

मोठी चट्कचांदनी,तांबोळ्या तुझी सुन

बंधुला देते पान्वर लवंगेची करी खूण.

४३,

तांबोळ्यांची मैना पडदा लावी दुकानाला

चातुर बंधुजी यायाच मुकामाला

४४.

गोंडाळ हाताची नग जाऊस बाजराला

घालूं कागद वैराळाला.

४५.

तांबोळयांची मैना तिच दुकानाखाली ओटा

बंधुजीला माझ्या पानाचा छंद मोठा

४६.

पान खातवन्या आलाया माझ्या गावा

बंधुला माझ्या तांबोळ्याची आळी दावा

४७.

तांबोळीणीबाई .पान द्यावी चिल्लीपिल्ली

बाळराजान शिंगी सडकला उभी केली.

४८.

तांबोळिणीबाई पान मोजावी छकडा

माझ्या बाळाच्या हाती रुपाया रोकडा

४९.

तांबोळीणीबाई पान द्यावी ईस तीस

विडा जायाचा कचेरीस

५०.

तांबोळिणीबाई,पान द्यावी बारा तेरा

विडा जायाचा माझ्या सुभेदारा.

५१.

तांबोळ्याची मैना पान मेजाया चुकली

माझ्या चंदरहाराला दिपली

५२.

तांबोळ्याच्या मुली पान द्यावी तेरा चौदा

खानार माझा राघु पोरसवदा

५३

तांबोळ्याच्या मुली नाय देई बिगीबिगी

तान्या राघुबाची बगी रस्त्याला उभी

५४.

तांबोळीनीबाई,तुझा तांबोळी कुठ गेला

कंथाच्या इड्याचा खोळंबा झाला.

५५

माळीन सादवीते,घ्या ग बायानु सीताफळ

बाळ आमुच गेल साळ.

५६.

माळीन मस्तवाल केंज घेईना वाटान्याच

बाळ रडत बंधुजी पठाणाच

५७.

माळीन साद देई माझ्या वाड्याच्या भवती

राजसाच्या जेवनाला भाजी मेथीची हवी होती.

५८.

माळीन साद देई घ्याग बयांनो जाईजुई

तुरे लेनार घरी न्हाई.

५९..

माळीन साद देई घ्याग बायांनो शाकभेंडी

कुनबी पिकला पहिल्या तोंडी

६०.

बुरुडाची सुपली आडभिंतीला उभी केली

मैना दान घोळाय सोप्या गेली